👩‍🦰 आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतांना यातून “खरंच भारतीय महिला सशक्त झाल्या आहे काय ?

✍ पंडीत लोंढे
—————————————-

८ मार्च हा दिवस “जागतिक महिला दिन” म्हणून दरवर्षी साजरा होतोय. यासाठी हा दिवस साजरा होण्याचे महत्व समजून घेणे महत्वाचे आहे,जागतिक महिला दिन म्हणजे समाजातील कर्तृत्ववान महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करुन दाखवून इतर महिलांना प्रेरित करण्यासाठी व त्यातून एक उच्च प्रतिचा समाज उभा करण्यासाठी तसेच महिलांना स्वयंसिद्ध व आत्मनिर्भर होण्यासाठी आणि काळाची पावले ओळखून पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा “सन्मान दिन” म्हणजे “आंतरराष्ट्रीय महिला दिन” होय.यासाठी हा दिन साजरा होतो व तो या अशा बहुआयामी उद्देशाने व्हावा.हा निखळ उद्देश यामागचा आहेत.
वंदनिय राष्ट्रसंत स्त्रीचं महत्वा समाजाला पटवून देतांना ग्रामगीतेत म्हणतात,

“जिच्या हाती पाळण्याची दोरी |तीच जगाते उद्धारी |
ऐसी वर्णिली मातेची थोरवी |शेकडो गुरुहुनिही ||”

भारतीय समाजातच नव्हे तर जागतिक पातळीवर स्त्रिला अतिशय महत्वाचे स्थान निर्माण व्हावे व ते झाले पाहिजे यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून असे प्रयत्न होणे तेवढेच गरजेचे आहे.म्हणून प्रत्येक महिलेनी पुरुषी अधिग्रहीत स्थितीला झुगारुन आपल्या परंपरागत दृष्टीकोणाला बगल देत स्वतःला व आपल्या मुलींना काळाच्या पावलावर चालण्यासाठी स्वार बनावे व बनवावे,हे यानिमित्ताने होणे गरजेचे वाटते. वंदनिय राष्ट्रसंतमहिलेचे महत्व सांगतांना म्हणतात,

“देवाने निर्मिली ही क्षिती | तिचे उदरी खाणी किती? |
परि माऊली जैसी दीप्ती | कोठेच नाही ||”

प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रियांनी आपले अस्तित्व निर्माण करणा-या वाटा चोखाळलेल्या असून अनेक महिला आज यशस्वी होतांना दिसत आहे.अनेक स्त्रियांनी निर्माण केलेले आपले अलग स्थान प्रेरणादायी तयार केले आहे.शिक्षणाच्या क्षेत्रात तर मुलांपेक्षा मुलींनी खुप मोठी झेप घेतलेली असून गुणवत्तेत सुद्धा मागे नक्कीच नाही.संधी जीथे जीथे मिळाली तीथे पुरुषाचे अधिन असलेले असे कोणतेही क्षेत्र नाही की जे स्त्रियांनी आता वर्तमानात काबिज केलेले नाही.आता तर भारतीय संरक्षण क्षेत्रात सुद्धा महिला जाण्यास उत्सुक असून सर्वोच्च न्यायालयाने नियुक्तीसाठी हिरवा कंदिल दाखविला आहे हे प्रगल्भ न्यायदेवतेचं प्रतीक मानावे लागेल.पुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा महिला यशस्वी जबाबदारी निभवतांना दिसतील.पुरुषी मक्तेदारी झुगारुन स्त्रीयांनी पुढे आले पाहीजे यासाठी वं.राष्ट्रसंत ग्रामगीतेतून म्हणतात,

“सर्व सोयी पुरुषाकरिता |स्रियांसाठी सर्व व्यथा | हे कोण बोलते शास्त्र आता?| द्यावे हाता झुगारोनि ||”

