प्रलंबित सौर ऊर्जा कुंपण योजना राबविण्याकरिता इको-प्रो चे शेतकरी-शेतपीक सुरक्षा सत्याग्रह

by : Shankar Tadas

चंद्रपूर : वन्यप्राणी कडून होणारे शेतपिक नुकसान टाळण्यासाठी प्रलंबित राज्यव्यापी “सौर ऊर्जा कुंपण योजना” राबविण्याची तसेच प्रत्येक शेतकरीला लाभ देण्याच्या मागणिकरिता इको-प्रो चे “शेतकरी-शेतपिक सुरक्षा सत्याग्रह” आज चंद्रपूर वनवृत्त कार्यालय समोर करण्यात आले. सत्याग्रह आंदोलन नंतर इको-प्रो तर्फे मागणीचे निवेदन मुख्य संरक्षक यांचे मार्फत शासनाला देण्यात आले.

यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे नेतृत्वात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सत्याग्रह करण्यात आले यात नितीन रामटेके, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, भारती शिंदे, प्रितेश जीवने, सचिन धोतरे, सुधीर देव, अतुल इंगोले, प्रकाश निर्वाण, धर्मेंद्र लुनावत, ओमजी वर्मा सहभागी झाले होते.

*मानव-वन्यप्राणी संघर्ष मध्ये शेतकरी-शेतपिक संकटात तर सहजीवन कसे शक्य होईल*
चंद्रपूर जिल्हयात मानव वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला असुन यात मनुष्यहाणी, वन्यप्राण्याकडुन पाळीव जनावरांची शिकार सोबतच शेतपीक नुकसानीची समस्या मोठी आहे. वनव्याप्त, वनालगतच्या शेतीच नाहीतर सर्वच शेतशिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढलेला असुन रानडुक्कर व रोही मुळे शेतपीक नुकसानीत प्रचंड वाढ झालेली आहे. चंद्रपूर जिल्हासह संपुर्ण विदर्भात वनालगतच्या शेतशिवारात वन्यप्राण्यांकडुन होणारे शेतपीक नुकसान वाचविण्याकरीता मोठया प्रमाणात तारेचे कुंपण करून त्यात जिवंत विदयुत प्रवाह सोडण्यात येत आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षात चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, नागपूर या जिल्हयात अनेक वाघ व वन्यप्राणी मृत्युच्या घटना समोर आलेल्या आहेत. या घटनेमुळे या शेतकÚयावर वनविभागकडुन व विदयुत विभागकडुन सुध्दा करण्यात आलेल्या कायदेशीर कार्यवाहीला सामोरं जावे लागत आहे. त्याशिवाय अनेक शेतकरी व शेतमजुर सुध्दा या विदयुत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने मृत होण्याचा घटना होत आहेत. शेतकरी बांधवाची अवस्था ‘एकडे आड तिकडे विहीर’ अशी होत असते. शेतकरी बळीराजा आणी जंगलाचा राजा वाघ दोन्ही सुरक्षित राहणार तरच सहजिवन शक्य होइल, याकरीता इको-प्रो चे प्रयत्न चालविले जात आहे.

*सौर ऊर्जा कुंपण प्रभावी उपाय*
शासन व वनविभाग सुध्दा याबाबत गंभीर आहे मात्र कार्यवाही तत्परतेने होणे गरजेचे आहे. वाघांचा व वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या वनव्याप्त तसेच वनालगतच्या शेतशिवारात शेतपीक संरक्षणासाठी विदयुत प्रवाह सोडल्याने होणारे वन्यप्राणी मृत्यु रोखण्यासाठी, तसेच शेतपीक नुकसान वाचविण्याच्या दृष्टीने प्रभावी असेलेले ‘सौर उर्जा कुंपन’ योजना राबविण्याची गरज आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात मागील 8-10 वर्षापासुन सदर ‘सौर उर्जा कुंपन’ अनुदान तत्वावर देण्यात आल्याने येथील शेतपीक नुकसान आणी विदयुत तारेचे कुंपण लावण्यावर नियंत्रण आले आहे, आणी या योजनेचे चांगले परीणाम दिसुन येत आहे. मात्र ही समस्या फक्त बफर क्षेत्रात नसुन जिल्हयात सर्वत्र असताना, सोलन कुपंनाची मागणी असताना फक्त बफर, काॅरीडोर मधील क्षेत्र करीताच नाहीतर प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरीपर्यत ही योजना पोहचली पाहीजे. मात्र अनेक वर्षापासुन वनविभागाची ही महत्वपुर्ण योजना मात्र प्रलंबीत आहे.

व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीनेसुध्दा शेतकरी बांधवाची शेतपीक नुकसानीची समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणुन बफर च्या धर्तीवर चंद्रपूर जिल्हयासह विदर्भातील सर्वच जिल्हयात ‘शेतपीक वाचविण्याच्या दृष्टीने’ वनव्याप्त शेतकरीकरीता ‘मागेल त्यास सौर उर्जा कुंपण’ योजना अनुदान तत्वावर राबविण्यात यावे अशी मागणी इको-प्रो संस्थेच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी इको-प्रो तर्फे बरेचदा पाठपुरावा व आंदोलन सुध्दा करण्यात आले मात्र अदयापही अनेक शेतकरी, अनेक गावात, जंगलापासुन लांब असलेले गांवात सुध्दा ही समस्या असंताना ते सुध्दा शेतकरी यापासुन वंचीत आहे. परीणामतः शेतकरी, गावकरी यांची वन्यप्राणी व वनविभाग यांचे प्रती नकारात्मक भावना दिवसागणीक वाढ होताना दिसत आहे. यावर उपाय म्हणुन शासनाची प्रलंबीत ‘सौर उर्जा कुंपण योजने’चा लाभ प्रत्येक शेतकरीला देणे अत्यंत महत्वाचे आहे. यात बफर, काॅरीडाॅर वनक्षेत्र नाही, जंगल नाही अशा भागात सुध्दा शेतपीक नुकसान तृणभक्षी प्राणीकडुन होत असल्याने प्रत्येक शेतकरीला लाभ देण्याची मागणी आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *