लोकदर्शन 👉मोहन भारती
राजुरा : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त राजुरा तहसील कार्यालय प्रांगणात आज शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा ध्वजारोहण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला असून उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करत, हा दिवस आपल्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा प्रतीक असल्याचे सांगण्यात आले. आपल्या पूर्वजांच्या त्याग, शौर्य आणि परिश्रमांनी ही माती पावन झाल्याचे अधोरेखित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कष्टांनी समृद्ध झालेली, संतांच्या विचारांनी प्रेरित आणि वीरांच्या बलिदानाने पवित्र झालेली ही भूमी प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करून देते, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमात समाजातील एकात्मता वाढवण्याचे, भेदभाव दूर करून विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्याचे तसेच प्रत्येकाच्या हक्काचा सन्मान राखत समतेच्या तत्त्वांचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि स्वाभिमान जपत प्रगतीचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





