बॅरोमीटर

लोकदर्शन 👉संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

हवा अगदी हलकी असते. हवेचे वजन ते काय असायचे ? हवेचा दाब मोजण्याच्या यंत्राची गरजच काय ? हवेचा दाब कशावरती पडतो ? हवा जर सर्वत्र आहे तर तिचा दाब मोजण्याच्या भानगडीत पडायचं कशाला ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर ऐकली तर मात्र कोणाचेही डोके अतिदाबाने जड होऊन जाण्याचीच शक्यता जास्त.

हवेला वजन असते हे सोप्या प्रयोगातून अनेकांना माहिती असते. तराजूमध्ये हवा भरलेला फुगा तागडीच्या खाली टांगला तर ती बाजू खाली जाते व नुसता फुगा ठेवलेली तागडी वर जाते. पण हे वजन किती असते याचे उत्तर मात्र सहसा समोर नसते. एक चौरस मीटर जमिनीवरच्या वातावरणाच्या दाबाचे बल किंवा त्याचे वजन हे दहा हजार किलो ग्रॅम इतके असते. आकडा ऐकून छाती दडपली ना ? हा हवेचा दाब सर्वांवर पडतो. पण हवा सर्वत्र असते. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व पोकळ्या, फुप्फुसे, मोकळ्या जागा यातही हवा असते; म्हणून हा दाब जाणवत नाही. हवा सर्वत्र आहे. पण दाब मोजावा लागतो. या दाबातील बदलामुळे वातावरणातील फरक लक्षात येतात. वादळांची सूचना मिळते. दाब वाढला म्हणजे हवा चांगली आहे, प्रसन्न वातावरण राहणार आहे, खेळती हवा राहील याची खात्री मिळते. दाब अचानक कमी कमी झाला म्हणजे निर्माण झालेली पोकळी भरून काढायला दुसरीकडची हवा वेगाने धाव घेऊन वादळ निर्माण करणार आहे हे नक्की !

हवेचा दाब मोजण्याच्या यंत्रालाच ‘बॅरोमीटर’ असे म्हणतात. या यंत्राची आवश्यकता मुख्यत: विमानात नेहमी भासते. विमानाची उंची दाबातील कमी जास्त प्रमाणावरून मोजली जाते. विमान जितके उंच उडेल तितका दाब कमी होत जातो. गिर्यारोहकांनाही याची गरज भासते, पण कमी प्रमाणात. सर्वात जास्त गरज भासते ती वेधशाळेला. पावसाचे, वादळाचे अंदाज त्यावर अवलंबून असल्याने तेथील शास्त्रज्ञांचे लक्ष बॅरोमीटरवर सतत असतेच.

याची तांत्रिक रचना तशी साधी असते. हवाबंद चपट्या, विशिष्ट आकाराच्या डबीत निर्वात पोकळी तयार केली जाते. या पेटीच्या पृष्ठभागाला चिकटून लावलेल्या स्प्रिंगमुळे हवेचा दाब जसा कमी जास्त होईल, तसतसा काटा मागे पुढे होत असतो. हवेचा दाब वाढला तर निर्वात पेटीचा पृष्ठभाग अधिक दाबला जातो; कमी झाला तर तो मूळ आकार घेऊ लागतो.

हवेचा दाब मिलीबारमध्ये सांगितला जातो. समुद्रसपाटीला एक हजार मिलीबार इतका दाब सर्वसाधारणपणे असतो. या पद्धतीच्या बॅरोमीटरला ‘ऍनेरॉईड बॅरोमीटर’ असे नाव आहे.

जाता जाता हवेच्या दाबाबद्दल थोडेसे. जाडसर लोखंडी अवजड पेटी बंद करून जर आपण ती निर्वात करू शकलो तर तिला कुलूप घालण्याची गरज राहत नाही. तिच्यामध्ये हवा गेल्याशिवाय कोणालाही कितीही ताकद लावूनही ती पेटी उघडणे शक्य होणार नाही. हवेचा चारही बाजूंनी असलेला प्रचंड दाब ही काळजी घेत असतो.
संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३
साभार
*’सृष्टी विज्ञानगाथा’ या पुस्तकातून*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *