लोकदर्शन चंद्रपूर 👉मोहन भारती
चंद्रपूर, दि. 7जून ___ : जिल्ह्यातील महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या, प्रलंबित प्रकरणे आणि धोरणात्मक अडचणी शासनाच्या वरिष्ठ स्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार Sudhir Mungantiwar यांनी केले आहे. त्यांच्या पुढाकारातून महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव Vikas Kharge यांच्या उपस्थितीत १९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत महसूल विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात येणार असून, जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या महसूलविषयक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. जमीन नोंदी, फेरफार, वारसा नोंद, प्रलंबित प्रकरणे तसेच महसूल विभागाच्या धोरणात्मक बाबींशी संबंधित अडचणी आणि सूचना यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपल्या समस्या, सूचना आणि विधायक मते स्वीय सहायक श्री. संजय राईंचवार यांच्या ९५५२७९९६०८ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावीत, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. प्राप्त होणाऱ्या सूचना व महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश १९ जूनच्या बैठकीत करण्यात येणार असून त्यावर आवश्यक ती कार्यवाही आणि प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे.
महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांच्या निराकरणासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने नागरिकांनी वेळेत आपल्या समस्या व सूचना पाठवून या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे.





