चंद्रपूर, वर्धा, अमरावती, ब्रह्मपुरी येथील जास्त तापमानाची कारणे डॉ. योगेश दुधपचारे यांचे विश्लेषण


By : Shankar Tadas
लोकदर्शन👉

सध्या चंद्रपूर परिसर जगातील सर्वात जास्त तापमानाचा झालेला आहे. चंद्रपुरातील सामान्य मनुष्याला एक प्रश्न नेहमीच पडलेला असतो तो असा पृथ्वीतलावरील सर्वात जास्त तापमान प्रत्यक्षता विषुववृत्तावर नसून ते विषुववृत्तापासून वीस वर्षांच्या आसपास असलेल्या शहरांत का पाहावयास मिळते? विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, अमरावती, ब्रह्मपुरी, अकोला, राजस्थानातील चुरू, पाकिस्तानातील अबोटाबाद किवा आफ्रिकेतील सेनेगल मधील काही ठिकाणे विषुववृत्तावर नसून सुद्धा या ठिकाणी जगातील सर्वात जास्त तापमान का नोंदवले जाते ?

या हवामान विषयक घटनेची दोन कारणे आहेत,
पहिले म्हणजे प्रत्यक्ष विषुववृत्तावर जास्त तापमान यासाठी नोंदवलं जात नाही, कारण विषुववृत्ताजवळ वर्षभर ढगांचे आच्छादन असलेले पहावयास मिळते. ढगांच्या आच्छादनामुळे सूर्यकिरणे पूर्णतः जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत, ढगांचे वरचे भाग हे बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले असतात त्यामुळे सुर्यकिरणांचे बऱ्याच प्रमाणात परावर्तन होते. विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसा कोरडेपणा वाढत गेलेला असतो, हा कोरडेपणा २० ते २५ अंशांत सर्वात जास्त मिळतो. त्यामुळे २० ते २५ अंशांत असलेल्या शहरांत कोरडेपणा जास्त असल्यामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत सरळ पोचतात आणि तापमान वाढ होते.

या घटनेचे दुसरे कारण म्हणजे ‘कॉन्टिनेन्टेलीटी’ होय. एखादे ठिकाण समुद्रापासून जेवढ्या लांब अंतरावर असेल, तेवढे त्या ठिकाणचे हवामान विषम असते. म्हणजेच जी ठिकाणे एखाद्या खंडाच्या मध्यभागात असतील तर ती उन्हाळ्यात जास्त पडतील आणि हिवाळ्यात जास्त थंड होतील. याच गुणांना ‘कॉन्टिनेन्टेलीटी’ असे म्हणतात. चंद्रपूर, वर्धा, ब्रह्मपुरी ही सर्व ठिकाणे समुद्रापासून अत्यंत लांब अंतरावर असल्यामुळे ती उन्हाळ्यात अत्यंत जास्त तापलेली असतात. या तुलनेत मुंबई मात्र चंद्रपूरच्या अक्षवृत्तांत वसलेले असल्यानंतरही मात्र कमी तापलेले असते.

जमीन आणि पाणी यांची तापण्याची गुणधर्म वेगवेगळे आहेत. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते याउलट समुद्र उशिरा तापतो आणि उशिरा थंड होतो. दुपारी बारा ते दोन वाजता जेव्हा सूर्य डोक्याजवळ असतो तेव्हा चंद्रपूर प्रचंड तापलेले असताना मुंबई समुद्रा वर असल्यामुळे ती हळुवार पणे तापते, ती सौम्य असते.

ही कारणे हवामान विषयक असली तरी काही कारणे मानवनिर्मित सुद्धा आहेत, आणि काही कारणे जमिनी सोबत जोडलेली आहेत. जसे एखाद्या ठिकाणच्या तापमनावर त्या ठिकाणी असलेली कारखानदारी, नागरीकरण, जमिनीचा स्वभाव यांचा अतिरिक्त प्रभाव पडतो. चंद्रपूर हे कारखानदारी च्या प्रभावाखाली आहे. ब्रह्मपुरी शहर है ‘लेटेराईट’ दगडावर वसलेले आहे, आणि हे संपूर्ण दगड उघड्यावर आहेत, त्यामुळे ते जास्त तापतात. अशी वेगवेगळी कारणे स्थानिक प्रभाव पाडू शकतात. याच कारणामुळे विदर्भातील शहरे जगातील सर्वात जास्त तापमानाची केंद्रे बनली आहेत.

#डॉ. योगेश दूधपचारे
यांची फेसबुक पोस्ट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *