चंद्रपूर परिसरातील गरीब कुटुंबांना अल्प दरात घर मिळणार याचे समाधान : ना. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

मुंबई, ता. १४: चंद्रपूर शहरातील गरिबांसाठी, असंघटित कामगारांसाठी हक्काची घरे बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे ; घरकुल बांधण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्यादीत (महाप्रीत) यांच्यात बुधवारी सामंजस्य करार झाल्याने अत्यंत समाधान झाले असून वेगाने हे काम पूर्ण होईल असा विश्वास वन, सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथी गृह येथे बुधवारी १२ एप्रिल रोजी पहिल्या टप्यात गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ३००० घरे तयार करण्यासंदर्भातील सामंजस्य करार ‘महाप्रीत’ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपिन श्रीमाळी, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्यात झाला.
चंद्रपूर परिसरातील गरजू, गरीब कुटुंब तसेच असंघटित कामगार यांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल आहे असे मी मानतो असेही ना मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर येथे गरिबांना हक्काची घरे मिळावी यासाठी ना सुधीर मुनगंटीवार सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन सूचना करण्यात आल्या होत्या. प्रधानमंत्री आवास योजनेतून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती याअंतर्गत घरकुल बांधण्याचे नियोजन आहे. या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरांबाबतचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दिले होते.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे या बाबतीत महाप्रीतचा प्रस्ताव आणि चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत ऊर्जा संरक्षण आणि संवर्धनसंदर्भात त्यांनी अनेक वेळा चर्चा केली होती.
चंद्रपूर येथे श्रम साफल्य योजना राबविण्यात येत असून सदर योजना अंमलबजावणीसाठी महाप्रीत (महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्यादीत) यांच्याकडे देण्यात याव्यात असा प्रस्ताव आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत करण्यात येणारा सार्वजनिक पाणीपुरवठा, दिवाबत्ती, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रतसेच वीज बचत करण्याच्या दृष्टीने अक्षय ऊर्जेचा वापर करणे व त्यासंदर्भातील संवर्धन आणि संरक्षण उपाययोजना करण्याबाबतचा आराखडा तयार करण्याबाबत निर्देश यापूर्वीच्या बैठकीत श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here