साहित्यातून प्रशासनात परिवर्तनाची नांदी – अल्का आत्राम

लोकदर्शन 👉 अविनाश पोईंकर


⭕पं.स पोंभूर्णा व ग्रा.पं. घाटकुळचे राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान

 

पोंभुर्णा :

साहित्य हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. शासन-प्रशासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी देखील यातून होवू शकते. पोंभुर्णा पंचायत समिती व ग्राम पंचायत घाटकुळ यांचे उत्तम उदाहरण आहे. साहित्यिकांना प्रोत्साहन दिले तर साहित्यातून प्रशासनात परिवर्तनाची नांदी नांदी येईल, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम यांनी केले. राज्यात पहिल्यांदाच शासकीय स्तरावर पंचायत समिती पोंभूर्णा व ग्रामपंचायत घाटकुळ तर्फे राज्य वाङ्मय पुरस्कार साहित्यिकांना प्रदान करण्यात आले. यावेळी त्या अध्यक्ष म्हणून बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपीलनाथ कलोडे, मुख्य लेखाधिकारी अशोक मातकर, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उपसभापती ज्योती बुरांडे, सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, तहसिलदार कलवाडे, साहित्यिका डॉ.पद्मरेखा धनकर, नरेशकुमार बोरीकर, अविनाश पोईनकर, घाटकुळचे सरपंच सुप्रीम गद्देकर उपस्थित होते.

चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख यांच्या ‘गर गर भोवरा’ व गडचिरोलीच्या कवयित्री मालती सेमले यांच्या ‘रानपाखरं’ या बालकवितासंग्रहांना राणी हिराई वाङ्मय पुरस्कार, मुलचे कवी प्रब्रम्हानंद मडावी यांच्या ‘आम्ही कोणत्या देशात राहतो ?’ व नाशीकचे कवी विवेक उगलमुगले यांच्या ‘आतला आवाज’ कवितासंग्रहांना क्रांतीसुर्य बिरसामुंडा वाङ्मय पुरस्कार, चंद्रपूरच्या लेखिका स्व.साजीदा शेख-मेश्राम यांच्या ‘तमोल्लंघन’ आत्मचरित्रास मरणोत्तर व अकोलाच्या लेखिका लता बहाकर-तळोकर यांच्या ‘बळीराणी’ कादंबरीस क्रांतीवीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके वाङ्मय पुरस्कार, रत्नागिरीचे डॉ.रमेश साळूंके यांच्या ‘हुंकार’ व गडचिरोलीचे प्रमोद बोरसरे यांच्या ‘पारवा’ कथासंग्रहास राजे हिरशहा आत्राम वाङ्मय पुरस्कार पंचायत समीती पोंभुर्णा तर्फे प्रदान करण्यात आले.

तर आदर्श ग्राम घाटकुळचे वाङ्मय पुरस्कार चंद्रपूरचे कवी डॉ.धनराज खानोरकर यांच्या ‘मास्तर मातीचे’ या कवितासंग्रहास क्रांतीसुर्य बिरसा मुंडा वाङ्मय पुरस्कार, जालनाचे लेखक डॉ.प्रभाकर शेळके यांच्या ‘व्यवस्थेचा बइल’ या कथासंग्रहास राजे हिरशहा आत्राम वाङ्मय पुरस्कार, नागपूरच्या लेखिका मिनल येवले यांच्या ‘एकांताचे कंगोरे’ या ललितलेख संग्रहास राणी दुर्गावती वाङ्मय पुरस्कार, मुंबईचे साहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या ‘मिसाईल मॅन’ या बालसाहित्यास राणी हिराई वाङ्मय पुरस्कार, अमरावतीचे लेखक प्रमोद चोबितकर यांच्या ‘भणंग’ या कादंबरीस क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके वाङ्मय पुरस्कार, इचलकरंजीचे लेखक अशोक जाधव यांच्या ‘भंगार’ या आत्मकथनास राजे खांडक्या बल्लाळशहा वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख दोन हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देवून साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. संचालन एकता बंडावार तर आभार सुधाकर कन्नाके यांनी माणले. यशस्वीतेसाठी सतीश वाढई, रश्मी पूरी, लक्ष्मण सोनुले, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

==============

 

राज्यातील साहित्यिकांच्या उत्कृष्ठ साहित्यकृतींना प्रोत्साहन मिळावे व वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, या हेतूने राज्यात पहिल्यांदाच पंचायत समीती व ग्रामपंचायतीच्या माध्यमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विशेषता पं.स पोंभुर्णाच्या भिंती जिल्ह्यातील कवींच्या प्रबोधनात्मक कवितांनी बोलक्या करण्यात आलेल्या आहेत. यावेळी वाचनालयाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

======

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *