हिंसा मजला चालत नाही, बकरा खातो कापत नाही’ ⭕मराठी गझल मुशायराने प्रेक्षकांना रिझविले ⭕स्मार्ट ग्राम बिबीचे आयोजन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – ‘हिंसा मजला चालत नाही, बकरा खातो कापत नाही’ ही मानवाची दिखाऊ वृत्ती दाखविणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझल नांदा येथील गझलकार राम रोगे यांनी सादर केली. स्मार्ट ग्राम बिबी व कॅलिबर फाउंडेशन, गडचांदूरच्या वतीने ब्रह्मकमळ साहित्य समूह, मुंबई प्रस्तुत मराठी गझल मुशायराचे अक्षय तृतीया व रमजान ईदचे औचित्य साधून उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील गझलकार या मैफिलमध्ये सहभागी झाले होते. पंढरपूर येथील वैभव कुलकर्णी यांनी ‘दोष व्यवस्थेचा नाही हा दोष खरा तुमचा आहे, खोट्या बाजारात तुम्ही सत्याचे नाणे मागितले’ या गझलच्या माध्यमातून मानवी प्रवृत्तीवर प्रहार केला. पुढे मुंबई येथील विशाल ब्रह्मानंद राजगुरू यांनी ‘हीच पृथ्वी खरा स्वर्ग होईल, जर माणसांसारखी वागली माणसे’ ही गझल मांडून मानवता हा धर्म समजावून सांगितला.
डोंबिवली येथून आलेले आनंद पेंढारकर यांनी ‘कोण म्हणाले अंतच नसतो आठवणींना? थांबतील एका वळणावर, मी गेल्यावर’ ही गझल सादर करून जीवनातील अंतिम सत्य मांडले. ‘भरवून घास मजला, राहून ते उपाशी, लपवून भूक निजले, आईवडील माझे’ आई-वडिलांच्या अपत्यांवरील प्रेमाची ही गझल सादर करून यवतमाळ येथील रमेश बुरबुरे यांनीच प्रेक्षकांना स्तब्ध केले.
संशय हा मानवाला विनाशाकडे नेतो ‘संशयाने फाटली जर रात्र मिलनाची, सारखा अंधार मग गळणार नाही का’ या गजलेच्या माध्यमातून गडचिरोली येथील गझलकार सुरेश शेंडे यांनी वास्तव मांडले. नागपूर येथील एका अनंत नांदुरकर यांनी ‘आयुष्याचा बैल सजवतो रोजच पोळा करतो, जुनी गोधडी उसवुन घेतो नवीन खोळा करतो’ ही आजच्या समाजातील खरी परिस्थिती समोर आणली.
‘दिला भाव मोठा म्हणे तू उसाला, जरा घे कडेवर मुक्या कापसाला’ या गझलच्या माध्यमातून बल्लारपूर येथील राजेश देवाळकर यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचे वास्तव मांडले. गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष अमरावती येथील नितीन देशमुख यांनी ‘ताऱ्यांमधले अंतर सोडा माणसातले मोजा, जवळिकतेची गरज माणसा ग्रहताऱ्याला नाही’ ही गझल सादर करून माणसा माणसा मधला असलेला दुराव्यावर प्रहार केला.
अकोला येथील अविनाश येलकर यांनी ‘जोडतो मी हात बाबा फास घेवू नका, वेळ आली जर तशी आभाळही नांगरू’ गझल सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. नांदेड येथील मारोती मानेमोड यांनी ‘लोक बघतिल उत्तरेकडे सारखे, जन्म अपुला एक ध्रुवतारा करा’ ही गझल सादर करून युवकांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुंबई येथील संदिप मर्ढेकर सुद्धा सहभाग घेतला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता व सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्रातील १२ गजलकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. गझल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत नांदुरकर यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *