मोबाईलद्वारे लघुपट निर्मिती : दिग्दर्शक प्रसाद नामजोशींचे मार्गदर्शन

by : Rajendra Mardane

वरोरा : महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागांतर्गत ‘ अटल इनोव्हेशन अँड इंक्युबेशन सेंटर ‘ च्या वतीने महाविद्यालयाच्या ग्रंथालयीन कक्षात प्रख्यात दिग्दर्शक,पटकथाकार आणि संवादलेखक प्रसाद नामजोशी यांनी दोन दिवसीय मोबाईल लघुपट निर्मिती कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अक्षरशः मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे हे होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रंजना लाड उपस्थित होत्या.
प्रमुख मार्गदर्शनात डॉ. नामजोशी म्हणाले की, मोबाईलने डॉक्युमेंट्री आणि सिनेजगतात नवीन क्रांती घडविली असून येणाऱ्या काळात हा सिनेमा, सोशल मिडियाचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म राहील सफल व्यक्ती बनण्यासाठी लागणारे आवश्यक सर्व कौशल्य मोबाईलमध्ये असून चांगल्या प्रकारे वापर केल्यास यातून रोजगाराभिमुख नवीन शिक्षण, प्रसिद्धी व आर्थिक प्रगतीही साधता येईल, असे त्यांनी निक्षून सांगितले. या कार्यशाळेत त्यांनी कमीत कमी संवादाचं महत्त्व अधोरेखित केलं. सिनेमा निर्मितीची प्रक्रिया व तंत्रज्ञान, विषयाची निवड, चित्रपटाचे चित्रिकरण करताना घ्यावे लागणारे विविध शॉट्स आणि अँगल्सचा उपयोग, या क्षेत्रातील संधी आणि आव्हाने,लघुपट निर्मितीसाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या तयारीची अत्यंत बारीक माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी त्यांनी आनंद निकेतन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून आपल्या भूतकाळातील प्रतिकूल परिस्थितीतील आठवणींना उजाळा दिला. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून पूर्वीच्या तुलनेत भरपूर सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास आणि कौशल्य निर्मितीसाठी करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मृणाल काळे म्हणाले की, हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणा देईल. विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग आपला अभ्यासक्रम समजण्यासाठी आवर्जून करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी निवडक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात डॉ.रजनी लाड यांनी डॉ. प्रसाद नामजोशी यांच्या कार्याचा परिचय करून दिला. त्या म्हणाल्या की, मोबाईलच्या सकारात्मक उपयोगातून सृजनात्मक निर्मितीद्वारे आपल्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी तसेच आपल्या मनातील अनुभव, कल्पना, विचार आणि साहित्याची समाज माध्यमाद्वारे कौशल्यपूर्ण मांडणी करण्यासाठी ‘ शार्ट फिल्म मेकिंग वर्कशॉप ‘ विद्यार्थ्यांना नवीन दिशा देईल. विद्यार्थ्यांनी डॉ. नामजोशी यांच्या मार्गदर्शनातून बोध घेत भविष्यात प्रगती साधावी, असेही त्यांनी नमूद केले.
सुरूवातीला व्यासपीठावरील मान्यवरांनी दीप प्रज्वलन केल्यावर प्राचार्य डॉ. मृणाल काळे याच्या हस्ते डॉ. नामजोशी यांना रोपटे व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी ताजने यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रंजना लाड यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. मोक्षदा मनोहर, डॉ. प्रवीण मुधोळकर, प्रा. प्रमोद सातपुते प्रा. अमोल ठमके, प्रा. हर्षल चौधरी प्रा. हेमंत प्रचाके, प्रा. तिलक ढोबळे आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेत विद्यार्थी – विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *