अफवांवर विश्वास ठेवू नका; कोरोना लसीकरणाला सहकार्य करा

महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे मुस्लिम मौलवी, मशीद पदाधिकाऱ्यांना आवाहन

चंद्रपूर, ता. १५ : चंद्रपूर शहरातील १८ वर्षापेक्षा जास्त वयोगटातील ८० टक्के व्यक्तींनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली. मात्र, काही भागात अद्यापही टक्केवारी कमी आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखून धरण्यासाठी अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना लसीकरणाला सहकार्य करा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

महानगरपालिकेने शहरातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी राणी हिराई सभागृहात सोमवारी (ता. १५) मुस्लिम मौलवी, मशीद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांची उपस्थिती होती.

ज्यांनी कोवीड लस सध्या घेतली नाही, अशा सर्व मुस्लिम बांधवासाठी विशेष लसीकरण शिबीर घेण्यात येईल. त्या ठिकाणी जाऊन लसीकरणाचे डोस घ्यावे व कोरोनापासून आपले तसेच आपल्या परिवाराचे जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. मौलाना, धर्मगुरू, तसेच समाजातील डॉक्टर, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लसीकरणाबाबत लोकांच्या मनामध्ये असणारे गैरसमज दूर करून लोकांना लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनदेखील केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले की, चंद्रपूर शहरातील एकूण लसीकरणास पात्र नागरिकांपैकी ८० टक्के लसीकरण झाले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत १०० टक्के लसीकरणाचा टप्पा पूर्ण करायचा आहे. शहरातील इंदिरानगर, श्यामनगर, बंगाली कॅम्प, हवेली गार्डन, राष्ट्रवादीनगर, रहेमतनगर, एकोरी वॉर्ड, घुटकाळा, जलनगर, अष्टभुजा, हिंगलाज भवानी, जुनोना फाटा, दादमहल, तुकूम, लालपेठ, वैद्यनगर, भिवापूर परिसरात लसीकरणाची टक्केवारी अत्यल्प आहे.

या बैठकीत सर्व मौलवी व मशीद पदाधिकाऱ्यांनी आपल्या धर्मातील नागरिकांना लसीकरण करुन घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मौलवी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतःदेखील लसीकरण केल्याचे सांगत दर शुक्रवारी नमाज अदा झाल्यानंतर लसीकरणासाठी प्रवृत्त करीत असल्याची माहिती दिली. काही पदाधिकाऱ्यांनी विशेष आरोग्य शिबीर आणि लसीकरण शिबीर घेण्याची विनंती केली. ज्या भागात ठिकाणी अद्यापही लसीकरण म्हणावं तसं झालेलं नाही, त्या ठिकाणी मौलवी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण केलं जाईल, असे महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थितांचे आभार डॉ. आरवा लाहेरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here