हे जरी खरं असंलं तरी दुस-या बाजुने विचार करता काही प्रश्न यानिमित्ताने पुढे येतात, स्त्रिया अजुनही धर्मांधता,जातीयता,प्रथा,परंपरांच्या बळी ठरतांना दिसताहेत.नुकतेच कर्नाटकातील ‘हिजाब’ प्रकरण. स्त्रियत्वांना धर्मवादाच्या कचाट्यात लटकवून शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या महिलांचा मार्ग उध्वस्त करण्या छुपा अजेंडा तर नाही ना ? असा प्रश्न समाजासमोर व तमाम स्त्री जातीसमोर उभा ठाकला असेल..धर्मवादात,जातीय परंपरा,रुढी ह्या स्त्रियांनीच पाळाव्या हा पुरुषी मक्तेदारीचा मक्ता आजही वर्चस्वात दिसतो आहे.स्त्रियांनाच हा धार्मिक कडवटपणा अंगीकारणाचा हट्टास का असावा ? कोणताही धर्म व त्या त्या धर्मानुसार वागणे ही खाजगी बाब असतांना भारतासारख्या पुरोगामी विचाराच्या चळवळीचा देश असतांना या देशात स्त्रियांबाबत हिजाब सारखे निर्बंध लावणे ही बाब स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर गदा आनणारी नक्कीच आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात सुद्धा देशातील पहिल्या महिला डाँक्टर झालेल्या आनंदीबाईं जोशी सुद्धा वैद्यकीय शिक्षण परदेशात घेतांना लुगडं पातळ घालून पदर डोक्यावर ठेऊन वैद्यकीय शिक्षण घ्यावे लागले.हा ऐतिहासीक दृष्टांत आहे. यासारख्या उच्च शिक्षित महिलांना आपला परंपरागत वेष आणि डोक्यावरचा पदर न पडू देण्याच्या परंपरा आपण पाहिल्या.ज्या देशात महिलांना चांगले सन्मानाचे दिवस यावे यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी स्त्री मुक्तीसाठी काम केले, तरी या देशात स्वातंत्र्यानंतर संविधानाने प्रदानलेले स्त्रीपुरुष समानतेचे कायदे रचले असतांना सुद्धा त्यांना जगण्याचे अनेक खाजगी अधिकार नाकारले जाते. महिलांनाच निर्बंध का असावे ? हा प्रश्न समाजातील असंख्य महिलांसमोर आजही आहे.मग खरंच हा महिला दिवस साजरा होऊन महिला सक्षम बनतिल ? आज महिला सूरक्षित आहे का ? प्रत्येक घरात महिलांना समान दर्जा दिला जातो काय ? यावर समाजाला मंथन करण्याची गरज आहे. दररोज स्त्रियांच्या यशस्वी कार्याच्या बातम्या कानावर येतांना दिसताहेत.गुणवत्तेत १० वी,१२ वी,पदवी च्या निकालात अनेक मुली गुणवत्तेत मुलांपेक्षा समोर दिसतात.पण त्याच गुणवत्ताधारक मुली मात्र ती गुणवत्ता कायम ठेवण्यात तर नाही पण विवाहोत्तर कुठेही दिसत नाही.त्या कौटूंबिक पुरुषी वर्चस्वाच्या रुढी,परंपरात गुरफटून समाजाच्या गुणवत्तेच्या प्रवाहातून गायब झालेल्या आहेत.असे वास्तव समाजासमोर प्रश्न उभा करुन आजही आहे. असे का घडत असावे ? असे खुप असले तरी रोज स्त्रियावर होणारे पुरुषी अत्याचार दृष्टीआड करुन चालणार नाही आहे.आजच्या स्थितीत विचार केल्यास वर्तमानपत्रात, सोशल मिडियात रोज स्त्री अत्याचाराची बातम्या येतांना दिसत आहे.त्यामुळे वरिल स्थिती जरी स्त्रीयांच्या प्रगतीच्या आलेखाचे स्तंभ समाधानकारक वाटत असले तरी दुसरीकडे मात्र महिलांवर रोज होत असलेले अत्याचार व तिच्याकडे कामपिपासू दृष्टीतून बघण्याचा वाढता दृष्टीकोण हा समाजाला नक्कीच कलहाच्या मार्गाकडे नेणारा दिसतो.समाजात सामाजीक मुल्ये यांचे होत असलेले अधःपतन यानिमित्ताने प्रकर्षाने समोर येत आहे.आज देशात अनेक अल्पवयीन मुली पुरुषी वासनांधतेच्या शिकार होत आहेत,ही बाब सशक्त समाज उभा होण्यासाठी अडसर ठरत आहे.चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार होतो,तीचे वासनांध नराधम लचके तोडतांनाच्या बातम्या वर्तमानपत्रातून आम्ही स्वातंत्र्याच्या अमृतवर्षीय वर्षात सुद्धा वाचत आहो.या देशात निर्भया सारखे ,हैद्राबाद डाँ. प्रियंका या युवतीवर झालेला अत्याचार व जळीतखुन, हिंगणघाट जळीतकांड,औसा येथील लैंगिक अत्याचार व खुन यासारख्या घटना स्त्रियांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करित आहेत. मात्र या परिस्थितीत न्याय मिळविण्यासाठी वयाची ७५ वर्षापर्यत न्यायालयाची दरवाजे झिजवावी लागते,हे आमच्या स्त्रिजातीचं दुर्भाग्य आजही लपत नाही.त्याच स्त्रिया या महिला दिनाचे निमित्ताने समाजाले वरिल सर्व प्रश्न विचारताहेत.
खरंच या देशाची सामाजिक, राजकीय व्यवस्था आम्हाला न्याय देतील काय ? वास्तव याहुनही वेगळे आहेत.न्यायव्यवस्थेबाबत एक नकारात्मक मानसिकता समाजात बळावत चालली आहे,जी प्रबळ लोकशाही म्हणुन मिरविणा-या प्रत्येक भारतियांना शरमेने मान खाली घासायला लावते आहे.
आज जे अत्याचार दिसताहेत ते अत्याचार का बरं होत आहेत ? पूरुषांमधील पुरुषी अहंभाव ,वाढत जाणारी भ्रष्ट विकृत विचारसरणी व बुध्दीमत्ता आहे. अशी पुरूषी मक्तेदारी स्त्रियांना तीच्या स्वातंत्र्यापासून दुर करित आहेत.तीला आजही अबला व पराधिन म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.तीच्या कौटुंबिक स्थानाकडे लक्ष दिल्यास,हे दिसून येते की,दिवसभर राबत असलेली कामवाली मावशी कसेबसे पाच पन्नास रूपये मिळवतात.व घरी आल्यावर तीची सारी कमाई नवरा हिसकून घेतो.आणि तीला प्रसंगी नवरेशाहीच्या अत्याचारास बळी पडावे लागते.प्रसंगी शारीरिक मारही खावा लागतो हे आपण सभोवताल अनुभवतो.

आजची स्थिती अशी की,सामान्य शेतकरी,शेतमजूर शेतात घाम गाळून एवढे पैसे मिळवू शकत नाही की,आपल्या मुलीला चांगले शिक्षण देईल. ते देऊ शकत नाही.शिक्षणाचा तीचा अधिकार तीच्या पासून हिरावला जातोय,हे वास्तव लपविता येत नाही.वर्षभर तीच्या अवहेलना आणि फक्त ८ मार्चलाच महिलांच्या कर्तुत्वाचा डांडोरा पिटायचा का? वर्षाच्या ३६५ ही दिवस सूध्दा त्यांचे हक्क,अधिकार, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी, महिलांचा आदर घराघरात होतो काय ? स्थिती त्याहून वेगळी आहेत.ते सर्व तीला मिळाले पाहीजे.फक्त तीने कर्तव्यच पार पाडायचे,अशी कायम अपेक्षा धरून असलेला पुरुषी तोरा,खुप काही सांगुन जातो.मग यावर समाजातील प्रत्येक घटकांनी चिंतन करणे गरजेचे आहे.
प्रत्येक घरात आईने आपल्या मुलांवर असे संस्कार केले पाहीजे की,मुलांनी माझी आई,बहिण समजून प्रत्येक महिलेचा आदर केला पाहीजे.आणि ही गरज तुमची,आमची,माझी, देशाची,समाजाची सर्वाची आहे. तरच समाज निकोप जन्माला येतील.स्त्रियांनी स्वतःमधील आपल्या अबलत्वाच्या मानसिक बेड्या तोडून पुरूषी कर्तृत्व स्वतःत विकसित केले पाहीजेत.प्रत्तेक स्त्रीने “मी अबला नाही तर सबला आहे” हे अंगी बानविले पाहिजेत,स्वतः व स्वतःच्या परिवारात सदैव सुसंवाद सुरू ठेवून,प्रत्तेकांनी आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी पुरुषी मानसिकता बदलविली पाहिजे तरच अपेक्षित समाज उभा होऊन स्त्री सुरक्षित राहील, शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,

” अंधार खूप झाला एक पणती पाहिजे,या देशातील महिलांनी जिजाऊँच्या संस्काराची स्वतःत गणती केली पाहीजे..!”

या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनी’,देशातील समस्त महिला वर्गांचे आत्मबल वाढविण्यासाठी आणि तिला कर्तृत्ववान,निर्भय बनण्यासाठी प्रेरणादायी शुभेच्छा !!!!
—————————
✍ पंडीत लोंढे (पद.शि.)
जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा,
पं.स.भद्रावती.जि.चंद्रपूर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *