लोकदर्शन 👉मोहन भारती
चंद्रपूर दिनांक 10 ऑक्टोबर :
मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक समस्येला अखेर तोडगा निघाला आहे. राज्याचे माजी मंत्री व चंद्रपूरचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, ३१ कोटी रुपयांचा निधी रेल्वे उड्डाणपुलासाठी मंजूर झाला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी अधिकृत पत्राद्वारे ही मंजुरी दिल्याचे कळवले आहे. मुल–चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-९३०) वरील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक GCF १२३ येथे हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
या ठिकाणी अवजड वाहने आणि मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आमदार मुनगंटीवार यांनी गांभीर्याने लक्ष देत रेल्वे प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून उड्डाणपुलाच्या मंजुरीने नागरिकांचा दीर्घकालीन प्रश्न सुटणार आहे.
“जनतेला दिलेला शब्द पूर्ण” — आ. मुनगंटीवार
आपल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आमदार मुनगंटीवार म्हणाले,
> “विधानसभा निवडणुकीदरम्यान मी मुल शहराच्या जनतेला दिलेला शब्द आज पूर्ण करत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. हा उड्डाणपूल केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणार नाही, तर मुल शहर आणि परिसराच्या सौंदर्यात भर घालेल. शेती, व्यापार आणि उद्योग क्षेत्रालाही नवसंजीवनी मिळेल.”
विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल
मुल शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुकर होईल, अपघातांची शक्यता कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाचा लाभ मिळेल.





