इतिहासकार अ.ज. राजूरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गौरवग्रंथ प्रकाशित

By : Shankar Tadas

चंद्रपूर : 

चंद्रपूरचे ख्यातनाम इतिहासकार अ. ज. राजूरकर यांचं २०२४ हे जन्मशताब्दी वर्ष. त्या अनुषंगाने २७ जानेवारी २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात त्यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा  पार पडला. राजूरकरांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ‘इतिहासकार अ. ज.राजूरकर स्मृती प्रतिष्ठान, चंद्रपूर’ द्वारे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहात अ. ज.राजूरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ‘चंद्रपूरचे इतिहासकार’ या इतिहासकार राजूरकर यांच्यावरील गौरवग्रंथाचे विमोचन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. चंद्रशेखर गुप्त यांच्या हस्ते झाले. तसेच ‘चंद्रपूर-गडचिरोलीच्या संशोधनाचा इतिहास’ या विषयावर राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे निवृत्त अभिरक्षक डॉ. रघुनाथ बोरकर यांचे व्याख्यान झाले आहे. त्यांनी चंद्रपूर-गडचिरोलीच्या इतिहासाचा अशमयुगीन काळापासून ते १३ व्या शतकापर्यंतचा विस्तीर्ण पट श्रोतुवर्गासमोर उलगडून दाखवला व आपल्या संशोधनाच्या आवाक्याने त्यांना मंत्रमुग्ध केले.

स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष श्री. अमित भगत यांनी चंद्रपूरला लाभलेला ऐतिहासिक ठेवा लोकांसमोर मांडत, हा समृद्ध इतिहास संवर्धित करण्यासाठी स्थानिक लोकांमध्ये असलेल्या अनास्थेवर चिंता व्यक्त केली आणि आपल्या जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी श्रोत्यांना प्रेरित केले. शासनाच्या मदतीशिवाय हा कार्यक्रम चंद्रपूरात होत असताना शासनाला आपल्या इतिहासकाराची आठवण सुद्धा न व्हावी ही किती दुर्दैवी बाब आहे असे ते म्हणाले. इतिहास आणि इतिहासकार यांचा सन्मान समाजाकडून होण्याची गरज आहे असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

चंद्रपूरातील ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व इतिहासकार राजूरकरांचे पट्टशिष्य श्री. दत्ताजी तन्नीरवार प्रकृती अस्वस्थतेमुळे गौरवग्रंथाच्या विमोचनास उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र श्री. प्रभात तन्नीरवार यांस प्रतिष्ठानने तो मान देऊन आपली जबाबदारी पार पाडली. ख्यातनाम पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी चंद्रपूरच्या भूशास्त्रीय वारश्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. तर इतिहास संशोधक श्री. शेषशयन देशमुख यांनी चंद्रपूरच्या वैविध्यपूर्ण व दुर्मिळ हस्तलिखितांवर प्रकाश टाकला. स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमित भगत यांनी विस्तृतपणे प्रतिष्ठानची भूमिका, उद्देश आणि भविष्यकालीन योजना सांगितल्या. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. पल्लवी ताजने यांनी केले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्याम वाखर्डे यांनी अश्या कार्यक्रमांची समाजाच्या प्रबोधनासाठी असलेली आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रमात डाॕ. जयश्री शास्त्री, डाॕ. दीपक लोणकर, डाॕ. योगेश दुधपचारे, श्री. आशिष देव, श्री. मदन पुराणिक, श्री. सुदर्शन बारापात्रे, श्री. देवानंद साखरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *