Home
Home चंद्रपूर मोबाईलच्या युगात मैदानी खेळ जपण्याचा आदर्श; साखरवाहीत भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

मोबाईलच्या युगात मैदानी खेळ जपण्याचा आदर्श; साखरवाहीत भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती

चंद्रपूर – मोबाईलच्या युगात मैदानी खेळ व पारंपरिक संस्कृती मागे पडत असताना, अशा काळात ग्रामीण पातळीवर कबड्डी स्पर्धांचे आयोजन करून परंपरा जपली जात आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही येथे जगदंब क्रीडा मंडळ व जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुषांच्या भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमापूर्वी आमदार मुनगंटीवार यांची लेझीम पथकासह बैलबंडीवरून मिरवणूक काढण्यात आली. तसेच लाडूतुला करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अनेक वर्षांनंतर बैलबंडीवर बसण्याचा योग आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रेमाने व आपुलकीने केलेल्या स्वागताबद्दल साखरवाहीतील कार्यकर्ते व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी महिंद्र गावंडे, श्रेयस भालेराव, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, शोभाताई पिदूरकर, विनोद खापने, सुरेश सोयाम, सिद्धार्थ कवाडे, रामभाऊ कडुकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, “१९९५ ते २००९ या काळात मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. येथील नागरिकांनी मला कायमच प्रेम व आशीर्वाद दिले. जवळपास पंधरा वर्षांनंतर पुन्हा भेटताना आनंद होत आहे. या गावाच्या सेवेसाठी कधीही आवाज द्या, मी तुमच्यासाठी धावून येईन. १९९५ मध्ये तुम्ही मला निवडून दिले नसते, तर आज शेतकरी व उपेक्षितांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले नसते.”

ग्रामीण क्रीडापरंपरेला चालना देणाऱ्या या स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here