बफर क्षेत्रातील शाळेकरिता ‘चला माझ्या ताडोबाला’ निसर्ग शिक्षण उपक्रम

by : Devanand Sakharkar

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरीता हा उत्तम असा अधिवास आहे. सन 2021-22 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये 87 वाघाची नोंद झाली आहे.

सन 1955 रोजी या वनाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला. सन 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले आणि सन 1995 ला वाघांचा अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी या वनाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या वनाच्या गाभा क्षेत्राचे काटेकोरपणे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने, सन 2010-11 मध्ये बफर क्षेत्र घोषित करण्यात आले. या बफर क्षेत्रात 90 पेक्षा अधिक गावे असून या ठिकाणच्या वन क्षेत्रातसुद्धा वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. म्हणून ही गावे व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात्मक उपक्रमामध्ये जोडण्यात आली. साधारणत: 1 लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत विविध, सर्व स्तरावर विकासात्मक कामे करण्यात येऊ लागली आणि यातील स्थानिक विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासंदर्भात जनजागृती व्हावी या करीता “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरवात झाली.

याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर वन क्षेत्रातसुद्धा वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात 2022-23 च्या व्याघ्र गणनेनुसार 414 वाघांची नोंद झाली. यापैकी 200 पेक्षा अधिक वाघ केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून चंद्रपूरची ओळख वाघाचा जिल्हा अशी आहे.

अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या व्याघ्रभूमीचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे, स्थानिकांना वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरीक म्हणून वनसंवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने, निसर्ग संवर्धनातून वनसंवर्धन हा उपक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याकरीता सन 2015-16 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे हा होय.

सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 135 शाळेतील 5 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील 27 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष. यावर्षी सन 2023-24 मध्ये सुद्धा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून या उपक्रमाची सुरवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून होत आहे. यातील भगवानपूर हे गाव सन 2007 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झालेले गाव आहे. हे गाव कोळसा व बोटेझरी या दोन गावांना एकत्रित करून या गावाचे नाव भगवानपूर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वर्षी प्रथम प्राधान्य या गावाला देण्यात आले आहे.

चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण 121 शाळेतील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ या माध्यमातून करण्यात येईल, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *