जत तालुक्यातील मुचंडी,तोळबळवाडीचे दर्याप्पा मलमे….. . मला भावलेलं संघर्षशील व्यक्तिमत्व कॉम्रेड मारूती सिरतोंडे

 

लोकदर्शन जत ;👉 राहुल खरात

माझा भारत हा विविधतेने नटलेला देश असून अनेक धर्मांनी, कैक जातींनी बद्ध असलेला पण गुण्यागोविंदाने राहणारा देश म्हणून ओळखला जातो.आमच्या देशातील सगळी माणसं ही विविध धर्मात, विविध जातीत जरी विभागली असली तरीही आम्ही ‘भारतीय’म्हणून भारतीय लोकशाहीत संविधानाप्रमाणे जीवन जगत आहेत. आपल्या राज्यातील कित्येक जाती या दक्षिणेकडून तामिळनाडू,आंध्र, कर्नाटक राज्यातून येऊन महाराष्ट्रात स्थिरावल्या आहेत. यापैकीच एक धाडशी समजली जाणारी,पूर्वी जंगलआश्रित असणारी, कालांतरांने गुन्हेगार म्हणून सुद्धा ठरवलेली, पडेल ते काम इमानदारीने करणारी क्रांतीकारी जात म्हणजे रामोशी-बेरड जात.
एकेकाळी जंगलआश्रित असणाऱ्या या आदिवासी जाती स्थलांतरित होऊन गाव संरक्षणाचे काम करू लागल्या. गडकिल्ल्याच्या रक्षणाचे काम करु लागल्या. त्यामुळे आजही आपल्याला रामोशी बेरड समाजाच्या वस्त्या गावाच्या वेशीत पाहायला मिळतात. गडकिल्याच्या पायथ्याशी पाहायला मिळतात. अशा गावगाड्यात राहणारी या जातीतील अडाणी माणसं, त्यांचे शोषण करणारी गावगाड्यातील चार बुकं शिकलेली माणसं, लोकांच्या अज्ञानात सुख आहे असे मानणारी प्रस्थापित गावगाड्यातली कर्मठ माणसं यांनी विमुक्त, भटक्या दलित लोकांच्यावर वर्षानुवर्षे अत्याचार अन्याय केलेला आहे. या मागासवर्गीय समाजातील लोकांच्या मध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी वि. रा. शिंदे अशा प्रबोधनकारामुळे शिक्षणाचे वारे वाहू लागले. चैतन्य निर्माण झाले. लोकशाहीत आपल्या हक्क कर्तव्यं बद्दल जागरुकतेचे वारे वाहू लागले. लोकांचा शिकण्याकडे कल वाढला. विमुक्त भटक्यातील लोक जेव्हा शिक्षण घ्यायला लागले तेव्हा आख्खं कुटुंब बदलायला लागलं. ही प्रक्रिया गेल्या शेकडो वर्षापासून आजही सुरूच आहे. अशा विमुक्त भटक्या जमातीमधील अडाणी कुटूंबातून पुढे आलेल्या,लोकप्रिय नेत्या बद्दल चार शब्द सांगावेसे वाटले म्हणूनच हा लेखन प्रपंच…

सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला जत तालुक्यात मुचंडी नावाचं एक गाव आहे. गावची लोकसंख्या साधारण साडेसात हजार. गावाला गावाच्या आसपास सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर काही वाड्या.यापैकीच तोळबळवाडी नावाची एक वाडी.या वाडीत साधारण 70 ते 80 कुटुंबे राहतात.यापैकी साधारण 50 ते 60 कुटुंबे रामोशी बेरड समाजातील आहेत. ही सर्व कुटुंबं शेतीवाडी करून रोजगार करून जगणारी सामान्य माणसं आहेत., कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारी आणि आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या भाकरीशी गाठ घालणारी ही रामोशी-बेरड समाजातील लोक म्हणजे जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील उपेक्षित,वंचित समजली जाणारी माणसं म्हणावी लागतील. याच वाडीतील वयाची सत्तरी पार केलेले एक सदग्रहस्थ तिथले पुढारी आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाचा भक्त,माळकरी गडी,शांत स्वभावाचा, तलमदार धोतर नेसलेला हात जोडून नमस्कार करणारा एक नम्र माणूस. या माणसाचे शिक्षण सकृतदर्शनी झालेले नसावे असे वाटत असले तरी जुनी अकरावी म्हणजेच मॅट्रिकपर्यंत शाळा शिकलेला. मराठी हिंदी कन्नड इंग्रजी अशा चार-पाच भाषांवर प्रभुत्व असणारा. तोळबळवाडी आणि मुचंडी मधील लोकांच्या मध्ये लोकप्रिय असलेला, मुचंडी ग्रामपंचायतीचे दहावर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहिलेला आणि नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आलेला रामोशी-बेरड समाजातला अत्यंत नम्र माणूस जो मला भावला त्याचे नाव आहे दऱ्याप्पा सुबराया मलमे.

गेली एक महिना मुचंडी गाव सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण सांगली जिल्ह्यात, महाराष्ट्रात एवढेच काय महाराष्ट्राच्या विधिमंडळात सुद्धा गाजले ते येथील ढाबा जळीत प्रकरणावरून… याच गावच्या या लोकनेत्यावर ढाबा जाळल्याचा खोटा गुन्हा दाखल होतो काय अन याविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर येऊन निषेधाचा मोर्चा काढतात काय, अन हाच लोकनेता तुरुंगातून जामिनावर सुटल्याबरोबर सोसायटीचा चेअरमन निवडला जातो काय, सगळ्याच गोष्टी आश्चर्यचकित करुन सोडणाऱ्या. म्हणूनच मला या लोकनेत्या विषयी लिहणे उचित वाटले. शेजारच्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात अथणी तालुका आहे.याच अथणी तालुक्यातील कोट्टलगी या गावाहून गेल्या दोन-तीन पिढ्या पासून स्थलांतरित होऊन जत तालुक्यातील मुचंडी गावाशेजारील तोळबळवाडी मध्ये स्थिरावलेले हे मलमे कुटुंब. गरिबीत दिवस काढणार्‍या शेतमजूर, ऊसतोड कामगार, रोजगार हमी सारख्या कामावर जाऊन कोरडवाहू पंधरा एकर जमिनीचा मालक बनलेल्या सुबराया नागाप्पा मलमे व समाबाई या दांपत्याला जी पाच अपत्ये झाली यापैकी शिवाप्पा , सूऱ्याबा , दऱ्याप्पा आणि दोन मुली एकूण सात माणसांच्या या कुटुंबात सध्या जे नाव गाजते आहे ते आहे दऱ्याप्पा मलमे यांचे. दऱ्याप्पा मलमे यांच्या कुटूंबाकडे जरी कोरडवाहू शेती असली तरी शेतीत उत्पन्न येत नसल्याने आजही या कुटुंबातील लोकांची आमची गरिबी संपलेली नाही अशीच भावना आहे. एकतर जत तालुका पाण्याअभावी तडफडणारा तालुका. इथली माणसं पंधरा-वीस एकराचे मालक असून सुद्धा ऊसतोडी वर जातात. शेतमजूर, कामगार म्हणून वेगवेळ्या गावात जातात आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतात. जेमतेम परिस्थिती असणाऱ्या मलमे कुटुंबातील दऱ्याप्पा सुबराया मलमे यांचा जन्म 1 जानेवारी 1953 चा. आज या ग्रहस्थाने वयाची सत्तरी पार केली आहे. लहानपणी तिसऱ्याच वर्षी आईविना पोरका झालेला दर्याप्पा बापाने कष्ट उपसत मोठा केलेला पोरगा. बापाने कष्ट करून पोराला शाळा शिकवली आणि पोरगं सुद्धा जिद्दीने शिकलं. दऱ्याप्पा चे चौथीपर्यंतचे शिक्षण आपल्या गावच्या छोट्याशा जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण झालं तर पुढील शिक्षण दरीबडची व न्यू इंग्लिश स्कूल माडग्याळ येथे पूर्ण झालं. 1972 ला संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता.तेव्हा महाराष्ट्रातील साठ तालुके पूर्ण दुष्काळाने होरपळत होते. माणसाची अन्नान्नदशा झाली होती. अशा कठीण काळात जत तालुक्यातील दऱ्याप्पा मलमे या तरुणाने असल्या भिषण दुष्काळातही आपल्या शिक्षणात खंड पडू न देता अकरावी पर्यंतचे म्हणजेच मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केलं.शाळेमध्ये पावकी निमकी दीडकी आणि पाढे यावर कौशल्य प्राप्त झालेल्या या पोरानं शाळेत असताना गणितातील अनेक कूट प्रश्न लीलया सोडवले होते त्यामुळे शिक्षक वर्ग सुद्धा दऱ्याप्पा वर मनापासून खूष होता.घरची परिस्थिती गरिबीची असलेने व आपल्याला शेतीची आवड असलेने दऱ्याप्पाने अकरावीनंतर शिक्षण बंद केले व काम धंदा करत जीवनाची वाटचाल सुरू केली. हा तरुण हुशार असल्यामुळे त्या काळात राजकारणी लोकांनी याला जवळ केले. दऱ्याप्पा राजकारणी लोकांमध्ये मिसळू लागला. जनतेचे काम करत जनतेसाठी वेळ देऊ लागला. याच दरम्यान शिवधडी ला असणाऱ्या दरिकोनुर गावातील तुकाराम लक्ष्मण मलमे या हरहुन्नरी सरपंचांशी दऱ्याप्पाचा संबंध आला आणि त्यांनी दऱ्याप्पा ला अनेक गोष्टीत तरबेज केले. तुकाराम लक्ष्‍मण मलमे हे दरिकोनुर चे 40 वर्षे सरपंच राहिलेले व राजकारण समाजकारणात झोकून दिलेले आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आजही वयाच्या एकशे पाच वर्षात चांगले जीवन कंठत आहेत. दऱ्याप्पा सारख्या हुशार तरुणाला या आदर्श सरपंचानी स्वतःच्या जवळ घेऊन या तरुणाच्या मनात गावा बद्दलची,आपल्या जातीबद्दलची राजकीय आणि सामाजिक अस्मिता जागृत केली. तसेच गावातीलच भैरप्पा माळी सारख्या लोकांनी मार्गदर्शनही केलं आणि दऱ्याप्पा मलमे राजकारण समाजकारण यात झोकून देऊन काम करु लागले. मुचंडी गावच्या ग्रामपंचायतीवर ते निवडून गेले व दहा वर्षे मुचंडी गावच्या ग्रामपंचायतीवर कार्यक्षम सदस्य म्हणून काम करताना दऱ्याप्पा मलमे यांनी तोळबळवाडीत स्वतःच्या खर्चाने पाण्याचे बोर मारलं आणि सर्व वाडीला स्व खर्चातून पिण्याचं पाणी पुरवलं.आजही पिण्याचे पाणी पुरवत आहेत. ते स्वतः पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असून माळकरी असल्याने विठ्ठलाचे मंदिर बांधण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य असताना पुढाकार घेतला आणि मंदिर पूर्ण करून घेतले.तोळबळवाडी येथे कन्नड प्राथमिक शाळा त्यानी आपल्या कारकीर्दीत बांधून घेतली. लोकांची हरतऱ्हेची काम केली.कित्येक लेकीबाळींचे संसार उभे करण्यात,सुराला लावण्यात पुढाकार घेतला.अडीअडचणीत लोकांना मदत केली. गेल्या ४० वर्षांच्या कामातून दऱ्याप्पा मलमे यांना खूप मानसन्मान मिळाला तो निश्चित वाखाणण्यासारखा आहे.त्यामुळेच लहानापासून थोरांपर्यंत सर्वजण त्यांना ‘पंच’ या नावाने हाक मारतात. मात्र कुटूंबात त्यांना तात्या म्हणतात.असे हे तात्या सध्या वयाच्या सत्तरीत असून त्यांना तीन मुले आहेत. नारायण सातवीपर्यंत शिकलेला, प्रकाश पाचवी झालेला तर मुलगी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेली असे सर्वजण तात्यांच्या कुटुंबात शिक्षित असून गावातील रामोशी कुटुंबासाठी तात्या सर्वांचे आदर्श पालक आहेत.तोळबळवाडीत असो,मुचंडीत असो कुणीही या पंचा चा शब्द मोडत नाहीत. पंढरपूरच्या विठ्ठलाची माळ गळ्यात घातलेला हा माळकरी माणूस,चांगल्या स्वभावाचा राजकारणी माणूस आहे असे लोक बोलतात. पण गेल्याच महिन्यात मुचंडी गावातील सर्वोदय सहकारी सोसायटी ची पंचवार्षिक निवडणूक झाली. या निवडणुकीला जत तालुक्यातील नेते रमेश पाटील यांनी आपल्या पॅनेलमधून तात्यांना उमेदवारी दिली. तात्या बहुमताने सोसायटीवर निवडून आले. सोसायटीचे संचालक झाले. तात्यांचा झालेला विजय, तोळबळवाडी तील झालेली समाजाची एकी, तात्यांचा शांत स्वभाव,तात्या व त्यांच्या कुटूंबाला मिळणारा मानसन्मान या सर्व गोष्टीमुळे निवडणुकीतील राग मनात धरून तात्यांवर,त्यांच्या दोन मुलांवर, गावातीलच ढाबा जाळल्याचा खोटा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात तात्यांना व त्यांच्या कुटुंबाला गोवण्यात आल्यामुळे तात्यांना ,दोन मुलांना, नातवाला,अटक झाली. त्यांच्यासोबत लिंगायत समाजातील दोन तरुणांना ही अटक झाली. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली अन तात्यांच्या बाबतीत घडून आलेला हा प्रसंग पाहून लोकांचा संताप उफाळून आला. चारच दिवसात जत तालुक्यातील, जिल्ह्यातील राज्यातील समाज एकवटला आणि जत तहसील कार्यालयावर शेकडो लोकांचा मोर्चा येऊन धडकला. मोर्चाची मागणी होती दऱ्याप्पा मलमे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या. या घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करा. मोर्चानंतर नेते मंडळी पालकमंत्र्यांना, आमदार अरुण लाड यांना भेटली.तात्यांना सोडवून आणण्यासाठी, जामिनासाठी प्रयत्न करू लागली. दरम्यान तात्यासह इतरांना सांगली जेल ते कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे हलवण्यात आले. मोर्चामुळे सोसायटीची निवडणूक चांगलीच गाजली.चर्चेत आली. पोलिस तपासाला गती आली.जत न्यायालयात ॲड.आण्णाराया रेवूर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली तर पुढे जत तालुक्याचे नेते रमेश पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील फौजदारी केस मध्ये नावाजलेले वकील श्रीकांत जाधव यांचेकडे सेशन कोर्टातील काम सोपवले. या साऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तात्यांचा जामिन मंजूर झाला. सर्वांना कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर काढले. जेव्हा तात्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले तेव्हा तात्यांनी भारताचे संविधान हातात घेऊन ते म्हणाले माझा देशाच्या संविधानावर ,कायद्यावर विश्वास आहे.आमचे निर्दोषत्व लवकरच सिद्ध होईल. 8 मार्च पासून 24 मार्च पर्यंत तात्या व इतर. सर्वजण कारागृहात होते. इकडे मात्र गावाकडे लोक तात्यांबद्दल हळहळत होते. चांगल्या माणसांना विनाकारण ढाबा जळीत प्रकरणात गुंतवले असे बोलत होते. तात्यांसारखा सोज्वळ असणारा, चांगला व शांत स्वभावाचा ,कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारा माणूस तुरुंगात जाणे बरोबर नाही अशी चर्चा रंगत होती. तात्या जामिनावर सुटून आपल्या गावी परतले तेव्हा सोसायटीच्या नवीन संचालकांची बैठक झाली.अन काय आश्चर्य, सर्वोदय सहकारी सोसायटी मुचंडी च्या चेअरमनपदी सर्वानुमते तात्यां ची निवड केली. केवढा मोठा हा या लोक नेत्यावरील विश्वास… हा विश्वास खरंतर मला खूप भावला. तात्या मुचंडी सोसायटीचे चेअरमन होताच गावात ठिकठिकाणी फटाके उडवून आनंद व्यक्त केला. रामोशी-बेरड समाजात एखाद्या सामान्यातल्या सामान्य माणसावर लोकांचा विश्वास बसणं. लोकनेते म्हणून जनतेनं त्यांच्यावर अलोट प्रेम करणं,त्यांच्या कर्तुत्वाचे पोवाडे गाणं हे सगळं सगळं माझ्या मनाला भावलं .अशीच समाजाची चांगली सेवा इथून पुढच्या काळात त्यांनी करीत राहावे यासाठी तात्यांच्या कार्यास माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.चेअरमन झाल्यावर तात्यांना विचारले की तुम्ही आता चेअरमन झालात तुम्हाला काय सांगायचे आहे. तेव्हा ते म्हणाले की तरुणांनी समाजाची सेवा करावी. स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. योग्य मार्गाने जीवनाची वाटचाल करावी आणि येणाऱ्या काळात मी शेतकऱ्यांची सोसायटीत थकबाकी राहू नये यासाठीच काम करणार आहे.यातून तात्यांची समाजाप्रति असलेली निष्ठा जानवते.आपल्यावर आलेल्या अघटीत प्रसंगाने अजिबात न डगमगलेला, अत्यंत उत्साही असणारा, निर्मळ मनाचा माणूस, मुचंडी चा लोकनेता दऱ्याप्पा मलमे उर्फ तात्या यांना माझा क्रांतिकारी लाल सलाम

मारुती बळवंत शिरतोडे*
*राज्य निमंत्रक, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *