कोरोनाच्‍या तिस-या लाटेसाठी योग्‍य नियोजन करा – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*जिल्‍हाधिकारी, संबंधित सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींबरोबर आभासी बैठक*

देशात कोरोनाचे संकट सर्वप्रथम जेव्‍हा आले तेव्‍हा आपल्‍यासाठी ते अतिशय नवीन होते. त्‍यावर कशीबशी मात करत आपण सावरण्‍याचा प्रयत्‍न करीत असतानाच दुसरी लाट आली. व या लाटेने आपले प्रचंड नुकसान झाले. आता तज्ञांनुसार पुन्‍हा तिसरी लाट येणे अपेक्षित आहे. त्‍याकरिता असणा-या व्‍यवस्‍थांची माहिती घेण्‍यासाठी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज जिल्‍हाधिकारी चंद्रपूर, संबंधित सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींबरोबर आभासी बैठक घेतली. या बैठकीला जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, अधिष्‍ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय, जि.प. अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, सर्व सभापती, चंद्रपूरच्‍या महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, बल्‍लारपूर नगर परिषद अध्‍यक्ष हरीश शर्मा, मुल नगर परिषद अध्‍यक्षा रत्‍नमाला भोयर, जिल्‍हा परिषद सदस्‍य, मनपा सदस्‍य व अन्‍य अधिकारी उपस्थित होते.

मा. जिल्‍हाधिका-यांनी तिस-या लाटेमध्‍ये एकंदर रूग्‍णांची संख्‍या २० हजारापर्यंत जाण्‍याची शक्‍यता असल्‍याची माहिती दिली. त्‍यानुसार ९ हजार रूग्‍ण कोविड केअर सेंटर मध्‍ये राहण्‍याचा अंदाज आहे. २५०० ऑक्‍सीजन बेड, ८५० आयसीयू बेड तर ४२५ व्‍हेंटीलेटर बेड लागतील असा अंदाज जिल्‍हाधिका-यांनी व्‍यक्‍त केला. सध्‍या ४००० जण कोविड केअर सेंटरमध्‍ये राहू शकतात. १३०० ऑक्‍सीजन बेड आहेत. व्‍हेंटीलेटर बेड १०५ असून त्‍यातील ९४ व्‍हेंटीलेटर कार्यरत आहेत. जिल्‍हयातून ५० व्‍हेंटीलेटर आयुक्‍त व ८० व्‍हेंटीलेटर मेडीकल एज्‍युकेशन विभाग यांच्‍याकडून मागविण्‍याचा प्रस्‍ताव पाठविला आहे. यापैकी २४ व्‍हेंटीलेटर आलेले असून अजून सुरू झालेले नाहीत. उर्वरित व्‍हेंटीलेटरसाठी अधिष्‍ठता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय यांनी प्रस्‍ताव तयार करून पाठवावा व पाठपुरावा करावा असे आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले.

शासनाने सुचविल्‍याप्रमाणे लिक्‍वीड ऑक्‍सीजन ५७ मेट्रीक टन हवे जे ५६.३४ मेट्रीक टन उपलब्‍ध आहे. पीएसए ऑक्‍सीजन १६ मेट्रीक टन हवे जे १५ मेट्रीक टन उपलब्‍ध आहे व सिलेंडर ऑक्‍सीजन ८ मेट्रीक टन हवे जे १० मेट्रीक टन उपलब्‍ध आहे. जम्‍बो केअर सेंटरमध्‍ये २०० बेड्स, सोमय्या पॉलिटेक्‍नीकमध्‍ये २०० बेड्स तर ग्रामीण रूग्‍णालयांमध्‍ये ४७५ बेड्स वाढीव मिळतील, असे जिल्‍हाधिका-यांनी सांगीतले.

म्‍युकरमायकोसिसचे जिल्‍हयात आतापर्यंत १०७ रूग्‍ण आढळले. यापैकी ६६ रूग्‍ण बरे होवून घरी गेले तर ३६ रूग्‍ण अद्याप उपचार घेत आहेत. ०५ रूग्‍णांचा यात बळी गेल्‍याचेही जिल्‍हाधिका-यांनी सांगीतले. मुल येथे ५० ऑक्‍सीजन बेडची पाईपलाईन अंतिम टप्‍प्‍यात असल्‍याचे सांगीतले. बेड मॉनिटरींग सिस्‍टीम आता राज्‍य सरकार तयार करून जिल्‍हयांना पाठविणार आहे ज्‍यात सर्व व्‍यवस्‍थांविषयी माहिती असेल, असेही त्‍यांनी सांगीतले. जिल्‍हयात २४ तास चालणारे कॉल सेंटर्स आहेत. जिल्‍हयात औषधांचा स्‍टॉक मुबलक असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. येत्‍या १५ ऑगस्‍टपर्यंत तिस-या लाटेसाठी तयारी जवळपास पूर्ण होईल असा अंदाज मा. जिल्‍हाधिका-यांनी व्‍यक्‍त केला. आ. मुनगंटीवार यांनी ही तयारी आणखी लवकर व्‍हावी यासाठी आग्रह धरला.

आ. मुनगंटीवार यांनी महात्‍मा ज्‍योतीबा फुले योजनेचा लाभ जिल्‍हयात किती रूग्‍णांना झाला याची माहिती लवकर देण्‍याचे जिल्‍हाधिका-यांना सांगीतले. या योजनेत जास्‍तीत जास्‍त इस्पितळे कसे येतील यासाठी आयएमए बरोबर बैठक घेण्‍याचे जिल्‍हाधिका-यांना सांगीतले. पदभरती संदर्भात सर्व संबंधित अधिका-यांबरोबर बैठक घेवून लवकरात लवकर ही पदे भरावी असे आ. मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. चंद्रपूर जिल्‍हयात कंत्राटी वैद्यकिय अधिकारी भरण्‍यास परवानगी नसल्‍याचे जिल्‍हा आरोग्‍य अधिका-यांनी सांगीतले. जिल्‍हयात एकूण किती रूग्‍णवाहीका आहेत व किती नविन हव्‍या आहेत याची माहिती जिल्‍हाधिका-यांनी द्यावी, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. कोविड रूग्‍णांसाठी केली जाणारी एचआर सिटी चाचणी मागील चार महिन्‍यात किती लोकांची झाली याची माहिती मा. जिल्‍हाधिका-यांनी द्यावी. येणा-या काळात सिटी स्‍कॅन मशीनची संख्‍या वाढवावी लागेल, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले.

आयसोलेशन सेंटर्ससाठी जिल्‍हयातील ५८ शाळांचे नूतनीकरण करावे. १५ पैकी ११ तालुक्‍यांमध्‍ये मानव विकास निधी तर उरलेल्‍या तालुक्‍यात खनिज विकास निधीतुन नुतनीकरणासाठी निधी उपलब्‍ध करावा, असेही त्‍यांनी सांगीतले. आ. मुनगंटीवार यांनी कोविड संदर्भात एक डिजीटल पुस्तिका तयार करण्‍याचे जिल्‍हाधिका-यांना सांगीतले. ज्‍यामध्‍ये आजाराची खबरदारी, कॉल सेंटर्सची माहिती, संबंधित अधिकारी व कर्मचा-यांचे मोबाईल नंबर व अन्‍य महत्‍वाची माहिती असावी. आरटीपीसीआर टेस्‍ट एका दिवशी जास्‍तीत जास्‍त २००० पर्यंत केल्‍या, असे जिल्‍हाधिका-यांनी सांगीतले. यापुढे टेस्‍टचे रिझल्‍ट २४ तासात रूग्‍णांपर्यंत पोहचावे असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

जिल्‍हयात ६५ प्राथमिक आरोग्‍य केंद्र आहेत. त्‍यांच्‍या स्थितीचा अभ्‍यास करून त्‍यावर एक श्‍वेतपत्रीका पुढील १५ दिवसात जि.प. अध्‍यक्ष तथा जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी तयार करावा, असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. जिल्‍हयात व्‍हेक्‍सीनेशनसाठी २६० सेंटर्स असून सध्‍या एका दिवशी २५ हजार लोकांचे व्‍हेक्‍सीनेशन आपण करू शकतो असेही जिल्‍हाधिका-यांनी सांगीतले. तिस-या लाटेचा विचार करून सर्व व्‍यवस्‍था अद्यावत करण्‍याच्‍या सुचना देवून आ. मुनगंटीवार यांनी बैठकीचा समारोप केला.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *