आठ गावांची आटपाडी नगरपालीकाच करा.* *सादिक खाटीक यांची पुनर्विचार करण्याची मागणी

 

लोकदर्शन आटपाडी 👉 राहुल खरात                              दि .14 एप्रिल
आटपाडी लगतच्या सात गावांसह आटपाडी नगरपालीकाच करावी . नगरपंचायत करण्याचा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी याचा पुनर्विचार करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी केली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांना दि .१३ मे रोजी सकाळी ११.३९ वाजता पाठविलेल्या ईमेलद्वारे केली आहे .
नगरविकास मंत्री ना. एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दि . १२ मे रोजी आटपाडीत केलेली आटपाडी नगरपंचायत निर्मितीची घोषणा, त्याबद्दल त्यांचे तसेच महाविकास आघाडी सरकारचे आणि नगरपंचायत होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदनच ! तथापी नगरपंचायती ऐवजी आटपाडीची नगरपालीकाच करणे खऱ्या अर्थाने आटपाडी आणि परिसरावर न्यायाचे ठरू शकेल . नगरपंचायतीचा निर्णय अंमलात येण्यापूर्वी याचा पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा सादिक खाटीक यांनी या मान्यवरांकडे केली .
सांगली जिल्ह्यातल्या सर्व तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायती, पाच वर्षापूर्वीच नगरपंचायतीत बदलल्या गेल्या. नगरपंचायती ऐवजी नगरपालीकाच करा.अशी मागणी असल्याने आटपाडी नगरपंचायत पाच वर्षे होवू शकली नव्हती ही वस्तुस्थिती असताना काल आटपाडीच्या कार्यक्रमात राज्याचे नगरविकास मंत्री ना एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आटपाडी नगरपंचायत करण्याची घोषणा केली . ही नगरपंचायत आदर्श मॉडेल करण्याचे ही त्यांनी बोलून दाखविले . तथापि आटपाडीची नगरपंचायत करण्याऐवजी पाच वर्षे विलंबाबद्दल, पुर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग असणाऱ्या ७ गावच्या समावेशाने आटपाडीला नगरपालिकाच करावी . अशी मागणी मी आपणाकडे विनम्रपणे करीत आहे . महाविकास आघाडी सरकारच्या वतीने आटपाडीची नगरपंचायत करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला तरी आटपाडीकरांना आणखी भावेल, पटेल, रुचेल असा नगरपालिकेचा निर्णय केला गेल्यास सोने पे सुहागा होवू शकेल . आणि आटपाडीच्या विकासाला दाद दिल्यासारखे होईल .
३ वर्षे ११ महिन्यापूर्वी , आटपाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रक्रिया वेळीच आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्याचा शासन निर्णय झाल्याचे ऐकून त्यावेळी आश्चर्य वाटले होते. तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा निर्णय सुमारे पाच वर्षापूर्वीच झाला होता. त्यानुसार जिल्हयातील जत, कवठेमहंकाळ, खानापूर, शिराळा, पलूस, कडेगांव या ठिकाणच्या नगरपंचायती अस्तित्वात आल्या. परंतू आटपाडीकरांना नगरपंचायत नको असल्याने हा निर्णय अनेक वर्षे प्रलंबीत पडला होता. अशी वस्तुस्थिती असताना नगरपंचायत करण्याच्या झालेल्या निर्णयाने बहुतांश आटपाडीकरांमध्ये त्यावेळी नाराजीचे वातावरण पसरल्याचे आपणा सर्वांच्या निदर्शनास मी आणले होते . आज ही आटपाडी ग्रामपंचायतीची कार्यकक्षा १७ किलोमीटर लांबपर्यंत आहे . एवढया लांब अंतरावरील *शेंडगेवाडी,* आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग आहे . *साडे तीन वर्षा पूर्वीच्या आटपाडी नगरपंचायतीच्या निर्णयाबरोबरच शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण केली गेली होती. तथापि हे दोन्ही निर्णय पुढे अंमलातच आले नव्हते .* पूर्वी आटपाडी ग्रामपंचायत मध्येच समावेश असणारी ८ गावे आटपाडीला जवळच आहेत त्यापैकी आटपाडीच्या सीमेपासून २ किलोमीटर अंतरावरील मुढेवाडी, आटपाडीच्या सीमेलगतची मापटेमळा, भिंगेवाडी, पुजारवाडी आटपाडी ), यप्पावाडी आणि मासाळवाडी ही गावे आहेत तर सीमेपासून एक दोन किमीवर खांजोडवाडी, देशमुखवाडी ही गावे आहेत. मापटेमळा, भिंगेवाडी, देशमुखवाडी, पुजारवाडी (आटपाडी), खानजोडवाडी, यमाजी पाटलाची वाडी (य.पा.वाडी) आणि मासाळवाडी आणि मुढेवाडी ही गावे , (वाड्या ) स्वतंत्र ग्रामपंचायती होण्यापूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग होती . आज आटपाडी शहर ३ किमी परिघात पसरले आहे . आटपाडी गावच्या या सिमेपासून इतर सात गावांचा विचार केल्यास काही गावे आटपाडीला लागूनच आणि काही गावे एक दोन किलोमीटर अंतरावरच आहेत . आटपाडी नगरपालीका करताना मुढेवाडी वगळून या ७ गावांचा ( वाडयांचा ) समावेश करुन आठ गावांची सशक्त आटपाडी नगरपालीका केली जावी, ही मागणी गेली ६ वर्षे सातत्याने आम्ही करीत आलो आहे. तथापी त्याकडे लक्ष न देता नगरपंचायतीच्या केल्या गेलेल्या निर्णयाचा, नगरपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीच तातडीने फेर विचार करून आटपाडी शहराच्या गतीमान, चौफेर आणि दिशादर्शक विकासासाठी आटपाडी नगरपालीका होणे गरजेचे, न्यायाचे ठरेल असे वाटत असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
सांगली, मिरज आणि कुपवाड नगरपालीकांचा विरोध मोडून काढून तत्कालीन मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या इच्छेखातीर त्यावेळच्या मुख्यमंत्र्यानी सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालीका निर्माण केली. विशेष म्हणजे मिरजेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील सरांच्या अथक प्रयत्नातून साकारल्या गेलेल्या कुपवाड नगरपालीकेवर सहा महिन्याच्या आतच वरवंटा फिरवीला गेला. नगरपालीका, महानगरपालीका अथवा एखादी महत्वपूर्ण बाब अस्तित्वात आणताना त्या, त्या गावांचा पाठींबा असो अथवा नसो, नगरपालीका, महानगरपालीका निर्मितीसाठी किती लोकसंख्या, मतदान लागते तेवढया प्रमाणात त्या, त्या गावांचा समावेश करुन नवनिर्मिती केली जाते, हे सर्वश्रुत आहे. आणि असे असताना आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपालीका करतानाच अमक्या गावांचा ठराव पाहीजे, तमक्या गावांचा विरोध नको , अशा पालुपदाच्या आडून आटपाडीकरांच्या भावनेकडे आणि मागणीकडे दुर्लक्ष होत आहे .
आटपाडी जवळील साखर कारखाना, सुतगिरणी, दूध संघ व अन्य महत्वाचे प्रकल्प इत्यादींचा नव्या नगरपालीकेच्या कार्यक्षेत्रात समावेश होणार असल्याने नव्याने अस्तित्वात येणारी आटपाडी नगरपालीका प्रारंभापासूनच सक्षम होवू शकते. म्हणून आटपाडी नगरपालिकाच होण्यासाठी निर्णायक प्रयत्न व्हावेत, अशी आपणा सर्वांकडे माझी नम्र अपेक्षा आहे . असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी या ईमेल मध्ये म्हटले आहे .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *