आम्ही निष्ठावंत, काँग्रेसमध्येच आहोत, अफवांवर विश्वास ठेवू नका : आ. सुभाष धोटे

By : Shankar Tadas
चंद्रपूर : माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपा प्रवेशाच्या बातम्या सर्वत्र झळकत असताना त्यांच्यासह काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्तही पसरविण्यात येत आहे. त्यात राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे नावही इलेक्ट्रॉनिक मीडियातून पुढे आल्याने चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात बरीच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असलेले आ. सुभाष धोटे यांनी मात्र आपण काँग्रेसशी एकनिष्ठ असून जिल्ह्यातील सर्व आमदारही पक्षासोबत आहेत. म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. आपल्याबाबत समाजमाध्यमातून तसेच काही इलेक्ट्रॉनिक मीडियामधून खोडसाळपणे, निराधार वृत्त पसरविण्यात आलेले आहे. माझे वडील काँग्रेसमध्येच होते. युवा अवस्थेपासून आपण काँगेसशी एकनिष्ठ आहोत. पुरोगामी विचाराशी बांधिलकी असलेल्या काँगेससोबतच आपण स्वतः तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार असून कोणीच भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. जिल्ह्यात काँग्रेसची बाजू भक्कम असून येत्या निवडणुकीत लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा काँग्रेसच जिंकेल असा विश्वासही आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here