मातांनी आता भूमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत : महापौर राखी संजय कंचर्लावार

लोकदर्शन 👉 मोहन भारती

-⭕ महानगरपालिकेच्या सभागृहात स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धांचे पुरस्कार वितरित

चंद्रपूर, ०९ मार्च : निसर्ग हाच देव आहे, त्यावर प्रेम केले पाहिजे. आज पर्यावरणाची देखील काळजी घेण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. या भूमातेचे, वसुंधरेचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मातांनी आता भूमातेच्या रक्षणा प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनपाच्या राणी हिराई सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्याला महापौर राखीताई ‌कंचर्लावार, स्वच्छतेच्या ब्रँड ॲम्बेसेडर उषाताई बुक्कावार, सहायक आयुक्त विद्या पाटील यांची उपस्थिती होती.

मागील दोन महिन्यांमध्ये स्वच्छता विभागाच्या वतीने माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. स्वच्छतेची पैठणी, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्टिंग, प्लास्टिक कलेक्शन, ई वेस्ट कलेक्शन आदीं बाबत स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये चंद्रपूर शहरातील विविध भागातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. पैठणी व सन्मानपट्टीका देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संबोधित करताना महापौरांनी उपस्थितांना सर्वप्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पुराणातील स्त्री देवतांचे दाखले देत त्यांनी नारी शक्तीचे महत्व अधोरेखित केले. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेविषयी जागरूक होण्याचे आवाहनही त्यांनी महिलांना केले. नदी, नाले, तलाव हे जलस्रोत म्हणजे निसर्गाचे वरदान असून त्यात प्लास्टिक, कचरा, निर्माल्य आदी टाकून त्यांचे पावित्र्य भंग करू नका असेही त्या म्हणाल्या.

स्वच्छतेच्या ब्रँड अँबेसेडर उषा बुक्कावार यांनी आपल्या संबोधनातून झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला. प्रत्येकाने आपल्या जन्मदिनी किंवा आपल्या आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगी एक झाड लावावे आणि त्याचे संगोपन करावे. निसर्गाची निगा राखावी. तसेच माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत महानगरपालिकेतर्फे घेण्यात येत असलेले विविध उपक्रम आणि कार्यक्रमांना उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सहायक आयुक्त विद्या पाटील यांनी देखील आपल्या मार्गदर्शनात महानगरपालिकेद्वारे माझी वसुंधरा अभियान २.० आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. चंद्रपूर शहरातील नागरिकांमध्ये ऊर्जा संवर्धन, अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर याविषयी जागरूकता वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहने, सौर उपकरणे यांचा वापर वाढला असल्याबद्दल देखील त्यांनी समाधान व्यक्त केले. प्लास्टिक बंदी, कचरा संकलन आदींविषयी प्रत्येक घरांतील गृहिणी व स्त्रियांनी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. त्यामुळे घरांतील इतर सदस्यांमध्ये देखील याविषयी जागरूकता निर्माण होईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित महिलांना मतदार नोंदणी व मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here