नागपूर बनणार “मेडिकल आणि “एज्युकेशनल हब” : डॉ. नितीन राऊत

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉

*” हॅपी स्ट्रीट” उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर : नागपूर शहर आता “मेडीकल हब” आणि “एज्युकेशनल हब” बनू लागले असल्याची माहिती नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तरुणाईशी बोलताना दिली.
निमित्त होते, महाराष्ट्र टाईम्स वृत्तसमूहातर्फे धरमपेठच्या वेस्ट हायकोर्ट रोडवर आयोजित “हॅपी स्ट्रीट” या आनंददायी उत्सवाचे ! नागपुरातील तरुणाईने या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रचंड जल्लोष साजरा केला. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि इतर अतिथींच्या हस्ते आकाशात फुगे सोडून या उत्सवाचा शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी आर. विमला, मनपा आयुक्त राधाकृष्ण बी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, रोचलदास शो रुमचे मालक हरीश केवलरामाणी आदी उपस्थित होते.
डॉ. राऊत म्हणाले, देशात युवकांची संख्या ५० टक्के असून या युवा वर्गाला जल्लोष आणि उत्साह साजरा करण्यात आनंद वाटतो. नागपुरात फुटाळा तलाव येथे युवा वर्गाला व्यक्त होण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. त्याठिकाणी आता गॅलरी उभारण्याचे काम सुरू आहे. ही गॅलरी फुटाळा तलाव आणि युवा वर्गादरम्यान भिंत बनली आहे. ही भिंत हटविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
नागपूरमध्ये ११६५ कोटी रुपये खर्च करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय विज्ञान व अनुसंधान केंद्र उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय विधी विद्यापीठ निर्माण झाले असून ट्रिपल आयआयटी, आयआयएम देखील साकारत आहे. त्यामुळे नागपूर शहर आता ‘मेडिकल हब’ आणि ‘एज्युकेशनल हब’ म्हणून नावारूपाला येत असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी युवावर्गाला दिली. आनंद उत्साह साजरा करीत असताना कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here