पांढरकवडा येथील श्री राम मंदिराच्या निर्माणसाठी व परिसर विकासासाठी पूर्ण शक्तीने सहकार्य करू -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार* *♦️वढा तीर्थक्षेत्राचे काम दर्जेदार व्हावे!* *♦️पांढरकवडा येथे श्रीराम, शिव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*घुग्गुस, दि. ६ :* पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानच्या परिसरात निर्माणाधीन असलेले श्रीराम आणि शिवमंदिर येत्या श्रीरामनवमीपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प करावा,प्रभू श्री राममंदिराच्या विकासकामासाठी पूर्ण शक्तीने सहकार्य करू अशी ग्वाही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

पांढरकवडा येथे श्रीराम व शिव मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महामंत्री महानगर ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजयुमो प्रदेश सचिव अनिल डोंगरे, राम मंदिर अध्यक्ष श्री. पवार, सरपंच सुरेश तोताडे, लक्ष्मण सादलावार, चिन्ना नलभोग, समीर भिवापुरे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, श्रीराम सेतू निर्माणाच्या वेळी प्रभू श्रीरामांनी महादेवाची आराधना केली. अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या श्रीराम मंदिरासाठी नुकतेच चंद्रपुरातून सागवान काष्ठ रवाना झाले ही बाब हा आनंद देणारी आहे. त्याच चंद्रपुरातील पांढरकवडा येथे श्रीराम आणि महादेवाचे मंदिर होत आहे, ही आनंद द्विगुणीत करणारी बाब आहे. चंद्रपुरातून अयोध्येत गेलेले सागवान काष्ठ मंदिराची सुमारे एक हजार वर्षापर्यंत शोभा वाढवेल, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी अभिमानाने नमूद केले.

*तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार*

पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानाचा परिसर ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात येतो. त्यामुळे येथे सुंदर उद्यान, भाविकांसाठी सभागृह, भक्तनिवास उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाहीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

*भूस्खलन पीडिताना मदत*

घुग्घुस येथे काही महिन्यांपूर्वी भूस्खलन झाले होते. या भूस्खलनामुळे अनेकांची घरे पडली होती. या घटनेतील पीडितांना दीड लाख रुपयांच्या मदत धनादेशाचेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. शासन आणि आपण या परिवारांच्या पाठीशी आहोत, असे ते यावेळी म्हणाले.

*वढा विकास आराखडा*

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती,मागणीची दखल घेत ना.मुनगंटीवार यांनी पांढरकवडा जवळच असलेल्या वढा तीर्थक्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून वढा तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. वर्धा आणि पैनगंगा नदीच्या संगमावर दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. या आराखड्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळेल. या विकास आराखड्याचे काम दर्जेदार पद्धतीने करावे, असे प्रतिपादन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *