घर नको..घरासाठी जागा द्या; शासन दरबारी बेघर स्वातंत्र्य सैनिकाचे बारा वर्षे टाहो… उदासीन शासकीय यंत्रणे विरुद्ध स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड स्वातंत्र्य दिनाला उपोषण करणार.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 4जुलै
गोवा मुक्ती संग्रामातील एका वृद्ध स्वातंत्र्य सैनिकाचे घर पडायला आले असून त्यांना शासकीय उदासिनतेमुळे बेघर होण्याची वेळ आली आहे. रामनाथ सखाराम गायकवाड हे स्वातंत्र्य सैनिक मागील अनेक वर्षा पासून शासनाकडे घरासाठी जागा मागत आहेत. मात्र त्यांना अद्याप शासकीय योजनेतून जागा मिळत नसल्यामुळे येत्या 15 ऑगस्टला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. शासकीय धोरणानुसार घर बांधण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या विना मोबदला जमिनीसाठी गेली 12 वर्षे मागणी आणि पाठपुरावा करत आहेत. मात्र उदासीन शासकीय यंत्रणेने वयोवृध्द स्वातंत्र्य सैनिकाच्या मागणीला दुर्लक्षित केल्याने येत्या 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड यांनी विभागीय आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला आहे.

उरण कोटनाका येथे राहणारे रामनाथ सखाराम गायकवाड (89 वर्षे) यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन देशासाठी मोठे योगदान दिले आहे.मात्र या वयोवृध्द स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग भावनेला आज शासकीय उदासीनता केराची टोपली दाखवत आहे.स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड यांचे उरण कोटनाका येथे जुने राहते घर(म्यू.घ. नं 411 अ ब क ड)आहे.मात्र सदर इमारत जुनी झाल्याने उरण नगर परिषदेने सदर इमारतीला धोकादायक इमारत म्हणून 2020 साली नोटीस दिली आहे. पर्यायाने सुमारे 30 माणसांचा कुटुंब कबिला असणाऱ्या रामनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली.त्यामुळे रामनाथ गायकवाड यांनी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे घरासाठी स्वातंत्र्य सैनिकांना मिळणाऱ्या विना मोबदला शासकीय जागेची मागणी केली. मात्र 2010 पासून या मागणीचा सतत पाठपुरावा करूनही या वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांच्या पदरी निराशाच पडली.शासकीय अनास्थेला वैतागून सखाराम गायकवाड यांनी कोकण विभागीय आयुक्त यांना एक पत्र देवून त्यांना शासकीय जागेसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल उदिग्न भावना व्यक्त केली असून त्यांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या पत्राची दखल घेत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाने रायगड जिल्हाधकाऱ्यांना एक पत्र देवून स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड यांच्या मागणी संदर्भात कायदे व नियमांच्या आधारे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

कोट (चौकट ):-
उरण तहसिल कार्यालयातर्फे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी स्वातंत्र सैनिक यांच्या जागेची पहाणी केली आहे. आणि तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. या बाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येणार असून स्वातंत्र्य सैनिकांना जागा मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे.
– भाऊसाहेब अंधारे तहसिलदार उरण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here