महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्मांडणी करताना…


ज्ञानेश वाकुडकर
•••
( दैनिक देशोन्नती.. २५/०७/२१.. साभार )
•••
सध्या ‘ओबीसी’ हा शब्द भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्रात देखील सामाजिक, राजकीय चळवळी सध्या याच शब्दाभोवती फिरताना दिसतात.

‘ओबीसींचा स्वतंत्र पक्ष हवा’ ..असा विचार अलीकडे सोशल मीडियातून फिरताना दिसतो. तो देशपातळीवरच जोर धरतो आहे. अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत असे लोक हा विचार मांडताना दिसतात. वेगवगळ्या पक्षात स्थिरावलेले लोक मात्र या विषयावर चूप आहेत. ते काहीही बोलत नाहीत. त्याऐवजी आपापल्या पक्षाच्या नावानं किंवा आपल्या लोकांना हाताशी धरून ओबीसी मेळावे घेण्याच्या कामी लागलेले आहेत. पक्ष नेतृत्वाला खुश करण्यासाठी त्यांची ही धडपड असते. मात्र त्यातून सामाजिक दृष्ट्या गोंधळच वाढत जातो. सारेच पक्ष जर ओबीसींच्या हिताचा विचार करत असतील, तर मग हे गंभीर प्रॉब्लेम निर्माण का झालेत ?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करताना सामाजिक आणि राजकीय गुंतागुंत आपल्याला तटस्थपणे समजून घ्यावी लागेल. भाजपा आणि शिवसेना ह्या पक्षांच्या राजकीय भूमिकांचा विचार केल्यास भावनात्मक आधार हाच त्यांच्या राजकारणाचा आत्मा राहिलेला आहे. शिवसेनेकडे कोणता आर्थिक विचार आहे ? कोणतं शैक्षणिक धोरण आहे ? शेतकरी, आरक्षण, उद्योग या बाबतीत काय विचार आहेत, हा संशोधनाचा विषय आहे !

मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना कात टाकताना दिसते. ते नव्यानं असा काही आर्थिक विकासाचा अजेंडा हाती घेतील का ? त्यांच्याकडे तशी माणसं आहेत का ? तो विचार त्यांना झेपेल का ? की पुन्हा ते भाजपाच्या कळपात जाऊन सामील होतील ? ह्या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देवू शकेल.

हाच प्रश्न थोड्याफार फरकानं राष्ट्रवादीबाबत सुद्धा निर्माण होऊ शकतो. त्यांच्याकडे आर्थिक विचार असला तरी तो ओबीसी, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आहे, असं दिसत नाही. शिवाय त्यांना भाजपा बद्दल विटाळ आहे, असंही नाही ! काँग्रेस मात्र भाजपा सोबत जाणार नाही एवढं नक्की ! २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेस आक्रमकपणे पुढं जाणार, असं चित्र सध्यातरी दिसत आहे. उत्तरप्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना काय प्रतिसाद मिळतो यावर त्यांची पुढील निती किंवा भवितव्य अवलंबून आहे.

हे चार प्रमुख पक्ष सोडले तर इतर छोट्यामोठ्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहांचा देखील महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार करावा लागेल. ओबीसींना योग्य न्याय देण्याच्या बाबतीत हे चारही प्रस्थापित पक्ष आजवर अपयशी ठरलेले आहेत. पुढंही फार काही अपेक्षा करता येणार नाही.

ह्यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी हा देखील एक महत्वाचा घटक आहे. आरपीआयचे महाराष्ट्रात डझनावारी तुकडे झालेले असले तरी प्रकाश आंबेडकर यांची ताकद नजरेआड करून चालणार नाही. त्यांनी नेहमीच पक्षाला जातीच्या पलिकडे जाऊन व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मधे मधे जी काही मोजकी राजकीय वादळं येवून गेलीत, त्यात प्रकाश आंबेडकर यांचा वाटा उल्लेखनीय होता, हे नाकारून चालणार नाही.

मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या काळाचा विचार करता जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वात एक विदर्भवादी वादळ येवून गेलं. नंतर १९८०-८५ च्या सुमारास शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना नावाचं आर्थिक आणि शेतकऱ्यांचा सहभाग असलेलं एक वादळ येवून गेलं. दलित पँथर ही सुद्धा एक मोठी चळवळ महाराष्ट्रात होऊन गेली. त्यातून अनेक मागासवर्गीय नेते तयार झालेत. पण बाबासाहेबांचा मूळ विचार मात्र हरवला.

सेनेतून फुटून निघालेले राज ठाकरे यांनी देखील मनसेच्या माध्यमातून लक्षवेधी राजकारणाला सुरुवात केली होती. महादेव जानकर यांनीही बऱ्यापैकी संघटन उभं केलं होतं. पण भाजपाच्या नादी लागून त्यांचाही पार पाचोळा झाला. राजकारण आणि समाजकारण यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करत बहुजन समाज पार्टीनं देखील महाराष्ट्रात काही काळ वादळ निर्माण केलं होतं. पण आता त्याचंही काही खरं नाही. त्यांच्या करणी आणि कथनी मध्ये एवढा फरक आहे, की त्यांच्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे आत्मघात.. हाच सरळ अर्थ आहे !

ह्या साऱ्याहून भिन्न पण महाराष्ट्राच्या आणि अन्य मागासवर्गीयांच्या विचारात लक्षवेधी बदल घडवून आणणारी एक महत्त्वपूर्ण संघटना म्हणजे ‘मराठा सेवा संघ !’ पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वातील मराठा सेवा संघानं केलेलं काम नक्कीच उल्लेखनीय आहे. सेवा संघाचे विविध कक्ष आहेत. अर्थात अनेक पक्षांचे असे कक्ष किंवा सेल असतात. पण मराठा सेवा संघाच्या मुशीतून तयार झालेली बहुजन समाजातील युवा वक्त्यांची फळी, महिला कार्यकर्त्यांची फौज, आर्थिक संस्थांचा विस्तार, जिल्ह्याजिल्ह्यात त्यांनी उभारलेली वसतिगृह, सेवा संघाची कार्यालये, साहित्य संस्था, प्रकाशन संस्था, मराठा मार्गचे प्रकाशन इत्यादी गोष्टी त्यांच्या दूरदर्शी नियोजनाचा बोलका पुरावा आहेत. मुस्लिम-हिंदू-मागासवर्गीय यांच्यातील वैचारिक अभिसरण ह्यात देखील सेवा संघानं उल्लेखनीय काम केलं आहे. त्यातूनच पुढं राजकीय आघाडी म्हणून स्थापन केलेली शिवराज्य पार्टी किंवा त्यानंतरची संभाजी ब्रिगेड या नावानं नोंदणी केलेली राजकीय पार्टी ह्या महत्त्वाच्या राजकीय घटना आहेत.

मराठा – ओबीसी आरक्षण ह्या बाबतीतल्या गोंधळाच्या भूमिकेचा फटका त्यांनाही बसला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. पण विचारपूर्वक आणि स्वच्छ, पारदर्शी भूमिका घेऊन मार्ग काढला तर पुढील निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचाही महत्त्वाचा वाटा राहू शकतो, असं समजायला हरकत नाही.

यासोबतच आणखीही काही संघटना नव्यानं समोर येत आहेत. काही वेगवेगळे ग्रुप या दिशेनं चर्चा करत आहेत. प्रयत्न करत आहेत. प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वातील किसान ब्रिगेड सुद्धा नवी मांडणी करत आहे. कृषी उद्योजकांसाठी योजना आखत आहे. हे छोटेमोठे प्रवाह एकत्र आले पाहिजेत, असाही विचार मांडला जातो. अर्थात, त्यात बऱ्याच अडचणी सुद्धा आहेत. पण त्यातूनही मार्ग काढला जाऊ शकतो !

महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनर्मांडणी करतांना सामाजिक समता, सत्तेचं समान वाटप, शेतकरी – ग्रामीण प्रश्नांना प्राधान्य आणि ओबिंसींचं नेतृत्व ह्या निकषावर ती करावी लागेल. ग्रामीण उद्योग, कृषी उद्योग, ग्रामीण शिक्षणाच्या सोयी, नवे रोजगार.. ह्या गोष्टींचा विचार आणि कृतिशील कार्यक्रम असलेला राजकीय पर्याय महाराष्ट्रात उभा करावा लागेल. जात – धर्म – प्रांत – भाषा – मंदिर – मशीद – पुतळे असल्या निरर्थक वादातून बाहेर पडावं लागेल. द्वेषाचं राजकारण सोडावं लागेल. त्यानंतरच अशी पुनर्मांडणी शक्य आहे. अर्थात या पर्यायाचं नेतृत्व ओबीसींच्या हातातच असायला हवं आहे.. आणि त्यासाठी सामाजिक बांधिलकी ही प्रमुख अट असायला हवी !

बॅनरवर महापुरुषांच्या फोटोंची गर्दी करण्यापेक्षा त्यांचे विचार आधी मेंदूत आणि नंतर कृतीत आणावे लागतील. नव्या दमाची टीम उभी करावी लागेल. राजकारण आणि समाजकारण ह्यातील फरक समजून घ्यावा लागेल. त्यासाठी त्याग देखील करावा लागेल. विशेष म्हणजे सर्वात आधी दुटप्पीपणा आणि प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांची गुलामगिरी सोडावी लागेल..!

असा.. त्याग आणि समर्पणाची ज्यांची तयारी असेल तेच उद्याचे नेते होतील.. तेच नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार होतील.. तेच उद्याचा इतिहास लिहितील !

तूर्तास एवढंच..

ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर अभियान
9822278988
•••
टीप – माझा कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही.

#लोकजागर अभियान मध्ये सहभागी व्हा !
#महागुरूकुल परिवारात सहभागी व्हा !
धन्यवाद !
•••
संपर्क –
लोकजागर अभियान
• 8446000461
• 8275570835
• 9545025189
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *