Home
Home चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक ; चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आक्रमक ; चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार

लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती

चंद्रपूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Indian National Congress पक्षाने शहरात राजकीय हालचालींना वेग दिला असून, चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याच अनुषंगाने शहरातील यंग रेस्टॉरंट येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार Subhashbhau Dhote यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शहराध्यक्ष संतोष लहामगे यांनी परिषदेचे नेतृत्व केले. यावेळी सुभाषभाऊ धोटे यांनी काँग्रेस व मित्र पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत, शहराच्या विकासासाठी ठोस आराखडा असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी उद्या दिनांक ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार भव्य राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्षांनी केले.

पत्रकार परिषदेत महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शहर सौंदर्यीकरण, शिक्षण, आरोग्य सुविधा, नागरी मूलभूत सोयी-सुविधा तसेच जनहिताच्या प्रश्नांवर काँग्रेसची सविस्तर भूमिका मांडण्यात आली. आगामी काळात शहरवासीयांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगळे, सुभाषसिंह गौर, रामू तिवारी, विनोद दत्तयात्रे, अंबिका प्रसाद दवे, अनिल नरूले, संगीता अमृतकर, शपाक शेख, प्रमोद बोरीकर, करुणा चालखुरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माध्यमांशी संवाद साधताना नेत्यांनी शहरातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत, महापालिका निवडणुकीत काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here