बालविवाह आणि पोक्सो कायदा’ या विषयावर जनजागृतीपर अभियान

by : Priyanka Punvatkar

चंद्रपूर : केंद्रीय विद्यालय आयुध निर्माणी,भद्रावती येथे जिल्हा चाइल्ड हेल्पलाईन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “बालविवाह आणि पोक्सो कायदा” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्या स्वाती विश्वकर्मा, शिक्षिका ममता बावनकर, चाईल्ड हेल्पलाइनचे समन्वयक अभिषेक मोहूर्ले, अंकुश कुराडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा अर्थात लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण अधिनियम-2012 मधील विविध तरतुदी उदाहरणासह समजावून सांगितल्या तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

समन्वयक अभिषेक मोहूर्ले यांनी चाईल्ड हेल्पलाइन 1098 बाबत माहिती दिली. 0 ते 18 वर्षे वयोगटातील समस्याग्रस्त तसेच काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके आढळल्यास, हरवलेले बालक, भीक मागणारे, निवाऱ्याच्या शोधात असणारे, लैंगिक शोषणाला बळी पडणारे, एखादे बालमजूरी किंवा बालविवाहाला बळी पडणारे बालक, शोषणाला बळी पडणारी बालके आढळल्यास 1098 या टोल-फ्री क्रमांकावर फोन करून मदत करावी तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना चाइल्ड हेल्पलाईन कशाप्रकारे मदत करीत असते याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात ‘बालविवाह’ आणि ‘पोक्सो कायदा’ या विषयावर जनजागृतीपर अभियान राबविण्यात येत आहे. तसेच या अभियानाद्वारे चाइल्ड हेल्पलाइन 1098 या टोल-फ्री क्रमांकाची देखील जनजागृती करण्यात येत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *