लोकदर्शन राजुरा 👉मोहन भारती
राजुरा ) — इन्फंट जिजस सोसायटीद्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल, राजुरा येथे दोन दिवसीय स्नेहसंमेलन उत्साहवर्धक वातावरणात मोठ्या दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे होते.
या प्रसंगी थेट जनतेतून तिसऱ्यांदा निवडून येत राजुरा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
उद्घाटक म्हणून बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरती मर्यादा न ठेवता संस्कार, शिस्त, कर्तव्यभावना आणि सामाजिक जाणीव जोपासण्यावर भर द्यावा, असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे हीच संस्थेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी राजुरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत स्वच्छ, सुंदर व हिरवेगार शहर घडविण्यासह लोकोपयोगी विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेऊन स्वतःचे व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी केले. संचालन संतोष सागर व रिना कोरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी मानले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सदस्य प्रदीप धोटे, शंतनू धोटे उपस्थित होते. तसेच प्राचार्य संतोष शिंदे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहसंमेलनात नर्सरी ते केजी-टू तसेच इयत्ता पहिली ते दहावी (सीबीएसई व स्टेट बोर्ड) शाखेतील विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, गीतगायन व संगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दोन्ही दिवसांचे संचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनीच केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
उत्साह, संस्कार आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेले हे स्नेहसंमेलन सर्वांच्या स्मरणात राहणारे ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाने विशेष परिश्रम घेतले.





