पुरूषोत्तम निब्रड : एक प्रेरणादायी सहवास : उर्जेचा स्त्रोत

युवकांचा तारणहार

# माणूसपण जपणारं व्यक्तिमत्त्व.

निसर्गाने आपल्याला मानवी देह प्रदान केला आणि माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध करून दिली . मग त्या जगण्याचं सोनं करायचं की माती हे ज्याचे त्याच्या हाती असते. बऱ्याचदा आपली संगत , वावर , सहवास वा कल कोणत्या वैचारिकतेचा आहे किंवा आपण कोणत्या प्रकारच्या प्रवाहासोबत वाहतोय हे तितकेच महत्वाचे ठरते . कुणाच्या परीसस्पर्शाने आपल्या जीवनाचे सोने होत असेल तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही. असाच मला गेल्या अनेक वर्षापासून लाभलेला जीवन सुसह्य करणारा सहवास म्हणजे पुरूषोत्तम निब्रड .

भरकटलेल्या अवस्थेत आपण आपली वाट शोधत असताना अचानक कुणीतरी आपला हात धरून आपल्याला यथायोग्य जागी उभे करून यशाकडे जाणारा मार्ग दाखवत असेल तर आपल्याला जीवनाची वाट व योग्य दिशा सापडली म्हणायला हरकत नाही . पुरूषोत्तम निब्रड यांचा उल्लेख मला खरे तर ‘दिशादर्शक’ असा करावासा वाटतो . अगदी बालवयातच वडीलांचे छत्र हरवलेले पुरूषोत्तम निब्रड खचून न जाता व दु:खाचा कसलाही विलाप न करता संपूर्ण कुटुंबाचा भार आपल्या शिरावर घेवून जीवनाचा लढा जिंकण्याच्या दिशेने त्यांनी आगेकूच केली . सदोदित सकारात्मक विचार बाळगणे हे त्यांच्या यशाचे गमक आहे . खचलेला व निराशेने ग्रासलेला व्यक्ती काही काळ त्यांच्या सहवासात रमला तर निराशा झटकून ध्येयाकडे वाटचाल कशी करावी हे निव्वळ त्यांच्या दैनंदिन कार्यप्रणालीतून शिकून जाईल, इतकी उर्जा त्यांच्यात आहे . ध्येय प्राप्तीकडे जाताना कितीही अडथळे आले तरी ध्येयप्राप्ती होत पर्यंत मागे सरायचे नाही अशी जिद्द आणि चिकाटी बाळगणारे पुरूषोत्तम निब्रड मला ‘ उर्जेचा स्त्रोत ‘ वाटतात .

केवळ राजकारण हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट नाही म्हणून ते कधीही सतत पाच वर्षे राजकारणाला प्राधान्य देत नाही . समाजकार्य हा त्यांच्या अस्तित्वाचा मूळ गाभा आहे . आचरणशील वागणूक हे त्यांचे शस्त्र आहे . आचार विचाराचे तगडे शस्त्र हाती घेवून त्यांचा समाजात वावर राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची भीती त्यांना वाटत नाही .

विवेकानंद मंडळ स्थापन करून आजवर मंडळाच्या मार्फत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत . मंडळाच्या माध्यमातून गावातील युवक युवतींना स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुकर व्हावा या उदात्त हेतूने त्यांनी वाचणालय उभारले . आजतागायत अनेक विद्यार्थी तिथे अभ्यास करून सरकारी सेवेत गेलेले आहेत . युवक युवतींमधील गूण हेरून त्यांना प्रगतीची वाट मोकळी करून देणे व त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचण्यास सर्वोपचारार्थे मदत करणे यात ते धन्यता मानतात.

मोठ्यात मोठ्या हुद्द्यावर पोहचण्याइतकी क्षमता असतानाही केवळ हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना ते पद प्राप्त करता आले नाही असे असले तरी आहे त्या ठिकाणी ते कमालीचे सुखी आणि समाधानी असल्याचे भाव चेहऱ्यावर दाखवतात. आपल्या दु:खाचा बाजार मांडणे त्यांच्या प्रकृतीचा भाग नाही . स्वत:ची अडचण स्वत:च सोडवण्याचे मोठे कसब त्यांच्या अंगी आहे . याउलट दुसऱ्यांच्या अडचणीत धावून जाण्यात ते कुठेही कमी पडत नाही . आजवरच्या सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ची पदरमोड करून अनेक कार्यक्रम यशस्वी केलेले आहेत . सोबत झटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर खर्चाचा भार लादणे त्यांच्या मनास रूचत नाही .

अगदी प्रतिकूल परिस्थितीत एम. ए. बी. एड . डी. एड. झालेले पुरूषोत्तम निब्रड आज आदर्श हिंदी स्कूल गडचांदूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे . त्यांचे समाजकार्य त्यांच्या नोकरीत कधीही अडसर ठरले नाहीत . प्रामाणिकपणे पूर्ण वेळ शैक्षणिक कार्य करण्याकडे त्यांचा कल राहिलेला आहे. कर्तव्याप्रती व विद्यार्थ्यांप्रती अपार जिव्हाळा जपणारे पुरूषोत्तम निब्रड कर्तव्याला कधीच चुकत नाही. त्यामुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा आदर्श शिक्षक अशीच त्यांची ख्याती आहे . सहकारी शिक्षकांशी त्यांचे अतिशय सलोख्याचे नाते आहे . शिस्त ,संयम, जिद्द , प्रामाणिकता हे त्यांचे प्रमुख अस्त्र आहे . कितीही दु:ख असले तरी हळवेपणाचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. दु:ख बाळगत बसल्याने किंवा हळवेपणामुळे प्रगतीच्या मार्गात बाधा येते, असे ते सांगतात.

राजकारण करत असताना त्यांनी आपल्या गणगोतांवर अथवा मित्र परिवारावर आपल्या बाजूने असण्याचा वा राजकारणात आपल्याला मदत करण्याचा कधीही आग्रह धरला नाही अथवा गणगोत ,आप्तेष्ट वा मित्रांवर कधीही नाराज झाले नाहीत . कोणी कोणत्या पक्षात रहावे हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे पण नाते कधीही तुटू नये इतकी निर्मळ भावना जपणारे पुरूषोत्तम निब्रड समाजकारण व राजकारण करत असतांना माणूसपणही तितक्याच तन्मयतेने जपतात . आपल्या अपयशाचे खापर इतरांनवर न फोडता नम्रपणे पराभव स्वीकारून आत्मचिंतन करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य.

सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा सहवास असला तरी ते व्यसनाला कधीही शिवले नाही . मुळातच त्यांना व्यसनाचा प्रचंड तिरस्कार आहे. निष्कलंक चारित्र्य असलेले पुरूषोत्तम निब्रड मानवतावादी विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत . उगाच कुणाला उपदेश करणे त्यांना आवडत नसले तरी त्यांना अतिप्रिय असलेले लोक चुकीचे वागल्यास ते अस्वस्थ होतात . त्यावेळी त्यांचा क्रोध शिगेला पोहचतो आणि तेवढ्याच संयमाने ते स्वत:ला सावरतातही.

ते नेहमीच इतरांना मंच देत आलेले आहे . स्वतः मंचावर जाणे बहुतेकवेळा ते टाळतात . स्वागत करण्यापासून तर प्रास्ताविक, संचालन तथा आभार प्रदर्शानापर्यंतची संधी ते युवकांना देतात . आत्मप्रौढी मिरवणे त्यांच्या तत्वात अजिबात बसत नाही . अमुक कार्यक्रम माझ्यामुळे पार पडला अशी आत्मप्रौढी ते कधीही मिरवत नाही . एखाद्या यशस्वी कार्यक्रमाचे श्रेय रसिक ,प्रेक्षक ,श्रोते कलाकारांना देत असले तरी पडदयामागे मेहनत करणाऱ्यांचा त्यात सिंहाचा वाटा असतो . पुरूषोत्तम निब्रड यांनी असेच सदैव स्वतःचा उदोउदो न करता पडदयामागे प्रचंड मेहनत करून आजतागायत अनेक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेले आहेत . स्वतःला प्रसिद्धीपासून कोसो दूर ठेवून इतरांना प्रसिद्धी देण्यात त्यांना आनंद वाटतो. आजच्या मी मी करण्याच्या जमान्यात स्वतःला मी पासून दूर ठेवणारे लोक दुर्मिळच .

त्यांचा राजकारणात सहभाग असला तरी त्यांनी कधीही त्यांच्या विरोधकांना त्रास दिलेला नाही वा कधीही खालच्या दर्जाचे राजकारण केलेले नाही . उलट सर्वच विरोधकांशी त्यांचे समंध अगदी सलोख्याचे राहिलेले आहेत . व्यक्तिविरोध नाही तर वैचारिक आणि तात्विक विरोध पत्करून सामंजस्यपणे पुढे जाण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. विरोधक असले तरी आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या लोकांचा सन्मान करताना त्यांच्यात कमालीची नम्रता दिसून येते . राजकारण हा आपला व्यवसाय नाही तर जनतेच्या न्यायिक हक्काचा लढा आहे ही त्यांची विचारसरणी . ‘ माणूस ‘ त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे आणि माणुसकी त्यांचा परीघ . त्या परीघाबाहेरील वर्तन त्यांना अमान्य आहे . तत्वाशी तडजोड करणे त्यांना कधीही जमले नाही .

आपल्यातल्या कोणत्याही कलेचे आजवर त्यांनी प्रदर्शन केलेले नसले तरी ते एक चांगले कवी , लेखक व उत्तम वक्ते आहेत . शेतीमातीशी घट्ट नाते जपणारे पुरूषोत्तम निब्रड उत्कृष्ट शेतकरी आहेत . कुठल्याही कामाची लाज न बाळगता नेहमीच आपल्या कर्तव्याला महत्व देणारे पुरूषोत्तम निब्रड स्वतःला व्यस्त ठेवण्यास प्राधान्य देतात . आजवर अनेक गरजूंना कसलाही उहापोह न करता त्यांनी यथार्थ मदत केलेली आहेत . समाजातील कोणतीही व्यक्ती अडचणीत असेल तर रात्री बेरात्री जीवाची पर्वा न करता धावून जाण्यात त्यांनी कधीही हयगय केलेली नाही . सामाजिक दायित्व जपण्यात कधीही कसर न सोडणारे पुरूषोत्तम निब्रड आपल्याकडे समाजाचं देणं लागते माणणाऱ्यांपैकी एक आहेत .

माझ्या जीवनात पुरूषोत्तम निब्रड यांचे अनन्यसाधारण महत्व आहे ते माझ्या जगण्याचा आधार आहे मी आजवर जे काही थोडेफार करू शकलो ते पुरूषोत्तम निब्रड यांच्या लाभलेल्या सहवासामुळेच . हा सहवास मला शेवटच्या श्वासापर्यंत लाभो हीच सदिच्छा . आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो हीच आपल्या जन्मदिनी शुभ कामना .

‘ देखे तो बहोत पर आपसा नही देखा ‘

लेखक
सतीश जमदाडे, नांदा
संपर्क :- 8180089765

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *