पं कल्याणजी गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा कंठसंगीत पुरस्कार..

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन मुंबई👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वारकरी संप्रदायाचे भूषण पं कल्याणजी गायकवाड यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून कंठ संगीत हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते मुंबई येथील पु ल देशपांडे सभागृहात मिळाला.. ख-या अर्थाने वारकरी संगीताचा हा बहुमान आहे..

सुसंस्कारित सुरांचे जादूगार पं कल्याणजी गायकवाड..

नादब्रम्ह तो ओंकार
संगीताचे सप्तसूर
संवादिनीचे स्वर झंकार
भजन होय साकार

आरोह, अवरोह, अलंकार
सजुनी राग करी गुनगाण
आलाप, ताल मधुर लय
स्वर कल्याण, स्वर कल्याण…

पं कल्याणजी गायकवाड यांनी जादूई स्वरांनी, आवाजातल्या पावित्र्यानं स्वरकल्याण गुंफला. त्यांच्या कंठातून उमटणारे स्वर. समुद्रमंथनातून बाहेर आलेला अमृतकुंभ जणू त्या आळंदीच्या ज्ञानेशानं कल्याणजींच्या कंठात ओतूनच त्यांना इहलोकात पाठवलं असावं. गुरूजींनी पण ते स्वरामृत मुक्त कंठानी ऐकवल आणि सर्व वारकरी संप्रदायातील श्रोते जणांना अक्षरशः स्वरामृताच्या वर्षावात भिजवलं…
जालना जिल्ह्यातील बारसवाडा या खेडेगावात पं कल्याणजी गायकवाड यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच कल्याणजींना भजन गायनाची आवड, हीच आवड त्यांना स्वस्थ बसून देईना वयाच्या १२ व्या वर्षी घरदार सोडून कल्याणजी भजन शिकण्यासाठी श्रीक्षेत्र आळंदीत आले. घरची परिस्थिती बेताची त्यामुळे पैशाची कमतरता, अशाच परिस्थितीत कल्याणजींनी आळंदीतील सिद्धबेट येथील वैकुंठवासी जयराम महाराज भोसले यांच्या धर्मशाळेत आश्रय मिळवला. दररोज चार घरी जाऊन मधुकरी मागायची, तीच खाऊन गायनाचा रियाज करायचा. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे अंतरीच दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखण्यासाठी कसरत करायला लागते. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो. जगण्याचे सूर सापडले की, आयुष्याला सौंदर्याचे साज सहज चढवता येतात. सद्विचारांचे साज लेवून आयुष्याला देखणेपणाच्या कोंदणात अधिष्ठित करावे लागते. सौंदर्याचे ताटवे उभे करून लक्ष देऊन सांभाळावे लागतात. आयुष्यात सकारात्मक विचारांना सांभाळता आले की, जगण्याला सजवणे सुगम होतं, हेच जीवनाच सोप वर्म कल्याणजींना सापडल आणि संगीत क्षेत्राची वाटचाल जोमाने सुरू केली.
साधना, रियाज व चिंतन या त्रिसूत्रीच्या आधारे व संगीत, शास्त्र, स्वर, ताल तसेच विविध राग, आरोह अवरोह यांचा सखोल अभ्यास करून पं कल्याणजी गायकवाड यांनी आपली गायकी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे. आपल्या वारकरी संप्रदायातील भजनाला काय अनुरूप ठरेल याचे खास चिंतन करून स्वरांतील सौंदर्य व भाव अचूकतेने, समर्थतेने पेलणारी स्वत:ची वैशिष्ट्यपूर्ण अशी गायकी निर्माण करण्यात पं. कल्याणजी गायकवाड हे यशस्वी ठरले आहेत.

हा तो त्याग तरूवरू! जो गा मोक्षफळे ये थोरू! सात्विक ऐसा डगरू! यासीची जगी!!

ज्ञानोबाराय म्हणतात झाड स्वतः उन्हात उभे राहते परंतु इतरांना सावली देते. झाड फळ, फुल पानं, खोड पण इतरांना समर्पित करते, कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा नसलेलं झाड त्यागी पुरूषाचे महान प्रतिक आहे. असेच कार्य पं कल्याणजी गायकवाड यांचे आहे. कोणत्याही शिष्याकडून संगीत शिक्षणाचे मानधन न घेता मोफत शिकवून त्या शिष्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अभंग गायनाची कला अविरतपणे शिकवीत आहेत. हजारो शिष्यांचा गुरू होणं खरच सोप नाही, वारकरी संगीत क्षेत्रात अनेक उदयोन्मुख गायकांची पिढी कल्याणजींनी घडवली त्यामध्ये गायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड, आदिनाथ सटले, वैभव थोरवे, ज्योती गोराणे, तुळशीराम आतकरे, सदानंद मगर, अश्विनी मिठे, पूनम नळकांडे, निकिता बहिरट यांचा आवर्जून नामोल्लेख करावा लागेल…
पं. कल्याणजी गायकवाड यांचा सहवास म्हणजे दुग्ध शर्करा योगच हा योग पुर्वी कायम असायचा पण माझ्या कामामुळे व माझ्या फिरण्यामुळे हा योग येत नाही. तरीही महिन्यात एकदा तरी हा योग येत असतो. वारकरी सांप्रदायाशी अतुट नाते माऊली वर नितांत श्रद्धा असलेले गुरूजी यांच्या सहवासात संगीत आणी आध्यात्म या दोन गोष्टी भरभरून ऐकायला मिळतात. माणूस जन्माला येतो राबराबतो बरोबर काहीच घेऊन जात नाही. पण आपल्या पुढच्या पिढीचा मार्ग सोपा व्हावा या साठी थोडीशी धडपड करावी लागते. जीवनात कुठे थांबायचे हे वारकरी सांप्रदाय शिकवते पण या कडे कोणाचे लक्ष नाही असे दिसते. आनंदमयी जीवन जगणारे गुरूजी हे मात्र विसरत नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर जगाच्या काना कोप-यातील माणस गुरूजींना ओळखतात. पण कुठे ही याचा मोठेपणा त्यांच्या अंगी जाणवत नाही. अजुनही माणुसकी पहिल्या सारखीच, माणसाचा आदर लहान असो वा मोठा त्याला मार्गदर्शन हि वृती वाखाणण्याजोगी आहे. मी भरपूर ठिकाणी त्यांच्या सोबत कार्यक्रमाचे निमित्त फिरलो अफाट प्रेम अफाट श्रद्धा गुरूजींवर असलेली माणसे भेटतात, ती असे गुरुजींचे कौतुक करतात की बरोबर असणा-यांचा उर भरून येतो अभिमान वाटतो. गुरूजी भजन गाताना रसिकांच्या हदयाची तार अशी छेडतात की ऐकणा-यांच्या डोळ्यात आपोआप अश्रू तरळतात. यांचा अर्थ असा की गुरूजी अभंग गाताना माऊलींशी एकरूप होतात. त्यांच्या स्वर कंठातुन निघालेली एक एक हरकत आपोआप दाद द्यायला भाग पाडते आणी रसिकांच्या मुखातुन एकच शब्द बाहेर पडतो वा क्या बात है. वारकरी सांप्रदायाच्या कोणत्याही संतांच्या मंत्र रूपी अभंगाला चित्रपटांच्या किंवा उडत्या चाली नसाव्यात हि गुरूजींची प्रांजळ इच्छा ते कायम बोलुन दाखवतात. आज गुरूजींनी स्वता बनविलेल्या चाली वारकरी सांप्रदायातील गुणीजन मोठ्या अभिमानाने गातात. या चाली इतक्या गोड असतात की ऐकणा-याला आपोआप समाधी लागते. मी प्रवासात असलो की कायम गुरूजींचे अभंग ऐकतो प्रवासात साक्षात ब्रम्हरस अवतरतो आणी माझा प्रवास सुखकारक होतो..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *