महापालिकेद्वारे आयोजित स्वच्छतेवर आधारित विविध स्पर्धेचे निकाल जाहीर

लोकदर्शन 👉 मोहन भारती


चंद्रपूर । चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे इयत्ता पहिली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच शहरातील नागरिकांसाठी डिसेंबर महिन्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात ऑनलाईन चित्रकला स्पर्धा, जिंगल्स स्पर्धा, स्ट्रीट प्ले स्पर्धा, म्युरल आर्ट स्पर्धा , इत्यादी विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

जिंगल स्पर्धेत २२ जिंगल्सच्या ऑडिओ क्लिपचे परीक्षण करण्यात आले. त्यातून तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये प्रथम प्रिया नांदुरकर, द्वितीय क्रमांक शोभना शेख, तृतीय क्रमांक प्रणाली कवाडे यांचा समावेश आहे .

स्ट्रीट प्ले स्पर्धेत २३ चमूंनी प्रवेश घेतला. विविध प्रभागांत जाऊन स्ट्रीट प्लेचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक सचिन बरडे, द्वितीय क्रमांक गोपाल पोर्लावार आणि तृतीय क्रमांक अमोल मोरे यांना मिळाला

चित्रकला स्पर्धा दोन गटांत घेतली गेली. या चित्रकला स्पर्धेत दोन्ही गट मिळून एकूण ९० स्पर्धकांनी भाग घेतला. प्रत्येक गटातून तीन उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यात आली. अ गटातून प्रथम क्रमांक :यथार्थ टोकलवार (विद्या निकेतन हायस्कुल, चंद्रपूर), द्वितीय क्रमांक सुहास संजय कांडे ( भवानजीभाई स्कुल) आणि तृतीय क्रमांक मनीष चंद्रकांत खारकर (छोटूभाई पटेल हायस्कुल) याना प्राप्त झाला. “ब” गटातून प्रथम क्रमांक आशिष कस्तुरे, द्वितीय क्रमांक प्रगती चुनारकर, तृतीय क्रमांक अनिशा कस्तुरे यांनी पटकाविला .

म्युरल आर्ट स्पर्धेत २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात प्रथम क्रमांक नितेश मेश्राम, द्वितीय क्रमांक अमित पंदीलवार व तृतीय क्रमांक निखिल पाटील यांनी पटकावला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत लवकरच बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here