यवतमाळ जिल्ह्याचे विक्रमी भूदान!

By : Gajanan Jadhao
जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासात 18 एप्रिल 1959 या तारीखेची नोंद सुवर्णाक्षरांनी झाली आहे. आचार्य विनोबा भावे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या दिवशी यवतमाळ येथे विक्रमी 1 लाख 37 हजार एकर जमीनीचे दानपत्र देण्यात आले होते. अहिंसक मार्गाने समता निर्मितीच्या लढ्यात भूदान चळवळीतून इतक्या मोठ्या प्रमाणात मिळालेल्या जमीनीचे दानपत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यवतमाळ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून स्विकारले होते.
आचार्य विनोबा भावे आंध्रप्रदेशच्या तेलंगणा भागातील पोचमपल्ली येथे पदयात्रेवर असतांना काही अर्धपोटी गरिबांच्या व्यथा ऐकून त्यांच्यासाठी गावातील एका संपन्न जमीनदाराला भूदानाची मागणी केली. ती मान्य झाली आणि १८ एप्रिल १९५१ मध्ये १०० एकराचे भूदान मिळाले. येथूनच विनोबांचा भूदान यज्ञ सुरू झाला. याच तारखेचा योग साधून यवतमाळच्या कार्यकर्त्यांद्वारे १८ एप्रिल १९५९ रोजी यवतमाळ येथे पंडित नेहरू यांच्या हस्ते भूदानपत्र स्विकृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
विनोबांसाठी भूदान म्हणजे केवळ जमीनदारांकडून जमीन मिळवून ती गरीबांना वाटप करणे एवढाच विषय नव्हता. कोणत्याही रक्तपाताशिवाय निवडक लोकांकडे एकवटलेल्या संपत्तीचे विकेंद्रीकरण करून सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्याकडे शांततापुर्ण मार्गाने सुरू केलेली ती चळवळ होती.
भूदान पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यात आल्यावर येथील भूदानाचे दानपत्र स्वीकृतीसाठी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांना बोलवावे असे येथील कार्यकर्त्यांना वाटल्याने त्यांना निमंत्रण द्यायला प्रथम खासदार सहदेवजी भारती, बाबासाहेब घारफळकर, सदाशिवराव ठाकरे, चंदू नाईक हे दिल्लीला गेले होते. यावेळी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी एक अट घातली की यवतमाळ जिल्ह्यात एक लाख एकर जमीन दान मिळणार असेल तरच मी कार्यक्रमास येईल.
त्यांची ही अट ऐकून जिल्हा सर्वोदय मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, यवतमाळ जिल्हा सभेचे कार्यकर्ते, समाजसेवक व विविध संघाचे कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले. भूदानाविषयी वातावरण निर्मिती करण्यात आली. कमी अधिक प्रमाणात शक्य तितके भूदान करण्याचे आवाहन करण्यात आले. नवतरुणांनी आपल्या पालकांना भूदान केले तरच विवाह करीन अशा अटी घालून भूदान करवून घेतले. सर्वोदयी नेते सदाशिवराव ठाकरे यांनी 8 महिन्याच्या जितेंद्र मुलास पाठीवर बांधून पत्नी अन्नपूर्णा बाई यांचे सोबत भूदानासाठी जिल्हाभर पायदळ यात्रा केली. सदाशिव ठाकरे, ठाकूरदास बंग, आर.के. पाटील व चंदू सिंग नाईक यांनी यवतमाळच्या भूदान यज्ञात प्रमुख भूमिका वठविली.
कार्यकर्त्यांच्या उत्साहातून भूदान चळवळीने आंदोलनाचे रूप घेतले. यवतमाळ व लगतच्या जिल्ह्यातील एकूण एक लाख 37 हजार एकर जमिनीचे दानपत्र तयार झाले हे दानपत्र स्विकृती साठी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यवतमाळ येथे 18 एप्रिल रोजी येण्याचे निश्चित झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाख ८० हजार एकर जमिनीचे भूदान विनोबाजींना मिळाले होते. त्यातील यवतमाळचा वाटा एक लाख चार हजार पाचशे एकर इतका होता. यवतमाळ मधून मोठ्या प्रमाणात जमीन दान देणाऱ्यांमध्ये आबासाहेब पारवेकर, उमरे पाटील, बद्रीनारायण पांडे, बाबासाहेब सरोदे, शहरातील प्रथम भूदाते ब्रिजमोहन मोर, पांढरकवडा येथून गोपाळ कृष्ण पाटील चालबर्डीकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दात्यांचा समावेश होता.
पंडित नेहरू यांच्या यवतमाळ आगमनाच्या निमित्ताने नेहरू संचालन समितीचे गठन वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्याध्यक्ष चंदुभाऊ नाईक, सचिव जवाहरलाल दर्डा, आबासाहेब पारवेकर व बाबासाहेब घारफळकर हे होते तर सदस्य म्हणून बापूजी अणे, गुणवंत देशमुख, नंदकुमार अग्रवाल, सुशिलाबाई पंडित, ताराचंद सुराणा, फुलचंद अग्रवाल, मंगलाताई श्रीखंडे, अलीहसन ममदानी, बाबुराव पाटील, ब.ना.एकबोटे, सदुभाऊ पांडे, आशाताई बर्वे, सखाराम मुडे, पहलाज राजभाई इ. चा समावेश होता.
पं. नेहरू यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल श्री. श्रीप्रकाश हे होते. स्वागतपर भाषण कृषीमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी केले होते. तर भूदान कार्याचा आढावा श्री. चंदूसिंग नाईक यांनी सादर केला होता. राज्यपाल श्री. श्रीप्रकाश, बापूजी अणे, कृषीमंत्री वसंतराव नाईक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री. श्रीमन्नारायण इ. मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 18 एप्रिल 1959 रोजी यवतमाळ येथे प्रत्यक्ष येऊन हे भूदान स्वीकारले व आचार्य विनोबा भावे व यवतमाळ येथील कार्यकर्त्यांचा सत्कार केला.
पंडित नेहरू यांनी यवतमाळ येथे मार्गदर्शन करताना सांगितले की मोठ्या-मोठ्या देशात जमिनीच्या प्रश्नावर लढाया झाल्या आहेत, गृहयुद्ध-रक्तपात याशिवाय हा प्रश्न सोडविण्याची कला त्यांना अवगत नाही, पण आम्ही शांततेने जमिनीचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडविला आहे. आज मी प्रसन्न आहे, यवतमाळ येथील हा सोहळा पाहून इतक्या उत्साहाने काम करणारे लोक ज्या जिल्ह्यात आहेत त्याठिकाणी मी यापूर्वी कसा आलो नाही, याचेच मला आश्चर्य वाटते. पंडित नेहरू त्यांच्या कार्यक्रमानिमित्त जेथे जात तेथे यवतमाळचे भूदान, येथे जमलेला असंख्य जनसामुदाय, त्यांची शिस्त, कार्यनिष्ठा याबाबत ते उल्लेख करत असत.
भूदान यज्ञ मंडळाचे कार्यालय अजूनही यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कार्यरत आहे. या मंडळाचे प्रमुख एकनाथ डगवार येथे काम पाहतात.
यवतमाळ येथे झालेल्या भूदानपत्र सोहळ्याचे ऐतिहासिक महत्व कायम जतन व्हावे म्हणून नेहरूंनी ज्या व्यासपीठावरून यवतमाळकरांना मार्गदर्शन केले त्या मंचकाचे ‘नेहरू मंच’ नावाने स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे. गोधनी रोडवर आकाशवाणी केंद्राला लागून हा नेहरू मंच आहे. सुमारे १० फुट उंचीचा मंच बांधण्यात आला आहे. हा मंच म्हणजेच नेहरूंची स्मृती आणि यवतमाळ मधील विक्रमी भूदान चळवळीची स्मृती. यवतमाळ नगरपालिकेने २००३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री शिवाजीराव मोघे व तत्कालीन जिल्हाधिकारी तथा सध्या मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेले विकास खारगे यांच्या मार्गदर्शनात नेहरू मंचचे नुतनीकरण केले होते. नगरपालिकेद्वारे त्याचे पुन्हा एकदा नुतनीकरण करण्यात येणार आहे.
यवतमाळकरांनी विक्रमी भूदान आणि पंडित नेहरूंच्या स्मृती येथे जपल्या आहेत. एकंदर विनोबांद्वारे समतेसाठी करण्यात आलेल्या भूदान यज्ञात यवतमाळकरांच्या त्यागाची आहूती, जिल्ह्याचे योगदान, येथील दानवीरांची करुणा, भुतदया, प्रेम, एका माणसाने दुसऱ्या माणसाला जगविण्यासाठी भूदानाच्या माध्यमातून केलेल्या त्यागाची गाथा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल..

– गजानन जाधव, माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ. (9923380906)

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *