लोकदर्शन.👉मोहन भारती
महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू, अनुभवी आणि ठाम विचारांचे नेतृत्व अशी ओळख असलेले कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय व सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मतभेद असले तरी विचारांचा आदर राखणे, आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे हीच त्यांची खरी ओळख होती, अशा शब्दांत माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
अजितदादांचा स्वभाव नेहमीच स्पष्ट, निर्भीड आणि ठाम वक्तेपणाचा राहिला. जे योग्य वाटेल ते कोणताही आडपडदा न ठेवता मांडण्याची त्यांची भूमिका होती. सत्ता, विरोध किंवा राजकीय समीकरणांपेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी त्यांची भूमिका अनेकदा राजकीय चर्चांना दिशा देणारी ठरली. मतभिन्नता असूनही परस्पर सन्मान जपण्याची त्यांची शैली आजच्या राजकारणात दुर्मिळ म्हणावी अशी होती.
विधानसभा असो वा सार्वजनिक व्यासपीठ, त्यांचे बोलणे नेहमी मुद्देसूद, ठाम आणि आशयघन असे. राजकारण म्हणजे केवळ पदे नव्हे, तर मूल्यांची जपणूक असते, ही जाणीव त्यांच्या वागण्यातून कायम दिसून येत होती. त्यामुळेच सहकारी असोत वा विरोधक, सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. विकासासाठी प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची वृत्ती होती. ‘दातृत्व’ या शब्दातील ‘दा’ हेच ‘दादा’ या विशेषणात सामावलेले होते, असेही मुनगंटीवार म्हणाले.
व्यक्तिगत आयुष्यात अजितदादा हे अत्यंत आपुलकीचे, संवेदनशील आणि विश्वासू मित्र होते. राजकीय मतभेद कधीही वैयक्तिक नात्यांच्या आड येऊ नयेत, हा त्यांचा ठाम आग्रह असे. अनेकदा त्यांच्या स्पष्ट आणि प्रामाणिक शब्दांतून मार्गदर्शन मिळाले; आज तेच शब्द आठवणींतून अंतःकरणाला भिडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आज अजितदादा आपल्यात नाहीत, ही जाणीव मन सुन्न करणारी आहे. आबालवृद्धांसाठी नेहमी तत्पर असणारे, सकाळी सहा वाजल्यापासून जनसेवेसाठी उभे राहणारे हे लोकनेते आता आपल्यात नाहीत, ही कल्पनाच असह्य आहे, असे त्यांनी नमूद केले.
त्यांचा आवाज आज शांत झाला असला, तरी त्यांनी जपलेली मूल्ये, त्यांची राजकीय भूमिका आणि माणुसकीचा वारसा कायम स्मरणात राहील. कै. अजितदादा पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असून त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व असंख्य समर्थकांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.





