नागोबा ते वाघोबा निसर्गरक्षणाची चळवळ : बंडू धोत्रे

धडपडणारी माणसे…. विशेष लेख

माझी सैन्यात जाण्याची तीव्र इच्छा होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले प्रयत्न शालेय जीवनापासून पदवीच्या अंतिम वर्षापर्यंत सुरूच होते. शालेय जीवनात दूरदर्शनवरील ‘परमवीर चक्र’ मालिकेतून प्रेरणा घेत सैन्यात जाण्याचे स्वप्न बघितले; मात्र काही कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. यातच पदवीची अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही. डिप्रेशनमध्ये होतो.
………

महाविद्यालयात ‘एनएसीसी’मध्ये गिरविलेल्या धड्यातून विकसित झालेले नेतृत्वगुण, अनुशासन, संघटन यामुळे देशसेवा आणि कर्तव्याची जाणीव झाल्याने अवतीभवतीचा निसर्ग, पर्यावरण, वन-वन्यजीव यांचे संरक्षणसुद्धा महत्त्वाचे आहे. यासाठी एकत्र येत सामूहिकरीत्या संरक्षण-संवर्धनाची आवश्यकता असल्याची जाणीव झाली होती. चंद्रपूर वन-वन्यजीव आणि निसर्गामुळे संपन्न आहेच; मात्र याविषयी अनेक प्रश्न असल्याची जाणीव होती. याबाबत आपण काय व कसे कार्य करू शकतो, याकरिता इको-प्रो संस्थेची स्थापना केली. समविचारी तरुणांना सोबत घेतले. युवा कार्यकर्त्यांची चळवळ सुरू झाली. यातून देशसेवा करण्याचे समाधान मिळू लागले.
एकदा माझ्या घरालगत साप निघाला. यावेळी उडालेली तारांबळ, भीती-अंधश्रद्धा, मारणे की वाचविण्याचा पर्याय, साप पकडण्यास आलेला व्यक्ती, त्याकरिता मागितलेले पैसे, साप पकडणे साहसिक कार्य या एका घटनेने सापाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

चंद्रपूर शहर वनालगत आहे. शहरात सापाचे प्रमाण अधिक. २००४-०५ दरम्यान शहरात, घर परिसरात निघणारे साप आणि त्यापासून असलेली भीती आणि भीतीपोटी मारले जाणारे साप, सर्पदंश विषय होताच. निसर्गातील एक महत्त्वाचा घटक त्याविषयी असलेली अंधश्रद्धा, यातूनच साप मारले जात असत. साप पकडण्याकरिता काही जण शुल्क घेत. विशेषत: साप सर्वसाधारण घरांच्या परिसरात निघत असल्याने त्याचे शुल्क देणे परवडत नव्हते. त्यामुळे साप मारला जाई, सोबत सापाविषयी अंधश्रद्धा आणि भीती कायम राहायची. यासाठी पर्यावरणाचा एक घटक वाचविता यावा, नागरिकांची भीती दूर करता यावी, अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून एक सर्पमित्र म्हणून या कार्याची सुरुवात केली. त्यावेळेस निशुल्क आणि अगदी वेळेवर पोहोचणारा सर्पमित्र म्हणून अल्पावधित नावारूपास आल्याने दिवस-रात्र कॉल असायचे. शहरात आणि शहराबाहेरसुद्धा. सर्व कॉल अटेंड करणे शक्य नव्हते. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी सर्पमित्र तयार केले. २००६ मध्ये प्रत्येक वॉर्डात इच्छुक युवकांसाठी सर्पमित्र प्रशिक्षण कार्यशाळा घेतली.
यातून सर्पमित्र चळवळ शहरात व्यापक झाली. सोबतच इको-प्रोच्या पर्यावरण चळवळीची सुरुवातसुद्धा झाली. रोज पकडलेले साप वनविभागच्या उपस्थितीत नोंदणी करून सोडले जायचे.
कधी चितळ-हरीण, रानगवा, अस्वल, मोर, खवले मांजर, उदमांजर यासोबतच पुढे वाघ-बिबट, मगर आदी प्राणी रेस्क्यू करीत सेवा देऊ लागलो. वन-वन्यजीव संरक्षण-संवर्धनासोबतच वनविभागाचे कार्य शासनाचे धोरण, सभोवतालचे पर्यावरण याविषयी कळू लागले. एकंदरीत पर्यावरण मानवाच्या कल्याणाकरिता किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली. या कर्तव्यात जंगल, तलाव, नद्या, वन्यजीवाशिवाय नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण, सुधारणा करणे आणि सजीव प्राण्यांबद्दल सहानभूती बाळगणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

वन्यप्राणी जीवन समजावे, निसर्ग समजावा, जंगल-अधिवास समजून घेता यावे, त्याचे पर्यावरणातील महत्त्व समजावे यासाठी सोबत आलेले इको-प्रोचे युवा कार्यकर्ते सोबत जंगल भ्रमंती यातून जंगलवाचन जाणून घेण्याचा नवा अध्याय २००७ पासून सुरू झाला. निसर्गात जल-जंगल-जमीन-जन याविषयी कार्य करताना ‘वाघ’ किती महत्त्वाचा आहे आहे, हे समजू लागले. संपूर्ण निसर्ग संरक्षणकरिता म्हणजेच जैविविधितता संरक्षण-संवर्धनाकरिता जंगलाचे महत्त्व आहे. जंगल नद्याची ‘आई’ असते. म्हणून जंगल वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी वाघाचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. एकंदरीत जैव विविधता संरक्षणकरिता ‘वाघ वाचवा’ असे म्हटले जाते. जंगलाचे संरक्षण करायचे असेल तर वाघ वाचला पाहिजे, वाघ टिकला पाहिजे. वाघ आणि वाघ अधिवास संरक्षण-संवर्धन कसे करता येईल, यासाठी ही चळवळ अधिक व्यापक होत गेली. म्हणजेच हा प्रवास ‘नागोबा ते वाघोबा’ असा होत गेला.

अध्यक्ष, इको प्रो संस्था, चंद्रपूर
मो. ९३७०३२०७४६

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *