गौरव सामाजिक संस्था अन् व्यक्तींचा.. पुढाकार सामाजिक न्याय विभागाचा..!

 

लोकदर्शन मुंबई ;👉राहुल खरात

समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व यामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाज सेवक यांना सामाजिक न्याय विभागाकडून दरवर्षी विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सन 2019-2020, 2020-2021 व 2021-2022 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे पुरस्कार कोणते, त्याचे स्वरूप काय, निवडीचे निकष कोणते याविषयी जाणून घेवू.. या लेखाच्या माध्यमातून.!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप: व्यक्ती- 51 व्यक्तींना प्रत्येकी रु.15 हजार (धनाकर्ष), संस्था- 10 संस्थांना प्रत्येकी रु.25 हजार (धनाकर्ष)

पुरस्कारासाठी निवडीचे निकष:

व्यक्तीसाठी- अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग कल्याण शेत्रात उल्लेखनीय कार्याचा पंधरा वर्षाचा अनुभव,

संस्थेसाठी- संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा. संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आवश्यक. मागील पाच वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल आवश्यक.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप: व्यक्ती- 25 व्यक्तींना प्रत्येकी रु.25 हजार (धनाकर्ष), संस्था- 06 संस्थांना प्रत्येकी रु.50 हजार (धनाकर्ष)

पुरस्कारासाठी निवडीचे निकष:

व्यक्तीसाठी- मातंग समाजाचा करता कला साहित्य शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामवंत, कलावंत साहित्यिक व समाजसेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात 10 वर्षे कार्य केलेले असावे. व्यक्ती व संस्था एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कारास पात्र समजण्यात येणार नाही. महिलांसाठी 30 टक्के पर्यंत असाव्यात. पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत व साहित्यिक व समाजसेवक यांचा विचार केला जाईल.

संस्थेसाठी- समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था. मातंग समाजाच्या कल्याणासाठी 10 वर्षाहून अधिक मौलिक काम असावे. मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहून पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप: व्यक्ती- एका व्यक्तीस रु.21 हजार (धनाकर्ष), संस्था- एका संस्थेला रु.30 हजार (धनाकर्ष)

पुरस्कारासाठी निवडीचे निकष:

व्यक्तीसाठी- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमीहीन शेतमजूर व दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात कमीत कमी पंधरा वर्ष कार्य केलेले असावे. एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र या गोष्टींचा विचार केला जाणार नाही.

संस्थेसाठी- समाज कल्याण क्षेत्रात व अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती मोहीम, शेतमजूर यांचे कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेला हा पुरस्कार दिला जाईल. समाजकल्याण क्षेत्रात दहा वर्षे कार्य असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिल करण्यात येईल.

संत रविदास पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप: व्यक्ती- एका व्यक्तीस रु.21 हजार (धनाकर्ष), संस्था- एका संस्थेला रु.30 हजार (धनाकर्ष)

पुरस्कारासाठी निवडीचे निकष:

व्यक्तीसाठी- चर्मकार समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या नामवंत समाजसेवक असावेत. सामाजिक क्षेत्रात कमीत कमी पंधरा वर्षे कार्य केलेले असावे. एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.

संस्थेसाठी- समाजकल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेला हा पुरस्कार दिला जाईल. समाज कल्याण क्षेत्रात दहा वर्ष कार्य असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत अट शिथिलक्षम राहील.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार या पुरस्कारासाठी..
अ) व्यक्तीकरिता वयाची अट पुरुषांसाठी 50 वर्षे आणि महिलांसाठी 40 वर्षे आहे.

आ) या पुरस्कारासाठी संस्थांच्या बाबतीत या संस्था ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम, 1950 व संस्था नोंदणी अधिनियम, 1860 अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात आणि या संस्था राजकरणापासून अलिप्त असाव्यात.

वरील सर्व पुरस्कारांसाठी शिफारशीच्या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत:
अ) व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र, आ) विनादुराचार प्रमाणपत्र, इ) गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, ई) सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, उ) संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशील.

शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक
पुरस्काराची संख्या: एकूण 12 पुरस्कार (सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन प्रमाणे 12 संस्था)

पुरस्काराचे स्वरूप (शासकीय /अशासकीय संस्था): रुपये 7.50 लक्ष (धनाकर्ष), सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ.

पुरस्कारासाठी निवडीचे निकष:

संस्थेसाठी: राज्य शासनाच्या “रुल ऑफ बिझनेस” अनुसार हा विभाग कार्यालय असला पाहिजे. संस्थेने समाजातील दुर्बल व मागासवर्गीय घटकातील व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व यासारख्या व्यक्तिगत व सामाजिक क्षेत्रामध्ये एकमेवाद्वितीय कार्य केले असले पाहिजे. ही संस्था संबंधित क्षेत्रात किमान मागील दहा वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे. संबंधित संस्थाही मुंबई पोलीस अधिनियम 150 व संस्था नोंदणी अधिनियम 1860 अन्वये नोंदणीकृत असावी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय “प्रावीण्य” पुरस्कार
पुरस्काराची संख्या: राज्यस्तर- 03, विभागीय स्तर- एकूण 06 महसूल विभागात प्रत्येकी 03 याप्रमाणे 18 पुरस्कार.

पुरस्काराचे स्वरूप:

राज्यस्तरीय पुरस्कार- प्रथम पुरस्कार- 05 लक्ष रुपये, द्वितीय पुरस्कार- 03 लक्ष रुपये, तृतीय पुरस्कार- 02 लक्ष रुपये
प्रत्येक प्रवर्गामधून उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस रुपये 01 लक्ष पारितोषिक देण्यात येते.
राज्यस्तरीय पुरस्कार– 03,
विभागीय स्तर पुरस्कार– 18
पुरस्कारासाठी निवडीचे निकष:

संस्थेसाठी– अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी निवासी शाळा/ आश्रमशाळा, अनुसूचित जातीच्या मुला-मुलींची अनुदानित वसतिगृहे.

प्रत्येक स्तरावर समितीने दिलेला निर्णय अंतिम राहील. संस्थेची तपासणी करून समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येईल. पुरस्कारासाठी अंतिम निवडीच्या वेळी जर दोन्ही संस्थांना समान गुण मिळाल्यास चिठ्ठी पद्धतीने संस्थेची निवड करण्यात येईल.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणारी संस्था 5 वर्ष कालावधीपर्यंत पुन्हा पुरस्कारासाठी पात्र असणार नाही. ज्या संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाले असतील किंवा शासकीय अनुदानाचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले असेल अशा संस्था पुरस्कारासाठी प्राप्त राहणार नाही. कोणतीही संस्था एकाच वेळी दोन पारितोषिके मिळण्यास पात्र असणार नाही.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना अशा प्रकारे विविध पारितोषिके व पुरस्काराने सामाजिक न्याय विभागातर्फे गौरविण्यात येते. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. याबाबतची माहिती https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

तरी इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील त्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे दि.15 मे 2022 पर्यंत नमूद करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे.

मनोज शिवाजी सानप
जिल्हा‍ माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *