म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
⭕*गरीब रूग्‍णांसाठी या उपचाराचा समावेश महात्‍मा ज्‍योतिबा फुले जनआरोग्‍य योजनेत करावा*

कोराना उपचारादरम्‍यान देण्‍यात येणा-या स्‍टेरॉईडमुळे रूग्‍णांना अतिशय गंभीर साईड इफेक्‍टचा सामना करावा लागत आहे. म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य संसर्गाचे गंभीर परिणाम रूग्‍णांवर होत आहेत. राज्‍यभरात अशा रूग्‍णांच्‍या संख्‍येत वाढ झाल्‍याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदविले आहे. अशा वेळी रूग्‍णाने सतर्क राहत वेळीच निदान आणि उपचार घेणे गरजेचे आहे. यासंदर्भातील प्रतिबंधात्‍मक इंजेक्‍शन्‍स महागडे आहे, शस्‍त्रक्रियेचा खर्च देखील सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या आवाक्‍या बाहेरचा आहे. त्‍यामुळे या बुरशीजन्‍य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्‍या, विशेषतः अॅम्‍फोटरसीन –बी हे इंजेक्‍शन प्रतिबंधक इंजेक्‍शन कमी किंमतीत उपलब्‍ध करावे तसेच गोरगरीब रूग्‍णांच्‍या सोयीच्‍या द़ष्‍टीने या उपचाराचा समावेश महात्‍मा ज्‍योतीबा फुले जनआरोग्‍य योजनेत करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाला केली आहे.

यासंदर्भात राज्‍यपाल, मुख्‍यमंत्री, आरोग्‍यमंत्री, आरोग्‍य विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्‍या पत्रात आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे की, रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाल्‍यामुळे ब-या झालेल्‍या कोविड रूग्‍णांमध्‍ये हा दुर्मिळ संसर्ग आढळत आहे. कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेच्‍या तुलनेत या लाटेत म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीजन्‍य आजाराचे रूग्‍ण वाढले आहेत. याचा म़त्‍युदर हा 54 टक्‍के असुन वेळेवर उपचार घेतल्‍यास आजारातुन बाहेर पडता येते. नाकावाटे ही बुरशी डोळे आणि मेंदुकडे वाढत जाते. लवकरात लवकर निदान झाल्‍यास इंजेक्‍शनच्‍या माध्‍यमातुन उपचार करता येतात. कोरोना उपचारादरम्‍यान वापरल्‍या जाणा-या स्‍टेरॉइडमुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते. सामान्‍यतः श्‍वास घेताना युब्‍युक्‍युटस नावाचे जिवाणू नाकामध्‍ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्‍ती संतुलीत नसेल तर म्‍युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्‍याधी असलेल्‍या लोकांमध्‍ये या बुरशीच्‍या संसर्गाची वाढत होत आहे.

या बुरशीच्‍या संसर्गाचा वेग सर्वाधीक असुन उपचारासाठी वेळ कमी मिळतो. लवकर निदान झाले तर इंजेक्‍शन द्वारे उपचार शक्‍य होतो. जर उशीर झाला तर शस्‍त्रक्रिया करण्‍याची वेळ येते. डोळयांपाशी संसर्ग पोहचल्‍यास त्‍यांना कायम स्‍वरूपी इजा होण्‍याची शक्‍यता असते. अनेक रूग्‍णांचे डोळे यामुळे काढले गेले आहे. हा संसर्ग मेंदु पर्यंत पोहचल्‍यास उपचार करणे दुरापास्‍त होते व रूग्‍णांचा मृत्‍यु होतो.

यासाठी अॅम्‍फोटरसीन –बी हे इंजेक्‍शन प्रतिबंधक इंजेक्‍शन आहे. याची किंमत 40 ते 45 हजार इतकी आहे. ती सर्वसामान्‍य गरीब रूग्‍णाला परवडणारी नाही व एकुणच भारतात हे इंजेक्‍शन्‍सचा साठा संपल्‍याची मा‍हिती आहे. त्‍यामुळे या इंजेक्‍शन्‍सचे उत्‍पादन मोठया प्रमाणावर करून कमी किंमतीत हे इंजेक्‍शन उपलब्‍ध होणे आवश्‍यक आहे. कारण या पुढच्‍या टप्‍प्‍यात जर शस्‍त्रक्रिया करावी लागली तर त्‍याचा खर्च किमान दिड ते दोन लाख असल्‍यामुळे सर्वसामान्‍य गरीब रूग्‍णाला ते परवडणारे नाही.

या बुरशीजन्‍य आजाराचा संसर्ग रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने मार्गदर्शक तत्‍वांमध्‍ये बदल करणे अत्‍यंत गरजेचे आहे. प्रामुख्‍याने कोरोना रूग्‍णांवर उपचार करतांना अत्‍यल्‍प प्रमाणात स्‍टेरॉईडचा वापर करणे आवश्‍यक आहे. त्‍याचप्रमाणे उपचारादरम्‍यान अॅन्‍टी फंगल औषधे रूग्‍णांना देण्‍याची आवश्‍यकता आहे. प्रामुख्‍याने हाय रिस्‍क असलेल्‍या रूग्‍णांमध्‍ये हा संसर्ग आल्‍यास धोका जास्‍त आहे. त्‍यातही ऑक्‍सीजन पाईपलाईन, सिलेंडर यात हा जंतु गेल्‍यास त्‍याचा प्रादुर्भाव आणखी वाढण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यादृष्‍टीने सुध्‍दा उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. विशेषतः गोरगरीब नागरिकांच्‍या सोयीच्‍या द़ष्‍टीने यासंदर्भातील उपचाराचा खर्च महात्‍मा ज्‍योतीबा फुले जनआरोग्‍य योजनेत समाविष्‍ठ करणे गरजेचे आहे. त्‍यामाध्‍यमातुन मोठया प्रमाणावर गरीब रूग्‍णांना मोठया प्रमाणावर लाभ मिळेल.
कोरोनाचे संकट मोठे आहे मात्र त्‍यानंतर सुध्‍दा या बुरशीजन्‍य आजाराच्‍या माध्‍यमातुन रूग्‍णांच्‍या जिवाला धोका आहेच. त्‍यादृष्‍टीने प्रतिबंध घालण्‍यासाठी शासनाने तातडीने पावले उचलत वरील प्रमाणे उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *