नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघातर्फे महाधरणे आंदोलन.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १५ फेब्रुवारी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्त बांधवांवर नेहमी होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उठविण्यासाठी व प्रकल्पग्रस्त व स्थानिक भूमीपुत्रांवर नेहमी होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ सिडको प्रशासन विरोधात नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाने आक्रमक भूमिका घेतली असून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघतर्फे मंगळवार दि २० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता सिडको भवन, बेलापूर, नवी मुंबई येथे महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी महासंघतर्फे विविध मागण्या मान्य करण्याची मागणी सुद्धा करण्यात येणार आहे. भूमिपुत्रांनी तसेच प्रकल्पग्रस्तांनी आपल्या न्याय हक्कासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघचे अध्यक्ष कॉ. भूषण पाटील, कार्याध्यक्ष दिपक पाटील, सरचिटणीस सुधाकर पाटील, समन्वयक -ऍडव्होकेट दिपक ठाकूर,उपाध्यक्ष -ऍडव्होकेट विजय गडगे यांनी केले आहे.

 

विविध मागण्या खालीलप्रमाणे :-

१) नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरावरील तोडक कारवाई त्वरित थांबवण्यात यावी.

२) गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या शासन आदेशाची सुधारणा करून अंमलबजावणी करावी.

३) प्रकल्पग्रस्तांच्या १२.५ टक्के मधून कपात केलेले ३.७५ टक्के भूखंड व घरांपोटी कपात केलेले भूखंड परत देण्यात यावेत.

४) नवी मुंबई एसई झेड रद्द करून ती जमीन सिडकोने परत घ्यावी व प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित साडेबारा टक्के भुखंडाचे वाटप करावे.

५) उरण तालुक्यात नव्याने जारी केलेल्या भूसंपादनाच्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात व जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांच्या साडेबारा टक्के भुखंडाचे त्वरीत वाटप करण्यात यावे.

६) सिडकोने नवी मुंबईतील प्रत्येक गावाला क्रीडांगणासाठी भूखंड वाटप करावा.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *