फॅन्ड्री, सैराट आणि झुंड चित्रपटातून भितींपडलीकडच्या माणसांचे अस्वस्थ करणारे जग दिसले : आमदार प्रतिभाताई धानोरकर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


चंद्रपुर : नागराज मंजुळे यांचे फॅन्ड्री, सैराट चित्रपटातील कथानक जरी काल्पनिक असले तरी अशा अनेक सत्यकथा आपल्या आजूबाजूला आजही अधेमधे घडतांना दिसतात. खचितच आधुनिक काळामध्ये महिला मुलींचे बाबतीत समाजाची ही वागणूक म्हणजे अत्यंत शरमेची बाब आहे. फॅन्ड्री, सैराट आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या झुंड चित्रपटातून त्यांनी भितींपडलीकडच्या माणसांचे अस्वस्थ करणारे जग आपल्या सर्वांसमोर आणले, असे मत आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी आज (दि.८) ला विधानसभेत मांडले.
पुढे बोलतांना आ. प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, मा. जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आदर्श शिक्षिका फातिमा शेख, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राणी हिराई अशा अनेक थोर महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सोनेरी इतिहास लाभलेली ही भूमी आहे. महाराष्ट्राच्या या भूमीवर राज्याच्या विधानसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला ही संधी देणाऱ्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांचे महिला दिनाच्या औचित्य साधून मी आभार मानते. राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक माझ्या माता-भगिनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून व्यक्तिगत पातळीवरील अडचणींचा सामना करून आपल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राज्याच्या विकास आणि महिलांचे सक्षमीकरण यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत अशा सर्व माता-भगिनींना मी मानाचा मुजरा करते. राज्याचे प्रथम मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या आधुनिक व पुरोगामी महाराष्ट्राच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याकरिता मागील पंचावन्न वर्षापासून अहोरात्र झटणारे महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दूरदृष्टीमुळे देशात सर्वात प्रथम राज्यातील महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये50 टक्के वाटा मिळाला. त्यामुळे आजच्या या महिला दिनाच्या औचित्यावर आदरणीय श्री शरद चंद्रजी पवार साहेब यांचे सुद्धा माझ्या सर्व माता-भगीनीच्या तर्फे आभार मानते.
केवळ या राज्याच्याच नव्हे, देशाच्या नव्हे तर जगाच्या पाठीवर पाठीवर आज आमच्या माता भगिनी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून अर्थकारण, समाजकारण, राजकारण, तंत्रज्ञान, शेती संस्कृती, मनोरंजन, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रां आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. एवढेच नव्हे तर ज्या क्षेत्रामध्ये काम करणे महिलांसाठी अवघड समजले जात होते. ज्या क्षेत्रात त्यांना बंदी होती. ती महिलांसाठी उघडल्यानंतर तिथेही सर्वोच्च स्थान गाठले. नौदल. वायुदल पासून बस ते आटो चालक आणि अर्थकारणापासून ते शेती पर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये आमच्या माता भगिनींनी स्वतःला सिद्ध केलेले आहे.
समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सर्वत्र काम करणाऱ्या अशा माता-भगिनींना सुद्धा मी आज महिला दिनी सॅल्यूट करते. एकीकडे अशा अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. ज्याच्यामुळे महिलांना बरोबरीने संधी मिळत असल्याचे चित्र निर्माण होत आहेत. मात्र दुसरीकडे अशा काही गोष्टी सुद्धा घडत आहेत की, ज्यामुळे आम्ही पुढे जात आहोत की मागे येत आहोत, यावर चिंतन करण्याची आम्हाला गरज आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मा जिजाऊ ने शिवबा घडविला. ज्योतीबांच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीमाईनी स्त्री शिक्षणाचे बीज रोवले. महामानव आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीच्या प्रवासात त्यांच्या सावली म्हणून रमाई झिजल्या. शेकडो वर्षांपूर्वी अनेक थोर महिलांनी आपल्या राज्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे काम केले. अनेक अडचणी होत्या. शिक्षणामध्ये समाज मागासलेला असतानाही त्या त्या वेळी या थोर महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करता आले . त्याच्यापुढ्यात अनेकांनी अडचणी उभ्या केल्या. परंतु त्याचवेळी समाजातील अनेक चांगली माणस त्यांच्या पाठीशी उभी राहिली. ज्याकाळात समाज शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला होता. रूढीवादी होता. अशा वेळी या महिलांना संधी मिळाली. मात्र आज आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले असताना. स्वतः आधुनिक समाजाचे नागरिक म्हणत असताना महिलांच्या एखाद्या मुलीने स्वतःच्या मर्जीने आयुष्याचा जोडीदार निवडला म्हणून तिची हत्या केली जाते. समाजामध्ये दुर्लक्षित आणि उपेक्षित असलेल्यांच्या लोकांच्या भावनांची दखल घेऊन कटू वास्तव समाजापुढे ठेवण्याचे काम हल्ली एक प्रतिभावंत दिग्दर्शक नागराज मंजुळे करीत आहे फॅन्ड्री, सैराट आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या झुंड चित्रपटातून त्यांनी भितींपडलीकडच्या माणसांचे अस्वस्थ करणारे जग आपल्या समासमोर आणले. नागराज मंजुळे यांचे सैराट चित्रपटातील कथानक जरी काल्पनिक असले तरी अशा अनेक सत्यकथा आपल्या आजूबाजूला आजही अधेमधे घडतांना दिसतात. खचितच आधुनिक काळामध्ये महिला मुलींचे बाबतीत समाजाची ही वागणूक म्हणजे अत्यंत शरमेची बाब आहे.
मुलींवर सामूहिक बलात्कार केले जातात. बलात्कार झालेल्या मुलींनाच राज्यकर्ते दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात. न्याय मागण्यासाठी गेलेल्या अशा आमच्या माता भगिनींना प्रशासनामध्ये अनेक वेळा चांगली वागणूक मिळत नाही. अलीकडे महाराष्ट्रात संवैधानिक पदावर बसलेल्या काही व्यक्तींनी थेट राज्याच्या आद्यशिक्षीका बद्दलच टिंगल टवाळकी करणारे. अपमान करणारे बेजबाबदार वक्तव्य केले. आधुनिक काळात आपण शिक्षणात पुढारलेले असताना आमच्या डोक्यातील घाण कायम असल्याचे अनेकदा सिद्ध होते. पुरुषांच्या आत मध्ये सुप्तपणे दडलेला पुरुषत्वाचा अहंकार बघितल्यावर आम्ही शेकडो वर्षापूर्वी पुढारलेले होतो की आता पुढारलेले आहोत हा प्रश्न निर्माण होतो.
मी ज्या जिल्ह्यामध्ये राहते चंद्रपूर जिल्ह्याला त्याच्या लगत असलेल्या गडचिरोली, गोंदिया भंडारा जिल्ह्याला आदिवासी संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. या आदिवासी संस्कृतीतील गोटुल पद्धतीचा मी अभ्यास केला. वाचन केले. गोटुल पद्धतीमध्ये हजारो वर्षापासून मुलींना, महिलांना व्यक्तिस्वातंत्र्य होते. जो मान सन्मान होता तो आमच्या आजच्या आधुनिक काळातील पुरुष अपवाद वगळता आपल्या आसपासच्या महिलांना मुलींना देतांना दिसत नाहीत. ही कसली आधुनिकता आहे. कसले पुढारले पण आहे. हे कुठले शिक्षण आहे. आजही आपण कुटुंबात महिला आणि आपल्या कुटुंबातील महिलांना आपण दुय्यम वागणूक देतो. एक व्यक्ती म्हणून त्यांना स्वातंत्र्य द्यायला तयार नाही. सामाजिक पातळीवर अशा अनेक उणिवा अजूनही शिल्लक आहेत. किंबहुना आधुनिक काळातील समाजामध्ये परंपरेच्या नावाखाली या उणिवा सबळ करण्याचा प्रयत्न एका वर्गाकडून सुरू आहे. एक व्यक्ती म्हणून आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाने, व्यवस्थेने, धोरणकर्त्यांनी राज्यकर्त्यांनी स्वतः मध्ये निर्माण केला. हा दृष्टीकोन ते तयार करु शकत नसेल तर सर्व माता-भगिनींनी एकत्र येत त्यासाठी लढावे लागेल आणि मा. जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नातील देश घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. या राज्यातील, देशातील, जगातील ज्या ज्या लोकांनी थोर पुरुषांनी महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना सर्व संधी मध्ये समान वाटा देण्यासाठी प्रयत्न केले, असतील अशा सर्व थोर व्यक्तींना मी पुन्हा एकदा अभिवादन करते. सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *