लोकदर्शन कल्याण (👉 गुरुनाथ तिरपणकर) :
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व विकासात्मक कार्याबद्दल राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कल्याण येथील के. एम. अग्रवाल कॉलेजच्या एसी ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या ‘भारत सन्मान पुरस्कार’ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास घेतलेल्या सौ. नेटके यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन (अँटी पायरेसी सेल), मुंबई या संस्थेने घेत त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविले.
या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ऑफिसर इतिशा चौहान तसेच अभिनेत्री व ए-स्टार टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संस्थापिका अश्विनी अमित चुरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सरपंच म्हणून यशस्वी कारकीर्द घडवलेल्या सौ. वैष्णवी नेटके यांना यापूर्वीही विविध सरकारी, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यास त्यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती होती.
आबलोली परिसरात सरपंच व सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळख निर्माण केलेल्या सौ. नेटके यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.





