दरड कोसळून दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्याकडून 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचार

By : Mohan Bharti

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून अनेक मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे मृत्यु पावलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपये सानुग्रह मदत तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

रायगड, साताऱ्यानंतर सिंधुदुर्गातही दरड कोसळली, राज्यातील मृतांचा आकडा 72 वर
महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला.

पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 72 वर गेला आहे.

कुठे किती मृत्यू?
चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू
तळीये, महाड – 38 मृतदेह हाती
आंबेघर, सातारा – 12 जणांचा मृत्यू
पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू

महाडमध्ये काय घडलं?
गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे दाणादाण उडाली आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 38 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिक करत आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *