———ऑफ दी रेकॉर्ड———– नरेशबाबू पुगलिया……@७५

लोकदर्शन 👉 आशीष अम्बाडे

या पोस्टचे शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र चंद्रपुरात विविध प्रसार माध्यमात काम करणाऱ्या माध्यमकर्मीना मात्र ‘नरेशबाबू पुगलिया’ आणि ‘ऑफ द रेकॉर्ड’ या दोन शब्दांची नवलाई नाही. मी स्वतः चंद्रपुरातील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पहिल्या पिढीचा प्रतिनिधी आहे. साधारण 98 सालापासून या ना त्या कारणाने दिग्गज राजकारणी व समाजकारण्याच्या पत्रपरिषदांना उपस्थित राहण्याचा प्रसंग आलाय. अनेकदा वादाचे- त्वेषाचे- रागाचे आणि प्रसंगी आनंदाचे हजारो क्षण पत्रपरिषदेदरम्यान अनुभवले आहेत. मात्र आजही पत्रपरिषद म्हटली की त्यातली शिस्त आणि शब्दांचा नेमकेपणा लक्षात राहतो तो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पत्रपरिषदेचा. सामान्य माणूस ,व्यथाग्रस्त नागरिक, राजकारण्यांनी सांगितलेली आपबीती किंवा समस्या भावार्थासह माध्यमांमध्ये उमटवणे हेच पत्रपरिषदेत उपस्थित माध्यमकर्मींचे कर्तव्य. मात्र नरेशबाबू यांच्या पत्रपरिषदेचे निमंत्रण मिळाल्यापासून ते त्यांच्या ‘रेकॉर्ड’ – ‘ऑफ दी रेकॉर्ड’ माहितीसह पत्रपरिषदेच्या कक्षातून बाहेर पडेपर्यंत एक समग्र अनुभव असतो. राजकारण- समाजकारण व कामगार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेला हा नेता पत्रकार परिषद एक हाती खेळवतो. अनेकदा माध्यमांमधून नरेश पुगलिया यांनी मांडलेली मतं, पत्रपरिषदेतील विषय बातमी स्वरूपात आपल्यापुढे येतात. मात्र पत्रपरिषदेतील अंतरंग काही उमगत नाही. आजची पोस्ट त्यातल्या अंतरंगाचा मागोवा घेणारी आहे. 0 मे 2022 रोजी गांधी घराण्याशी निष्ठावान असलेल्या या मातब्बर कामगार नेत्याचा 75 वा वाढदिवस. यानिमित्ताने नरेशबाबू पुगलिया यांची खिलवण्यातील दिलदारी आवर्जून लिहावीशी वाटली.

काळ 2000 चा असो वा 2022 चा. दिल्ली ते गल्ली, राजकारण -समाजकारण ते पत्रकारिता या सर्वच क्षेत्रातील बित्तंबातमी स्वतःजवळ बाळगणार्‍या नरेशबाबू पुगलिया यांच्या गांधी चौकातील कार्यालयातून पत्रपरिषदेसाठी वा अन्य कुठल्याही कामासाठी आलेला फोन म्हणजे काहीतरी खास असल्याचेच संकेत असतात. पत्रपरिषदेला बोलावण्याची शैली देखील वैशिष्ट्यपूर्ण. नम्र आवाजातील स्वीय सहायक कुमारजींचा निरोप म्हणजे त्यांच्या मागे दरारा युक्त आवाज आहे हे आपण समजून घ्यायचे. नेमक्या वेळेला पत्रपरिषद सुरू होणार. जमलेल्या सर्व माध्यमकर्मींवर निरीक्षणपूर्वक नजर टाकून नरेशबाबू पत्रपरिषदेला सुरुवात करतात. इंदिरा गांधींपासून ते सोनिया गांधीं पर्यंत पक्षाच्या प्रत्येक हालचालींचा, चढ-उताराचा अनुभव असलेल्या नरेशबाबूंच्या प्रेसनोटचे इंग्रजी -मराठी ड्राफ्टिंग आम्हा सर्वांसाठी कौतुकाचा विषय. पत्रपरिषदेत मिळालेली लेखी प्रेसनोट गोळीबंद असते. त्यातून प्रश्न निर्माण होतच नाहीत. छोट्या-छोट्या पॉइंटर्सच्या माध्यमातून नरेशबाबू आपले म्हणणे अत्यंत साध्या- सोप्या शब्दात सांगतात. त्यांचं कथन संपल्यानंतर दीर्घ उसासा टाकून समोरच्या माध्यमकर्मींकडे रोखून पाहिल्यावर कोणाला काही प्रश्न? असा गंभीर आवाज येतो. त्यांच्या कथनात असलेली स्पष्टता लक्षात घेता अर्धे प्रश्न गळाले असतात. काही सान-थोर माध्यमकर्मी पत्रपरिषद पुढे नेण्यासाठी जरूर प्रश्न विचारतात. ते तेवढेच आणि पत्रपरिषदेचा अधिकृत भाग संपतो. आता सुरू होते ‘ऑफ द रेकॉर्ड’ पत्रपरिषद. नरेशबाबू पुगलिया यांच्या पत्रपरिषदेत ‘ऑफ द रेकॉर्ड’ चा भाग नसेल तर चूकचुकल्यासारखे वाटते. एखाद्या वॉर्डातला एखाद्या नगरसेवक ते मुंबई- दिल्लीतील मंत्री- खासदारांपर्यंत अनेक विषयांची चर्चा ते करतात. आणि माध्यमकर्मींकडून जाणूनही घेतात. अर्थात त्यांना मिळालेल्या इनपुट संदर्भात तो पडताळा असतो. कधी एखाद्या नेत्याबद्दल, कधी एखाद्या अधिका-याबद्दल, कधी स्वतःच्या पक्षातल्या स्पर्धक नेत्यांबद्दल तर कधी जिल्ह्यातल्या विविध समस्या- कामगार क्षेत्राबद्दल त्यांनी पुरवलेली माहिती अथवा व्यक्त केलेले मत म्हणजे असतात सज्जड पुरावे अथवा असते हास्याची खसखस. त्यांचा आदर व दरारा असा आहे की त्यांनी पुरविलेल्या वा चर्चिलेल्या कुठल्याही ‘ऑफ द रेकॉर्ड’ वृत्ताची कधीही बातमी केली जात नाही. बाबू ‘ऑफ द रेकॉर्ड’ बोलत आहेत म्हणजे त्यात सर्व आलं असाच तो समज. एखादा माध्यमकर्मी या संपूर्ण पत्रपरिषदेत मौन असेल तर त्याला खास ‘बाबू’ शैलीत शब्दरूपाने गोंजारले जाते. त्यानंतरही तो शांत राहिला दुसर्‍या क्षणाला बाबूंची सर्वाधिक आवडती आज्ञा सुटते. ती म्हणजे ‘नाश्ता लगाव’. बाबूंच्या पत्रपरिषदेतला नाश्ता हे एक प्रचंड वेगळं प्रकरण आहे. सहसा जुनी व नवी राजकारणी मंडळी पत्रकारांसोबत जाहीररित्या जेवायचं- नाश्ता करायचं आजही टाळतात. त्याची कारणे अनेक आहेत. मात्र नरेश पुगलिया हा असा एक राजकारणी आहे जो दिलदार खवय्या आहे. म्हणजे केवळ चांगलं खाणार असेच नाही. तर आग्रहाने खाऊ घालणार. पत्रपरिषदेत नाश्ता आल्यानंतर नरेशबाबूंची कळी खुलते. मग पत्रपरिषदेत एखादा माध्यमकर्मी कमी-अधिक बोलला असेल किंवा अडचणीचा प्रश्न विचारला असेल तर त्याची टोपी उडविल्याशिवाय बाबू स्वस्थ बसत नाहीत. पण तेही नर्मविनोदी शैलीत. ते अनेकदा पत्रपरिषदेचे अध्यक्षस्थान समोर बसलेल्या एखाद्या पत्रकाराला ऑफर करतात आणि तिथून पत्रपरिषदेचा एकूण ताबा घेतला जातो. बाबूंच्या पत्रपरिषदेत दिले जाणारे खाद्यपदार्थ हा एक पीएचडी चा विषय आहे. अत्यंत रुचकर खाद्यपदार्थ आणि त्यातही कोण खातंय, कोण सोडून देतंय, कुणाला पदार्थ आवडला नाही. यावर बारकाईने नजर ठेवत बाबू त्यांच्यापुढे आलेल्या नाश्त्याचा पक्का समाचार घेतात. अगदी कुणाला चटणी हवी आहे का? कुणी स्वीट घेतलं नाही का? पासून ते शेवटच्या क्षणापर्यंत बाबू सर्वांकडे लक्ष देणार. विशेष म्हणजे हंगामानुसार कैरीचे पन्हे,ताक, लस्सी, टरबूज गराचा रस, अथवा फर्मास चहा असा ‘रेकॉर्ड’ ‘ऑफ दी रेकॉर्ड’ चा शेवट होतो. पत्रपरिषद संपल्यानंतर मूळ बातमीशिवाय बाबूंच्या दिलदार खवय्येपणाची आणि ‘ऑफ द रेकॉर्ड’ पुरवलेल्या माहितीची समसमान चर्चा असते. पत्रपरिषदेची नरेशबाबू पुगलिया यांची शैली माध्यमकर्मीना एव्हाना अंगवळणी पडली आहे. बाबूंच्या कार्यालयातून आलेला फोन म्हणजे महत्त्वाची पत्रपरिषद असे समजून पत्रपरिषदेला माध्यमकर्मी वेळात वेळ काढून उपस्थित राहतात. कुणी उशीरा टपकलेले त्यांच्या नजरेतून सुटत नाही. पत्रपरिषदेच्या नंतरच्या टप्प्यात ते अशा लेट कमर्सवर हमखास शब्दबाण चालवून खसखस पिकवितात.

गेली अनेक वर्षे नरेशबाबू पुगलिया यांचा कामगार व राजकीय क्षेत्रातील प्रवास कव्हर करत असताना त्यांचे उपोषण व आंदोलनस्थळाचा मंडप हा ही एक अभ्यासाचा विषय असल्याचे लक्षात आले. अत्यंत शिस्तबद्ध पांढराशुभ्र मंडप त्याला हलकी तिरंगी किनार. पत्रकार परिषदेत शिस्तबद्ध रीतीने ठेवलेल्या खुर्च्या. आणि बाबूंची पत्रकार परिषद त्याच मंडपात असेल तर सहकाऱ्यांनी प्रत्येक गोष्टीची घेतलेली सर्वोच्च काळजी नजरेत भरण्यासारखी असते. अगदी चहाचा कपही उत्तम असावा आणि त्यातला चहाही नेमका दिला जाताना गरम असावा याकडेही बाबूंचे लक्ष असते. अनेकदा ते स्वतः चहाचा स्वाद घेत असा कसा सर्व्ह केला? याबद्दल आपल्या सहकाऱ्यांचा वर्ग घेत असल्याचे प्रसंग आम्ही अनुभवले आहेत.

त्यांच्या आंदोलनाच्या मंडपातील एक खवय्येगिरीचा एक प्रसंग इथं आवर्जून सांगावासा वाटतो. स्थानिक जुना वरोरा नाका चौकातल्या चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ शेजारी त्यांचे एका सिमेंट कंपनी विरोधातील आंदोलन होते. नेहमीप्रमाणे शुभ्र मंडप व त्यात नेटकी व्यवस्था केली होती. दुपार झाली आणि नरेशबाबूंच्या जेवणाची वेळ झाली. त्यांनी सहज विचारलं. आपण श्रमिक पत्रकार संघात जेवायला बसायचं का? होकार होताच. श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात संघाच्या निवडक पदाधिकाऱ्यांसोबत घरून आलेला भलामोठा रुचकर जेवणडबा त्यांनी अंगतपंगत करत सर्वांसोबत खाल्ला आणि अघळपघळ गप्पा सोबत अनेक विषयांवर चर्चा केली. यावर कडी म्हणजे त्यांनी स्वतःसोबत आणलेलं विशेष पान. अत्यंत सुबक रीतीने छोट्या डबीत भरून आणलेलं पान म्हणजे म्हणजे जेवणानंतरचा परमोच्च आनंद. बाबूंच्या जेवणानंतर पान खाण्याच्या सवयीमुळे यावेळी त्यांची कळी खुलते हे एव्हाना सर्वांना ज्ञात झाले आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने दिलदारपणाने दर्जेदार रुचीसंपन्न खिलविणे हा बाबूंचा स्थायीभाव.
गेली अनेक वर्षे राजकीय प्रचार दौरे अथवा मंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत जाणाऱ्या अनेक माध्यमकर्मीना खवय्येगिरीशी संबंधित त्यांच्या माणूसपणाचे शेकडो किस्से माहीत आहेत.त्यातही एक माध्यमकर्मीने सांगितलेला किस्सा या नेत्याच्या मोठेपणाची साक्ष देणारा आहे. एका दौर्‍यात बाबूंसोबत एक नवखा व्हिडिओग्राफर होता. सोबत वाहनांचा भलामोठा ताफा होता. दौऱ्याच्या ठिकाणी सर्वांची जेवणं आटोपली. मात्र या व्हिडिओग्राफरला कुणी जेवण विचारीना. दौरा संपला. सर्वजण पुन्हा गाडीत बसले. गाडीत बसताना नरेशबाबूंनी त्या नवख्या व्हिडिओग्राफरला जेवणाविषयी विचारले. त्याने प्रांजळपणे कुणी विचारलंच नाही, असे उत्तर दिले. त्यावर तडक गाडीखाली उतरलेले नरेशबाबू आणि आपल्या सहकाऱ्यांना एका रांगेत उभे करून त्यांनी दिलेल्या इरसाल वैदर्भीय शिव्या आजही या माध्यमकर्मीला आठवतात. त्याच क्षणी पूर्ण ताफा थांबवून त्या नवख्या माध्यमकर्मीसोबत त्याचं जेवण पूर्ण होईपर्यंत बाबू स्वतः थांबले. आणि मगच ताफा चंद्रपूरला रवाना झाला. बाबूंच्या खिलविण्याचे असे किस्से विदर्भभर प्रसिद्ध आहेत. बाबूंची सकाळ त्यांच्या फार्म हाऊसवर जाते. सकाळपासून फार्म हाऊसवर रपेट मारून काही काळानंतर ते स्थिरावले की सुरू होतो तो गरम भजे- आलूबोंडे- चना रस्सा -मिसळ अथवा पोह्यांची फर्माईश. त्यातही सोबत असलेल्या व्यक्तीला त्याची आवड विचारली जाते. प्रत्येक गोष्ट चवीने खाणे आणि खिलवणे यात बाबूंचा हात कुणीही धरू शकत नाही. फार्महाऊसवर फिरताना प्रत्येक झाडाशी ते गप्पा मारतात. फिरताना कुठे फळ आहे, कुठे फुल आहे ,कुठली फांदी मोडली आहे, कोणत्या झाडाला आधाराची गरज आहे, आळ्यात पाणी कमी-अधिक आहे याबाबत पटापटा सूचना देत ते भराभरा पुढे जातात. शेती त्यांच्या कुटुंबातच असल्याने एकूणच कृषी उत्पादनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. मग लिंबू असो की बेबीकॉर्न. त्यावर ते भरभरून बोलतात.
नरेशबाबू खासदारकीचे उमेदवार असताना त्यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावून धडाक्यात साजरा केलेला गणेश फेस्टिवल- त्यातल्या छप्पन भोग मिठाया चंद्रपूरकरांना आजही आठवतात. शहरातील दोन्ही प्रमुख रस्ते 56 भोग मिष्ठान्न भोजनाच्या स्टॉल्सने भरून गेले होते. इतकच नव्हे तर या संपूर्ण प्रक्रियेत एरवी अलिप्त असणाऱ्या श्रमिक पत्रकार संघाच्या नावानेही त्यांनी आईस्क्रीमचा स्टॉल उभारण्याची परस्पर घोषणा हास्यकल्लोळात करून टाकली होती. स्वतः उत्तम खाणे व दुसऱ्याला उत्तम खिलवणे या वृत्तीमुळेच हे सर्व शक्य होते. त्यांच्या खासदारकीच्या काळात एकनाथराव गायकवाड, अनिस अहमद असे दोन पालकमंत्री आम्ही जवळून अनुभवले. एकनाथराव गायकवाड यांना तर शहरात आल्यापासून एक ग्लास दुधावरच ते उदघाटनांच्या धडाक्यात सामील करून घेत तर दुसरे पालकमंत्री बाबूंच्या धाकापायी बल्लारपूरात जेवणखाण उरकत असंत. नरेशबाबू पुगलिया यांच्या खिलवय्या वृत्तीचे जाहीर दर्शन दरवर्षी श्रीगणेश विसर्जन रॅलीतील प्रसाद वितरण व धम्मचक्र प्रवर्तन दिन रॅलीच्या सुग्रास भोजनातून होते. नरेश पुगलिया यांच्या यादिवशीच्या स्टॉलवर असलेली गर्दी व त्याला खवय्यांनी दिलेली दाद दरवर्षी हजारो लोक अनुभवतात. एक वर्षी धम्मचक्र अनुवर्तन रॅलीच्या आदल्या दिवशी त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंग आला. रॅली निमित्त होणाऱ्या भोजनाची तयारी सुरू होती. भोजनाची सिद्धता झाल्यावर आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसह नरेशबाबू त्या भोजनाची स्वतः चव घेतात. नरेशबाबूनी जेवणाचं ताट बोलावलं. आणि त्यांना ताटात निकृष्ट दर्जाचा तांदूळ( भात) असल्याचं लक्षात आलं. जेवण थांबवून त्यांनी सहकाऱ्यांना बोलावलं. तातडीने तांदूळपोती परत करायला लावली. जे द्यायचं ते उत्तम असं सांगत ‘माझं नाव खराब करू नका’ असं सांगायलाही ते विसरले नाहीत. या सर्व गोष्टींमुळे नरेशबाबूंच्या सहकाऱ्यांवर एक प्रकारचा धाक असतो. दर्जेदार रुचकर जेवणच दिले गेले पाहिजे याकडे त्यांचाही कटाक्ष असतो. पुगलिया परिवाराच्या आदराने खिलवण्याच्या वार्षिक निमंत्रणात एक निमंत्रण असते ते अंध-अपंगांच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे. दरवर्षी जमेल तेवढ्या अंध-अपंगांचा सामूहिक विवाह सोहळा आस्था चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण पुगलिया परिवाराच्या तन-मन-धन मदतीने संपन्न होतो. पुगलिया परिवार या अंध-अपंग वर-वधूसाठी आई- वडिल होतो. अगदी संध्याकाळच्या मेंदी आणि संगीतापासून ते लग्न व आहेरापर्यंत सर्व गोष्टींकडे पुगलिया परिवार जातीने लक्ष देतो. या कार्यक्रमात देखील सर्वाधिक चर्चा असते ती रुचकर भोजनाची. आल्या-गेल्या सर्वांना उत्तम- पोटभर खास चंद्रपुरी जेवण मिळेल याकडे पुगलिया परिवार व विशेषतः नरेशबाबू व शामबाबू पूगलिया लक्ष देतात. बल्लारपूर व चंद्रपूर या दोन्ही बालाजी मंदिरातील प्रमुख उत्सव म्हणजे वार्षिक ब्रम्होत्सव. या निमित्ताने अगदी आहाहा……म्हणावे असे सुग्रास भोजन नरेशबाबू आवर्जून खिलवितात.
संपुर्ण विदर्भात दिलदार नेता, शब्दाला जागणारा नेता म्हणून नरेशबाबूंची ओळख आहे. आपल्या उमेदीच्या काळात अत्यंत कडवट कामगार नेता म्हणून नरेशबाबू प्रसिद्ध होते. त्याची झलक, चुणूक आणि फटका अनेकांना अनेक प्रसंगात दिसला आहे. बल्लारपूर पेपर मिल -विविध सिमेंट कारखाने -कामगारांचे प्रश्न यासह विविध आंदोलन प्रसंगी त्यांनी घेतलेली भूमिका कधीकधी पक्षाच्या एकूण धोरणाला छेद देणारी असते. मात्र शेवटी नरेशबाबूंची भूमिकाच सरस ठरते हा इतिहास आहे. अत्यंत कणखर असलेला हा नेता प्रचंड भावूक आहे. नुकतेच एका अंत्यसंस्काराच्या निमित्ताने शांतीधामात भेटल्यावर त्यांच्याशी फावल्या वेळेत सहज गप्पा करण्याचा प्रसंग आला. आयुष्यभर कामगार नेता राहिलेला त्यांचा एक जिवलग सहकारी, मुलगा मुंबईत सेटल झाल्यानंतर तिकडे राहायला गेला. मात्र नव्या पिढीशी जुळवून घेता न आल्याने तो माघारी परतला, हे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. असा हा दिलदार- बेधडक व यशस्वी कामगार नेता. नरेशबाबूंचा 75 वा वाढदिवस साजरा होतोय. यानिमित्ताने देखील तीन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम त्यांनी आखले आहेत. यात पुन्हा एकदा 56 भोग मिष्ठान्न भोजनाचा समावेश आहे. हे भोजन तयार करणारा आचारी योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांनी पत्रपरिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व माध्यमकर्मीना आमंत्रित करत सर्व व्यंजनांचा सोबत जेवत जोरदार समाचार घेतला आणि आपल्या खिलवय्या वृत्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले. जनता व कामगार क्षेत्राला असा खमका नेता आणि आम्हा सर्व माध्यमकर्मीना 100 वर्ष असा खवय्या नेता लाभो हीच माता महाकाली चरणी प्रार्थना.

जिवेत शरद: शतम नरेशबाबू…………

—————
आशीष अम्बाडे
19 मे 2022
चंद्रपूर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *