३० वर्षे विधवांसाठी संघर्ष करणाऱ्या लता बोराडेंचा शासनाने गौरव करावा . सादिक खाटीक यांची मागणी .

 

 

लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात

विधवा प्रथा बंदीसाठी व कायद्यासाठी गेली ३० वर्षे झटणाऱ्या श्रीमती लताताई बाळकृष्ण बोराडे रा . शेरेवाडी – आवळाई ता. आटपाडी जि .सांगली यांचा शासनामार्फत उचित गौरव व्हावा, विधवा महिलांबाबत त्यांनी केलेल्या मागण्यांवर निर्णय केला जावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांनी केली आहे .
राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, सामाजीक न्याय मंत्री ना. धनंजय मुंढे, ग्रामीण विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, सांस्कृतीक कार्य मंत्री ना. अमित देशमुख, महिला व बाल विकास कल्याण मंत्री ना. यशोमती ठाकूर, विधान परिषदेच्या उपसभापती ना . नीलमताई गोरे, खासदार सौ .सुप्रियाताई सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ना . रुपालीताई चाकणकर यांना तातडीने पाठविलेल्या ईमेल द्वारे सादिक खाटीक यांनी ही मागणी केली आहे .
कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड आणि माणगांव या ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करणेबाबत केलेल्या अभिनंदनीय ठरावा नंतर आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून काढलेल्या परिपत्रका बद्दल आपल्या महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन . मात्र या बरोबरीनेच गेली ३० वर्षे या विषयावर लढणाऱ्या श्रीमती लताताई बोराडे या प्राथमिक शिक्षिकेचा राज्यस्तरावरून गौरव करणेची आवश्यकता आहे . लताताई बोराडे या गेली ३० वर्षे विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी झटत आहेत . ३० वर्षापूर्वी, वयाच्या १९ व्या वर्षी आणि लग्नाच्या २५ व्या दिवशी त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला . तेव्हा पासून त्या विधवांना सुहासिनींचा मान मिळावा, त्यांचा सन्मान राखला जावा म्हणून झटत आहेत . याप्रश्नी जाणीव जागृतीसाठी त्यांनी स्वतः सौभाग्य अलंकार पुन्हा परिधान केले . वाड्या,वस्ती, गावोगावी फिरून आपल्या प्रमाणेच इतर विधवा महिलांनाही सन्मानाने जगण्यासाठी प्रवृत्त केले . त्यासाठी विधवा महिला विकास प्रतिष्ठान आटपाडी या नावाची संस्था स्थापन करून अनेक वर्षे विधवांच्या मानसिक व आर्थिक विकासासाठी तसेच स्वाभीमानाने स्वावलंबी जीवन जगण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम त्या करीत आल्या आहेत . गेली २२ वर्षे त्या राज्य सरकारशी पत्रव्यवहार करीत आहेत . त्यांच्या मागण्यांना मंजुरी देत शासनाने तातडीने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, त्यांच्या मागण्या अशा, १ ) विधवा प्रथा बंद करणारा आणि विधवांना सुहासिनीचा मान मिळणारा कायदा व्हावा . २ ) विधवा महिला विकास महामंडळाची स्थापना व्हावी . ३ ) विधवांना जात प्रमाणपत्रा सह सर्व आवश्यक कागदपत्रे केवळ अर्जावर घरपोहोच मिळावी . ४ ) प्रत्येक जिल्ह्यात शासकीय विधवा आश्रम सुरू करण्यात यावा . ५) विधवांना पुढील शिक्षणासाठी तसेच तिच्या मुलांना, शैक्षणीक फी माफी व शिष्यवृत्ती मिळावी . ६ ) विधवांना स्वतंत्र रेशनकार्ड मिळावे ज्यावर अंत्योदय योजनेप्रमाणे धान्य मिळावे . ७) विधवांची पेन्शन वाढवून ती महिन्याच्या १ तारखेलाच त्यांना मिळावी . ८ ) खणपट्टी, पाणी पट्टीत सवलत मिळावी . ९ ) राष्ट्रीयकृत बँकातून विधवांना शुन्य टक्के व्याज दराने शेती, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज मिळावे . १० ) एस . टी ., रेल्वे, विमान प्रवास भाड्यात सवलत मिळावी . ११ ) शासकीय नोकरीत आरक्षण मिळावे . १२ ) विधवांचा ” विधवा ” असा उल्लेख न करता *”सक्षम महिला “* किंवा *”सक्षम कुटूंबकर्ती “* असा शासकीय व्यवहारात गौरवपूर्ण उल्लेख केला जावा . अशी आग्रही मागणीही सादिक खाटीक यांनी या मान्यवरांकडे केली आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *