

By 👉 Shankar Tadas
मुंबई : सह्याद्रीच्या कुशीतील महाराष्ट्रात जन्मून सामाजिक, वैचारिक क्षेत्रात हिमालयाची उंची गाठणारे थोर विचारवंत, लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण तज्ञ, माजी मंत्री प्रा.एन.डी. पाटील यांच्या निधनाने राज्यातील सर्वसामान्य,कष्टकरी,शेतकरी यांनी त्यांच्या संघर्षात पाठिशी उभी राहणारी हिमालयाची सावली गमावली आहे, अशी शोक संवेदना राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
“प्रा.पाटील म्हणजे तत्वनिष्ठ, प्रामाणिक राजकीय आणि सामाजिक नेतृत्व होते. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण संस्था कशी चालवावी याचा आदर्श निर्माण केला आहे.पुरोगामी विचारांचे ते एक जिवंत विद्यापीठ होते.
फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या प्रा.पाटील यांनी राज्यात धर्मनिरपेक्ष पुरोगामी समाजवादी विचार परंपरा मजबूत करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल राज्यातील जनता नेहमी त्यांचे ऋणी राहील,”असेही डॉ.राऊत यांनी म्हटले आहे.
जनतेच्या हितासाठी कायम झटणारे शेतकरी व कामगार नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारण व समाजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावनाही डॉ नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणारे एन. डी. पाटील यांनी आपल्या जीवनात कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी अविरत संघर्ष केला. राज्यात कष्ट करणाऱ्या जनतेच्या प्रत्येक लढ्यात एन.डी अग्रेसर होते. शेतकरी आणि कामगार वर्गासाठी त्यांची कायम बांधिलकी होती. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले. लोकशाही व्यवस्थेत विधीमंडळाच्या आयुधांचा वापर त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला. त्यांचे लोकशाही परंपरेतील योगदान अविस्मरणीय आहे. अत्यंत अभ्यासू व लोकशाही मुल्यासाठी आग्रही असणाऱ्या एन. डी. पाटील यांच्या निधनाने राज्यातील पुरोगामी परिवर्तनवादी,शेतकरी कष्टकरी यांच्या कल्याणासाठी कार्यरत चळवळी पोरक्या झाल्या आहेत,अशा शब्दात डॉ. राऊत यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केलेली आहे.