प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते आज 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन; राज्यातील 44 स्थानकांचा समावेश*

लोकदर्शन दिल्ली 👉 शिवाजी सेलोकर
———————————————
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे (Redevelopment projects of Railway Stations) भूमीपूजन करणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील एकूण 123 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी 44 स्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी आज होणार आहे.

देशभरातील 1309 स्थानकांच्या पुनर्विकासाकरता अमृत भारत स्थानक योजना (Amrit Bharat Station Scheme) ही पंतप्रधानांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा भाग म्हणून पंतप्रधान 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. 24,470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. शहराच्या दोन्ही बाजूंपासून योग्य अंतरावरील ‘सिटी सेंटर्स’ म्हणून या स्थानकांचा विकास करण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. शहराच्या एकंदर नागरी विकासाच्या समग्र दृष्टीकोनाच्या आधारे या रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत एकात्मिकतेवर भर दिला जात आहे.

रेल्वे स्थानक पुनर्विकासात काय होणार?
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील 508 रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्ययावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे. विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.

महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश
महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश या योजनेतील पहिल्या टप्प्यात आहे. राज्यातील विविध भागांमध्ये केंद्रीय मंत्री, खासदार, राज्याचे मंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नागपूर – मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या 15 स्टेशन चा समावेश असून यासाठी 372 कोटी खर्च करण्यात येणार आहे. नागपूरातील गोधनी रेल्वे स्थानकात होणाऱ्या या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे.

वाशिम – अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत वाशिम येथील रेल्वे स्टेशनचा विकास व सुशोभीकरण कार्यक्रमाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी वाशिम रेल्वे स्थानकात जिल्ह्यातील अनेक नेते हजर राहणार आहेत.

चंद्रपूर – अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत बल्लारपूर रेल्वे स्टेशनच्या विकास व सुशोभीकरण कार्यक्रमाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी बल्लारपूर रेल्वे स्थानकात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हजर राहणार आहेत.

बुलढाणा – अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव व मलकापूर येथील रेल्वे स्टेशनचा विकास व सुशोभीकरण कार्यक्रमाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी शेगाव रेल्वे स्थानकात खासदार प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत.

गोंदिया – गोंदिया रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 येथे “अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 30 कोटींहून अधिक खर्चाच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या बांधकाम आणि सुशोभीकरणाचे भूमीपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.

हिंगोली – भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत हिंगोली रेल्वे स्टेशनचाही पुनर्विकास होणार आहे. यावेळी खासदार हेमंत पाटील उपस्थित राहणार आहेत

जालना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते (ऑनलाइन)अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जालना रेल्वे स्थानकाचा समावेश असून या सोहळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती असणार आहे.

बीड – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमृतभारत योजनेअंतर्गत परळी रेल्वे स्थानकाच्या 24.35 कोटी रुपयांच्या नूतनीकरण व विस्तारीकरण कामाचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करणार आहेत. खासदार प्रीतम मुंडे या वेळी परळी रेल्वे स्थानकावर असतील.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *