अतिदुर्गम कोठीच्या दमदार सरपंच

0
173

By : Avinash Poinkar
या आहेत अतिदुर्गम कोठी ग्रा.पं.च्या सरपंच कु.भाग्यश्री लेखामी. केवळ २३ वर्षाच्या. पुरुषांनाही लाजवेल असं तीचं डेरिंगबाज कर्तुत्व. भामरागडमधील शेवटच्या टोकावर असलेल्या गावात आज या सरपंच युवतीने ट्रीपलसीट टुव्हीलरने फिरवले. कोठीवरुन पुढे तोयनार, तुमरकोडी, मुरुमभुशी, मरकनार गावात जायला पक्के रस्ते नाही. खडदड पायवाटेचे रस्ते आणि अधेमध्ये पाणी भरलेले नाले टुव्हीलरने हिने सहज पार केले. हा परिसर तसा प्रचंड नक्षलग्रस्त. भाग्यश्रीने सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर बराच सकारात्मक परिणाम या गावात व्हायला सुरुवात झाली. काही प्रमाणात शासनाच्या योजनांचा स्पर्शही भाग्यश्रीमुळे येथील अतिदुर्गम गावांना झाला. इकडे ब-याच गावांत स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी होत असतांनाही गावांना जोडणारे रस्ते आणि वीज पोहोचलेली नाही. साधा नेटवर्कचाही थांगपत्ता नाही. आदीम माडीया जमातीचे पारंपारिक जगणे मात्र अतिशय नैसर्गिक, समृद्ध आणि निर्मळ आहे. खरे तर येथील रस्त्यात मी आणि चिन्नापेक्षाही भाग्यश्रीने जबरदस्त गाडी चालवली. ती नेहमीच इकडील गावात एकटीच अरण्यकन्येसारखी बिंधास्त टुव्हीलरने फिरते. ग्रामीण विकासाबाबत धडपडते. तीच्या स्वभावातील मोकळेपणा आणि काम करण्याविषयीची भुमीका अत्यंत प्रांजळ आहे. आम्ही रस्त्याने जातांना भेटणा-या प्रत्येकांशी ती बोलत होती. घनदाट जंगलात तिच्यात भीती नावाची कुठलीच गोष्ट दिसत नव्हती. जंगलातील सोनपाखरं, किडे पकडत ती हसत-खेळत संवाद साधत होती‌. जनावरे, विषारी सापांशीही ती सहज खेळते, हे तिचे गॅलरीतील फोटो सांगत होते. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील मुरुमभुषी गावात आम्ही पोहोचलो. काही मंडळी मोठ्या वृक्षापासून कु-हाडीने डोंगा बनवत होती. भाग्यश्रीने चक्क कु-हाड त्यांच्याकडून घेवून लाकुड फोडले. आम्ही अवाकपणे पाहत होतो. तीचे काही महाविद्यालयीन शिक्षण आमच्या परिसरातील राजूरा येथे झाले आहे. त्यामुळे अधिकच मोकळेपणा जाणवला. तिच्यात असलेली कामाची तळमळ तिच्या प्रगल्भ विचाराची साक्ष देत होती. मी, चिन्ना आणि भाग्यश्री तिघांनीही आज सकाळपासून जेवन केलेले नव्हते. मात्र भटकंतीत कसा वेळ गेला, ते कळलंच नाही. सैराटमध्ये आर्ची बुलेट चालवतांना आपण पाहीली. मात्र ही सरपंच भाग्यश्री डोंगर द-यातील खडकाळ पायवाटेतून, नदी-नाल्यातून ट्रिपलसीट गाडी दणक्यात चालवत होती. आणि आम्ही मागे बसलेलो होतो. आजचा अनुभव भन्नाटच !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here