शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा वाढविणार – वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांचे आश्‍वासन

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*🔶वसतीगृहाची क्षमता वाढवावी व रिक्‍त पदे तातडीने भरावी – आ. सुधीर मुनगंटीवार*

 

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्‍यासाठी संबंधित यंत्रणांना त्‍वरीत निर्देश देण्‍यात येईल तसेच याठिकाणी पायाभूत सुविधा वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी दिले.

दिनांक ४ ऑगस्‍ट रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांची भेट घेतली व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर बाबत विस्‍तृत चर्चा केली. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील वसतीगृहाची क्षमता १०० हून १५० इतकी वाढविण्‍याबाबत तसेच साधन सामु्ग्री सुध्‍दा वाढविण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्‍यान केली. वसतीगृह क्षमता व साहित्‍य सामुग्री त्‍वरीत वाढविण्‍याचे आश्‍वासन यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री यांनी दिले. याठिकाणी वर्ग १ ते वर्ग ४ च्‍या संवर्गातील महत्‍वपूर्ण पदे मोठया प्रमाणावर रिक्‍त आहेत. सदर रिक्‍त पदे भरण्‍याबाबत आपण सातत्‍याने विधानसभेच्‍या माध्‍यमातुन शासनाचे लक्ष वेधले. उपमुख्‍यमंत्र्यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत रिक्‍त पदे भरण्‍याचे निर्देशही दिले होते. मात्र सदर रिक्‍त पदे अद्याप भरण्‍यात आलेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा फटका सर्वसामान्‍य रूग्‍णांना तसेच वैद्यकिय शिक्षणाला सुध्‍दा बसत आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर हे चंद्रपूरकरांचे स्‍वप्‍न आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देत त्‍वरेने कार्यवाही करण्‍याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षणमंत्री यांना केली.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *