वरोरा नगर परिषदेचे ११ लाखांचे शिल्लकी अंदाजपत्रक मंजूर

 

लोकदर्शन👉*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी नगर परिषद वरोराने सन २०२२- २३ या वर्षासाठी ११ लाख ६३ हजार ४४९ रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर केल्याची माहिती प्रशासक व मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी दिली.
नगर परिषद प्रशासनामार्फत वरोरा शहराचा नियोजन व विकास आराखडा दरवर्षी निश्चित केला जातो. नगर परिषदेला महसुली, भांडवली जमा, शासकीय अनुदान, आमदार- खासदार निधी, १४ व्या वित्त आयोगाचा निधी, विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान इत्यादी निधीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतो. २०२२-२३ च्या अर्थ संकल्पीय अंदाजपत्रकात नगर परिषदेला एकूण ९६ कोटी १० लाख ९७७ रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. त्यात २०२१-२२ ची प्रारंभिक शिल्लक १८ लाख ०३ हजार ४७२ रुपये धरून एकूण ९६ कोटी २८ लाख ०४ हजार ४४९ रुपये प्रस्तावित असून या एकूण जमा शिल्लक मधून शहरातील विविध विकासात्मक कार्यावरील खर्च ९६ कोटी १६ लाख ४१ हजार रुपये अपेक्षित आहे. नगर परिषदेच्या एकूण वार्षिक उत्पन्नातून सर्व मार्गानी मिळून खर्च वजा जाता ११ लाख ६३ हजार ४४९ रुपये वर्षाच्या शेवटी शिल्लक राहणार असून सदर अंदाजपत्रक परिषदेच्या विचारार्थ व निर्णयार्थ ठेवले असल्याचे मुख्याधिकारी भोयर यांनी नमूद केले.

*मूलभूत सोयींवर सर्वात जास्त खर्च*

प्रशासक तथा मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी आपल्या अंदाजपत्रकात नागरिकांसाठी आरोग्य, पाणीपुरवठा व मूलभूत सोयीं- सुविधेवर जास्त जोर दिला आहे. भोयर यांनी वरोरा शहरातल्या विकासात्मक कार्याबद्दल सांगितले कि, शहरातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, शहरातील मुख्य चौकाचे सौंदर्यीकरण, पंतप्रधान आवास योजना, मागासवर्गीय विकासावर ५ टक्के तरतूद, मागासवर्गीय व अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीवर तसेच प्राथमिक शिक्षणावर लक्षणीय भर, वैशिष्ट्यपूर्ण अनुदान अंतर्गत नवीन प्रशासकीय इमारत अंतर्गत सजावट, स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शौचालय बांधकाम योजना, वैशिष्ट्यपूर्ण निधी योजना अंतर्गत ६ लाख लिटर पाणी टाकी बांधकाम, शहरातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण करणे, तलाव सौंदर्यीकरण, वाढीव पाणी पुरवठा अभियान अंतर्गत शहराकरिता विस्तारित पाणी पुरवठा योजना राबविणे, वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन यावरील बाबींवर तसेच महिला, बालविकास व अपंगाकरीता अंदाज पत्रकात विशेष तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
तत्पूर्वी न.प.च्या सर्व साधारण सभेत सदर अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल सुरेश वदनलवार यांनी केले.
अर्थसंकल्प सादर करतेवेळी कार्यालय अधीक्षक अभिजित मोटघरे, गजानन आत्राम, कनिष्ठ लिपिक जयंत कांबळे, अंबिका गिरसावळे तसेच नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी गण उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *