मना आस आधाराची नसेल आधार तर जीवन लाचार शुभांगी गादेगावकर

 

लोकदर्शन ठाणे;👉 राहुल खरात

‘आधार’ हा जीवनाचा अभिन्न असा घटक आहे. आधाराशिवाय जीवन जगणे अशक्य झाले आहे. आपण म्हणतोच ना! बुडत्याला काठीचा आधार. जीवनात प्रगती करुन यश मिळवण्यास कुणाचा तरी आधार हवा असतो. तो आधार आपल्या आईचा, वडिलांचा,भावाचा, बहिणीचा किंवा इतर कोणाचाही असू शकतो.
आज असंख्य वृद्धाश्रम आपल्याला दिसू लागली आहेत. आधारावर ती तगली आहेत. एक काळ होता प्रत्येक मातापित्याला मुलगा म्हणजे आपला आधार वाटत होता. हा आधार आता ब-याच प्रमाणात नामशेष झाला आहे.या धकाधकीच्या जीवनात स्पर्धेला गवसणी घालता घालता प्रत्येकाला आपल्या कामातून वेळच मिळत नाही. माता- पिता आता तर जणू काही दुर्लक्षित झाले आहेत. वेळेत शिक्षण, मोठ्या पगाराची नोकरी ती ही परदेशी, लग्न, संसार यात माता पिता म्हणजे अडगळ निर्माण झाली आहे.याला काही अपवादात्मक उदाहरणे असतील ही.त्याची परिणीती वृद्धाश्रमातील कवाडे उघडू लागली आहेत. थोडक्यात काय की वृद्धाला जसा काठीचा आधार हवा आहे तसे हे वृद्धांचे जीवन आनंदी व समाधानी करण्यासाठी वृद्धाश्रमाचा आधार आहे.
बालपणापासून आधाराची गरज असते. हा आधार आपल्या जवळच्या माणसांचा असतो. आपले जीवन फुलवण्यासाठी कधी रागाचा तर कधी भक्कम असा आत्मविश्वास देणारा आधार हवा असतो. आपण पुढे आधाराशिवाय चालू शकतो असे आपल्याला वाटते, पण अनेक खाचखळगे आपल्याला अडवतात. आपल्या मनोबलाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात. अनपेक्षितपणे अनेक आधार आपल्या अवतीभवती फिरत असतात.ते आपल्याला सावरतात. ते आपल्याला जाणवत नाहीत.आपल्याला आधार देणारे हात सदैव आपल्या पाठीशी आहेत. ही कल्पना देखील मनाला आनंद देणारी असते. त्यातून खंबीर अशी एक मनोवृत्ती जागृत होते. त्यात नवी ऊर्मी असते. आधार न मिळालेली माणसे कोलमडून पडतात.
मला कोणाची गरज नाही ही मनाची एक स्वाभिमानी आणि एकाकी प्रवृत्ती आहे. पण आधाराशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. एका वेलीला वृक्षाचा आधार असतो. एका वृक्षाला खोडाचा आधार असतो. खोडाला जमिनीचा आधार असतो. आणि जमिनीला या विश्वाचा आधार असतो. म्हणजे आधाराशिवाय जगणे कठीण आहे. या वृक्षांनीच पक्ष्यांची दुनिया सांभाळली आहे. आपण कितीही म्हटले की मला कोणाची गरज नाही, तरीही आधाराशिवाय जीवन नाही. पती-पत्नीचे नाते तर आधारावर चाललेले आहे. दोन विभिन्न मनोवृत्तीच्या व्यक्ती विवाहबंधनात अडकतात. तिथे संघर्ष होतात, भांडणे होतात, वादविवाद होतात, कधी कधी तर भांडणं विकोपाला जातात. काडीमोड घेण्यापर्यंत प्रसंग निर्माण होतो. तरीही एक मानसिक आधार त्या दोघांना घट्ट पकडून ठेवतो.त्यावर संसार होतो.अशी बरीच वैवाहिक जोडीदार संसार करतात. तो संसार सुखाचा होतो. त्यात गोडवा असतो. तो आधाराचा, विश्वासाचा, प्रेमाचा.
आपल्या जीवनातील आयुष्याच्या खडतर प्रवासात अनेक व्यक्ती आपला भक्कम आधार असतात. इतरांच्या प्रती असलेली आदर भावना, प्रेम, त्याचा पाठपुरावा त्यातून मिळणारा भक्कम आधार आपल्या जीवनाची दिशा ठरवतो. संकटे सतत येत असतात आणि या संकटांना सामोरे जाण्यासाठी एक खंबीर आधाराची गरज असते. बालपणी आई-वडिलांचे व मोठेपणी शिक्षकांचे मार्गदर्शन, आपल्या मित्राचा सल्ला असे छोटे छोटे आधार घेत पुढे आपण जात असतो. काही आधार फसवे असतात. ते दिशाभूल करणारे असतात. हे फसवे आधार आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजावतात. विश्वासाला तडा गेल्यावर या आधाराची खरी काय गरज आहे ते कळते .पती पत्नी नाते हे घटस्फोटापर्यंत पोहोचल्यावर एकमेकांचा स्वाभिमान उफाळून येतो.मला तुझी गरज नाही असे अहंकारे म्हणणारे मन ही शांतपणे आधारासाठी रडू लागते. डोळ्यातील आसवांना लपवून नवा आधार शोधू लागते. आधार नसल्यावर जीवन जगणे जणू एक शिक्षाच होऊन बसते.
इमारत कितीही सुंदर असली तरी त्या इमारतीचा पाया भक्कम असला तर साधारण दिसणारी इमारत ही खूप वर्ष टिकून राहते. हा सर्वात महत्त्वाचा आधार असतो. तो जर का कमजोर असला तर इमारत पडण्यास वेळ लागत नाही. पक्ष्याच्या पंखात जोपर्यंत बळ येतं नाही तोपर्यंत पक्षीण त्याला आधार देते. त्याची सावली बनून राहते. त्याच्यावर संकट येणार नाही यासाठी सदैव प्रयत्न करते. त्याला उडणे शिकवते.ज्या वेळी त्याच्या पंखात बळ येते, त्या वेळेला आधाराला धुडकावून ते उंच आकाशात भरारी घेते.आधारामुळे मिळालेली प्रेरणा घेऊन आत्मविश्वासाने अवकाशात विहार करू लागते.
शाळेत शिकणारी असंख्य मुले शाळेच्या आधाराने शिकू लागतात. शिक्षणाचा वेल वाढत जात असताना शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक अशीही आधाराची वेल हळूहळू वाढत जाते. परस्पर सहकार्याच्या आधारातून विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत असते. या भवितव्याला नित्यनवीन शाखा फुटत असतात. या शाखेमध्ये सुप्त कलेची जोपासना होते.त्या प्रदर्शित केल्या जातात. ज्ञानाचा विकास होतो. मनोरंजन होते. आधाराला जोड असल्याशिवाय तो आधार दुसऱ्यांना आधार देऊ शकत नाही. शाळेतून चांगले संस्कार घेऊन संस्कारीत झालेला विद्यार्थी देशाचा आदर्श नागरिक होतो. देशाच्या प्रगतीसाठी तो मग खंबीर आधार बनून उभा राहतो.
एका विधवेला विचारा आधार काय असतो? देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या आईला विचारा आधार काय असतोॽ अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पतीच्या विरहाने एकाकी झालेल्या स्त्रीला विचारा आधार काय असतोॽ मुलाचे लग्न झाल्यावर आई -वडिलांना सोडून वेगळा संसार करणा-या मुलांच्या आई- वडिलांना विचारा आधार काय असतो ? बालपणीच आई वडिलांचे छत्र हरवलेल्या बालकाला विचारा आधार काय असतो? तो एक अदृश्य प्रेरक असतो. जो दिसत नसतो. फक्त जाणवत असतो. आधाराशिवाय जगणे एक शोकांतिका बनते. सतत आपल्याला याची जाणीव होत असते, पण ते दाखवता येत नाही. ब-याचदा डोळ्यात अश्रू येतात. ते आपणच आपले पुसायचे असतात. उगाच रडून कुणाला दाखवायचे नसतात.
आधार हा जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. जीवन सुखी, संपन्न, समाधानी करण्याची गुरुकिल्ली.
एवढेच म्हणावे,
‘नसेल जर आधार
तर जीवन लाचार’

डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे
मो. ९६१९५३६४४१

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *