शिक्षणयात्रा’तून विदर्भात उच्चशिक्षणाचा जागर !

by : Avinash Poinkar

चंद्रपूर :

आदिवासीबहुल व मागास समजला जाणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात देश-विदेशातील नामांकित विद्यापिठे, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती तसेच फेलोशीप याबाबत पुरेसी माहीती नाही. दहावी-बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी पुरेसे मार्गदर्शन मिळावे, या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातून विदर्भात उच्चशिक्षणाचा जागर करणारी शिक्षणयात्रा सुरु केली आहे. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर, जागृत बहुद्देशीय संस्था व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ब्रिटीश सरकारची जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त तरुण वकिल, नुकतेच ब्रिटीश सरकारने चेव्हनिंग गोल्ड पुरस्काराने सन्मानित केलेले ॲड.दीपक चटप यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या शिक्षणयात्रेची सुरुवात नुकतीच संविधान दिनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या उपस्थितीतीत करण्यात आली. यावेळी समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, महिला व बालविकास अधिकारी संग्राम शिंदे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या शिक्षण यात्रेचे समन्वयक म्हणून मुख्यमंत्री फेलो राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर हे भूमिका पार पाडत आहे.

लंडनमध्ये कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देश-विदेशात अनेक संधी दीपकला उपलब्ध झाल्या आहेत. या संधीतून वैयक्तिक आर्थिक संपन्नता येईल मात्र शिक्षणाचा उपयोग तळागाळातील घटकांना व्हावा म्हणून त्यांनी विधी, शिक्षण व धोरणनिर्मिती क्षेत्रात रचनात्मक काम करण्याचे ठरविले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करण्याचा संकल्प या यात्रेतून असल्याचे मत समन्वयक अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले. २६ नोव्हेंबर २०२३ संविधान दिन ते २६ जानेवारी २०२४ गणतंत्र दिन या दोन महिन्याच्या काळात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळसह विदर्भातील १२ वी पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचून देश-विदेशात पदव्युत्तर शिक्षणातील संधी, शिष्यवृत्ती, फेलोशीप बाबतची माहिती आणि आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘शिक्षण यात्रा : एज्युकेशन टू इम्पावरमेंट’ या कृतीयुक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबाबत देश विदेशात उपलब्ध शिष्यवृत्ती, कोर्सेस, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक क्षमता व कौशल्ये आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या शिक्षणयात्रेतून येणाऱ्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी सज्ज होतील व शैक्षणिक चळवळ तयार होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी व्यक्त केले. सुमती फाऊंडेशन, जागृत संस्था यांचे विशेष सहकार्य या यात्रेला लाभले आहे. त्यासोबतच पाथ फाऊंडेशन, पाॅलीलाॅ नेटवर्क फाऊंडेशन, सत्यशोधक कलेक्टीव, संकल्प फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या विशेष सहकार्याने शिक्षणयात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात उच्चशिक्षणाची चळवळ चंद्रपूर-गडचिरोलीसह विदर्भातील विद्यार्थी-युवकात निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

•••

मी लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेवून नुकताच भारतात परतलो आहे. विदर्भातील विद्यार्थी क्षमतावान आहे. मात्र माहितीचा अभाव, पुरेसे मार्गदर्शन न मिळणे, आर्थिक अडचणी आणि शिक्षणाबाबतची निरुत्साहता विद्यार्थ्यांत वाढताना दिसते. शिक्षण संधीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी हा कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेणे मला महत्वाचे वाटले.

– ॲड.दीपक चटप
आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर, यु.के

 

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *