लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदूर, दि. 10 : येथील मे. मेताशा इंडेन गॅस एजन्सीकडून गॅस वितरणामध्ये कथित काळाबाजार, अवैध साठवणूक व ग्राहकांची पिळवणूक होत असल्याची माहिती नागरिक श्री. आशिष रोखडे यांनी नगरसेविका सौ. शितल धोटे यांना दिली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत सौ. धोटे यांनी संबंधित गॅस एजन्सीला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी आमदार देवरावदादा भोंगळे यांच्यासह तहसीलदार, कोरपना आणि जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे दूरध्वनीद्वारे तक्रार नोंदवली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार संयुक्त निरीक्षण पथकाने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. या पाहणीत एजन्सीकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले.
या अहवालाच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर श्री. आर. आर. बहादूरकर यांनी दि. 4 जून 2026 रोजी तहसीलदार, कोरपना यांना जीवनावश्यक वस्तू कायदा, 1955 अंतर्गत संबंधित गॅस एजन्सीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मेताशा गॅस एजन्सीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका सामान्य नागरिकाच्या तक्रारीचा सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात नगरसेविका सौ. शितल धोटे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यामुळे या कारवाईचे श्रेय त्यांच्या तत्परतेला व पाठपुराव्याला दिले जात असून परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
दरम्यान, संबंधित गॅस एजन्सीवर पुढे कोणती प्रशासकीय कारवाई होते आणि ग्राहकांना कोणती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. :::





