

१५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातुन पथदिव्याचे विज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची विज देयके अदा करण्याबाबत शासन स्तरावरून मान्यता देण्यात आलेली असतांना राज्यातील अनेक ग्राम पंचायतींचा पथदिवे व पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला ही बाब ग्राम पंचायतींवर अन्याय करणारी असून तो विद्युत पुरवठा त्वरीत पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातुन केली आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या २३ जून २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार पथदिव्यांचे आणि पाणी पुरवठा योजनांची विज देयके अदा करण्याबाबत शासनस्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. त्या परिपत्रकानुसार ग्राम पंचायतींकडून थकित विद्युत देयके अदा करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. असे असताना राज्यातील अनेक ग्राम पंचायतीचे पथदिवे आणि पाणी पुरवठा योजनेचा विद्युत प्रवाह महावितरणने खंडीत केला आहे. यासंदर्भातील तक्रार विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या अनेक ग्राम पंचायतींनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केल्यानंतर तो विद्युत पुरवठा पूर्ववत करून ग्राम पंचायतींना दिलासा द्यावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. यासोबतच आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हयातील ग्राम पंचायतींचा पथदिवे व पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये असे चंद्रपूर महावितरणचे अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता फरास खानवाले व श्री. तेलंग यांना निर्देश दिले आहेत.